सध्या देशात राहुल गांधी यांनी काढलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सर्वत्र चर्चा आहे. मुळात हा निर्णय काँग्रेस पक्षाचा की राहुल गांधी यांचा स्वतःचा हा ही एक प्रश्न आहे. म्हणजे जे 23-जी वाले रुसून काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर वरांड्यात बसलेले आहेत. त्यांचाही या यात्रेत सहभाग आहे की नाही याचा उलगडा झालेला नाही. कारण ज्या कारणांनी ते काँग्रेस नेतृत्वाशी नाराज आहेत ते कारण संपलेले नाही. बिगर गांधी घराण्याला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व दिलेले नाही. ह्या यात्रेचे देखील सुत्रधार आणि नेते राहुल गांधी हेच आहेत म्हणजेच गांधी घराणा. म्हणून उपरोक्त प्रश्न उभे राहतात. ज्याचे उत्तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर मिळतील अशी आशा आहे.
सध्या जी भारत जोडो यात्रा निघाली आहे त्याची जमेची बाजू अशी की 200 स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. ते काँग्रेस सोबत नसले तरी काँग्रेसच्या निमंत्रणावर त्यांनी या यात्रेविषयी बोलाविलेल्या बैठकीत हजर राहून आपला पाठिंबा दिला. त्याच बरोबरच देशातील 200 बुद्धिजीवींनी पत्र लिहून या यात्रेला शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि शेतकरी संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांनी तर संयुक्त किसान मोर्चाला आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि या यात्रेत सहभागी झाले आहेत. हेच ते यादव ज्यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या पराभवावर टीका करताना म्हटले होते की, जर काँग्रेस पक्षाला निवडणुकाही नीट लढवता येत नसतील तर त्या पक्षाने मरण पावणे उचित राहील. तसे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपाशी कोणता करार करून निवडणुका लढवल्या होत्या याबद्दल काही माहिती आलेली नाही अशा गोष्टी कधीच उघडह होत नसतात.
काँग्रेस पक्षाची ही भारत जोडो यात्रा कशासाठी आहे? असा प्रश्न बरेच लोक विचारत आहेत. गुलाम नबी आझाद यांनी तर असा सल्ला सुद्धा देऊन टाकला की पक्षाने अगोदर स्वतःला जोडावे आणि बाकीचे नंतर करावे. असेच सल्ले इतर नेते मग ते भाजपामधील असोत का काँग्रेसमधील किंवा बाहेरचे देत आहेत. तेव्हा नेमकी ही यात्रा कुणाला जोडण्यासाठी आहे हे लोकांना कळायला हवं. याचे स्पष्ट उत्तर काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ’’ही यात्रा विरोधी पक्षांना एकजुट करण्यासाठी काढलेली नाही तर काँग्रेसला बळकट करण्यासाठी काढलेली आहे. ते पुढे असे म्हणाले की, काँग्रेसला वगळता विरोधी पक्ष कधीही एकजुट होऊ शकत नाही. काँग्रेस मजबूत असेल तरच विरोधकांचीही भक्कम एकजुट होऊ शकते. जयराम रमेश यांनी सांगितले ते तथ्य आहे. प्रांतीय विरोधी पक्षांनी कधीन कधी भाजपाची साथ दिलेली आहे आणि असे करत असताना त्यांनी भाजपाला मजबूत तर केलेच त्याच बरोबर स्वतःचा नुकसान करून घेतले आहे. महाराष्ट्राचे उदाहरण समोरच आहे. शिवसेनेने भाजपाला साथ दिली आणि त्याला प्रथम महाराष्ट्राची सत्ता शिवसेनेद्वारे मिळाली. त्यानंतर त्याच शिवसेनेचे भाजपाने काय हाल केले हे सर्वांसमोर आहे, ज्या राज्यात काँग्रेसने 50 वर्ष राज्य केले त्याचे ते राज्य शिवसेनेमुळे भाजपाला मिळाले आणि आता महाराष्ट्राच्या भूमीतच शिवसेनेला दफन करण्याची भाषा भाजपावाले उघडपणे करत आहेत. 2010 साली आताचे सेक्युलर नितीश कुमार यांनी भाजपा आघाडीत प्रवेश केला त्यावेळी बिहारमध्ये भाजपाला शून्य स्थान होते. नितीशकुमार यांच्या काळात भाजपाची बिहारमधील मतांची टक्केवारी 7.5 वरून एकदम 20 टक्क्यांपर्यंत पोहोचली. राष्ट्रीय स्तरावर भाजपाने सात टक्के मते 2005 साली मिळविली होती. ती सध्या 36 ट्नक्यापर्यंत पोहोचली आहे. म्हणजे काँग्रेसच्या 18 टक्केच्या डबल ह्या संधीसाधू प्रांतीय पक्षांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे भाजपाची मदत केली आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाने सीएए कायद्याला आपला पाठिंबा दिला. मायावती यांनी सुधारित युएपीए कायद्याला आपला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय स्तरावर या कायद्याला आपला विरोध दर्शवला असला तर केरळ राज्यात हा कायदा जसाच्या तसा लागू केला.
भाजपाने धर्मनिरपेक्षते आणि मुस्लिमांविरूद्ध भूमिका केंद्रस्थानी करून जे यश मिळविलेले आहे त्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रेद्वारे करता येईल का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा काँग्रेस सत्तेत होती त्यावेळी संघ परिवाराने भाजपाला सत्तेत आणण्यासाठी एक मोहिम चालविली होती. रामरथ यात्रेपासून याची सुरूवात झाली. त्याद्वारे भाजपाने मुस्लिम विरोधी वातावरण तयार केले. काँग्रेसने स्वातंत्र्याचे आंदोलन चालविले. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हा जरी काँग्रेसचा वारसा असला तरी तरूण पिढीला मागील इतिहासाशी काही देणे घेणे नाही. हिंदू-मुस्लिम एकता की धर्मनिरपेक्षता याच्याशी देखील त्यांना काही देणं घेणं नाही. भाजपाने त्यांच्या धार्मिक भावना जागवल्या आणि साहजिकच तरूण पिढीला भाजपाचे आकर्षण वाटले. धर्माच्या मोहात जाऊन ते असे अडकले की बाहेर निघाल्यावर त्यांना मुस्लिमांच्या अत्याचाराला बळी पडण्याची भीती भाजपाने दाखवली. धर्मा व्यतिरिक्त भाजपाने तरूण पिढीला दूसरे कशाचेही आश्वासन दिले नव्हते. आर्थिक स्थिती, शिक्षण नोकऱ्या वगैरे निवडणुकीत वापरायचे शब्द होते. पण याचे वचन भाजपाने कधी दिले नव्हते. म्हणजे काँग्रेसच्या सेक्युलिरिझम विरूद्ध धर्मवाद एवढ्या एका कार्यक्रमावर भाजपाने भारतात आपले राजकीय जाळे इतके गुंतागुंतीचे विणले आहे की त्यातून बाहेर पडणे भाजपा समर्थकांना शक्यच राहिलेले नाही. शिवाय, भाजपा सवर्णांचे राजकारण करत असतानाच बहुजनाला देखील आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहे. काँग्रेस पक्ष देखील सवर्णांचे राजकारण करतो पण बहुजनांचे समर्थन त्याला लाभले नाही. मुस्लिम आणि दलित जातीशिवाय बहुजनांचा मोठा घटक कधीही काँग्रेसबरोबर आला नाही आणि पुढे येईल अशी चिन्हे नाहीत. कारण एकच काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर नेहमी सवर्णांचा दबदबा राहिलेला आहे. म्हणजे मुस्लिम आणि दलिताशिवाय काही प्रमाणात इतर सेक्युलर घटकांचय मतांच्या जोरावर काँग्रेसने सवर्णांना सत्तेची दारे बहाल केली होती. अशा स्थितीत केवळ भारत जोडो यात्रेद्वारे काँग्रसला शक्ती मिळणार नाही. त्यासाठी एक नवीन विचारधारा घेऊन भाजपाला आव्हान द्यावे लागेल. तसे भाजपाचे मुस्लिमविरोधी अभियान जास्त काळ टिकू शकणार नाही. स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झालेत म्हणजे एक नवी पिढी सुद्धा ज्येष्ठ झाली आहे.
75 वर्ष जुन्या विचार सरणीवर भविष्य घडवता येणार नाही. त्यासाठी नव्या विचारधारेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शोध घ्यावा लागेल. देशाची पुनर्बांधणी करण्यासाठी यात्रा काढावी लागेल. फक्त जोडण्यासाठी नव्हे. जमेची गोष्ट अशी की भाजपाने एवढा खटाटोप करून सुद्धा राष्ट्रीय स्तरावर 36 टक्के मते मिळविलेले नाहीत. उर्वरित 64 टक्केला काँग्रेसने आपले लक्ष्य केंद्रित करावे लागेल.
- सय्यद इफ्तेखार अहमद
Post a Comment