Halloween Costume ideas 2015

सत्तेच्या गुलामांना आझादी नको आहे


जे लोक काँग्रेस तोडून पक्षाला सोडून जात आहेत ते आता काँग्रेसला सल्ला देतात की त्यांनी देश जोडो आंदोलन नव्हे काँग्रेस जोडो आंदोलन उभं करावे म्हणजे काँग्रेसचा भारतभर लोकांशी जनसंपर्क होईल.

गेल्या 75 वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये अपवाद वगळता काँग्रेस पक्षाची केंद्रात जवळजवळ 58 वर्षे सत्ता होती. या 75 वर्षात काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सत्तेच्या निरनिराळ्या संस्थांवर होते. ज्या काळी भाजपासारख्या विरोधी पक्षाचे कोणतेच आव्हान नव्हते तेव्हा काँग्रेस सत्ताधारी राजे-महाराजे- नवाब- जहागीरदार, मोगल कालीन बादशाहांपेक्षा जास्त ऐश आरामीत सत्तेच्या संपन्न वैभवात जगत होते. 

राजे, महाराजे, बादशहा आणि निजामसारख्या राजवटींना आपापल्या संस्थांनाचे संरक्षण करायला 24 तास दक्ष रहावे लागत असे. त्यांची एकमेकांशी युद्धे व्हायची. यासाठी सतत त्यांना सतर्क रहावे लागत होते. त्यांचे आव्हान संपले. मग देशात इंग्रजांची सत्ता आली आता ह्या संस्थानीकांना इंग्रज सरकारशी झूंज द्यावे लागे. सांगायचे तात्पर्य स्वातंत्र्यानंतर जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर काबिज झाला तेव्हा त्याला आव्हान देण्यासाठी कोण नव्हते. विरोधी पक्षात सक्षम नेते नसल्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः काँग्रेसमधील काही नेत्यांना विरोधी पक्षात पाठवले. सध्या त्याच नेत्यांनी जो हिंदुत्ववादी पक्ष उभा केला त्यांनी काँग्रेसला सत्तेतून बाहेर केले.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले तेव्हापासून संस्कारी काँग्रेस नेत्यांमध्ये ज्या पक्षाने त्यांना अनेक वर्षे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष राज्यपाल आणि तत्सम महत्त्वाची पदे दिली होती. त्यांना 5 वर्षातच आणि सत्तेचे वैभव गमावण्याचे इतके दुःख झाले की, ते काँग्रेसवर तुटुन पडले. गांधी परिवाराने त्यांना निर्विवाद सत्तेची स्थाने दिली तोच परिवार आता त्यांना सत्तेच्या मार्गात अडथळा भासू लागला. स्वतः पक्षाचे नेतृत्व करण्यास कोणी पुढे येत नव्हते. कारण पक्षाचे नेतृत्व म्हणजे पक्ष टिकविण्यासाठी 24 तास मैदानात राहावे लागते. कष्ट सहन करावे लागतात पण त्या ‘’ संस्कारी‘’ नेत्यांना सतेच्या दालनात राहणे जास्त पसंत होेते. यालाच ते देशाची सेवा समजत. 

वातानुकुलीत बंगले, गाड्या प्रजेच्या पैशावर कोट्यावधींच्या सवलती ते उपभोगत. जेव्हा या सवलती सत्ता गेल्याने हिरावल्या गेल्या तेव्हा त्यांची देशसेवा आणि काँग्रेस प्रेमाचा फुगा फुटला. आता फक्त काँग्रेस पक्षानेच त्यांचे संस्थान गमावून टाकले असे त्यांना वाटू लागले. जेमतेम 5 वर्षे देखील ते तग धरून बसले नाहीत. भाजपाशी छुपे संबंध स्थापित केले. भाजपासाठी हेरगिरी करू लागले तिथून हिरवा सिग्नल ज्यांना ज्यांना ज्या-ज्या वेळी मिळाला ते-ते त्यावेळी पक्ष सोडून जाऊ लागले. पण थेट भाजपात प्रवेश घेतला तर लोक काय म्हणतील म्हणून त्यांना जी-23 नावाचा वेगळा गट काँग्रेस पक्षात राहूनच उभारला. हेच कार्य जर भाजपाच्या नेत्यांनी केले असते तर त्यांचे काय हाल झाल असते हे सर्वांना माहित आहे. काही लोक राजकारणातून तर काही या जगातूनच उठून केले असते. काँग्रेसने त्यांचे बरे वाईट काही केले नाही. कारण ते संस्कारी नाहीत. ‘संस्कारी’ काँग्रेसचे नेते भाजपासाठी काँग्रेसमध्ये व्ह्यूव्ह रचना तयार करत होते. त्यांचे हे जाळे दिल्लीतच नाही तर जिल्हा पातळीवर देखील पसरलेले आहे. त्यांचे खादीवस्त्र उचलून पाहिले तर आतमधील भगवे अंतरवस्त्र दिसतील. 

अशाच काँग्रेस नेत्यांमधील एक मोठे नाव गुलाम नबी आझाद. ते 50 वर्ष राज्यसभेचे सदस्य होते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या महासचिवपदी विराजमान होते. एवढेच नव्हे तर युवक काँग्रेसचे दखील ते नेते होते. बऱ्याच राज्यांचे ते काँग्रेसचे प्रभारी होते म्हणजे पक्षात प्रवेश केल्यानंतर  एक दिवस सुद्धा असा गेला नाही ज्यावेळी ते कोणत्या न कोणत्या पदावर बसून ’देशाची सेवा करत नसतील.’ पण देशाची सेवा करण्याची संधी जेव्हा त्यांनी गमावली तेव्हा ते कासाविस झाले. आता त्यांना आपल्या काँग्रेसमध्ये करमत नव्हते; कारण करमणुकीच्या साऱ्या संधी सत्तेबरोबरच हिरावून गेल्या होत्या. म्हणूनच काही वेळा उघड तर काही वेळा छुपे संबंध ते भाजपाशी प्रस्थापित करू लागले. कारण आता काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना महत्व देत नव्हते. पक्षाध्यक्ष नसल्याने काँग्रेस नेतृत्वहीन झाले असा आरोप लावत इतर आरोपांची लांबलचक 35 पानांची यादी त्यांनी जाहीर केली. पण जर ते सत्तेच्या पन्नास वर्षात त्यांनी जे-जे पद भुषविले आणि कोण-कोणत्या ऐश आरामीने जीवन जगले याची एक यादी 1-2 पानांची तरी जाहीर करायची होती. त्यांनी तसे केले नाही. काँग्रेसचे हे सारे संस्कारी नेते देशसेवेच्या नावाखाली सत्ता आणि सत्तेसोबत येणाऱ्या शाही जीवन जगण्याची गुलामी करत होते. यातून त्यांना ‘’आझादी‘’ नको होती म्हणून त्यांनी दुसऱ्या लोकांची गुलामगिरी पत्करली. ते कालही गुलाम होते आणि आजही गुलाम आहेत आणि उद्याही गुलाम राहतील. त्यांना सत्तेच्या दरबारातून आझादी नकोच आहे. जे लोक काँग्रेस तोडून पक्षाला सोडून जात आहेत ते आता काँग्रेसला सल्ला देतात की त्यांनी देश जोडो आंदोलन नव्हे काँग्रेस जोडो आंदोलन उभं करावे म्हणजे काँग्रेसचा भारतभर लोकांशी जनसंपर्क होईल.  

गेल्या वेळी राज्यसभेच्या सदस्यांसाठी मतदान झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या नेत्यांनी सदस्यत्वाचा सातबारा (7/12) वर आपले नाव नोंदवले होते. त्यांना राज्यसभेची पुन्हा संधी मिळाली नसल्याने त्यांची अवस्था ‘’जल बिन मछली’ सारखी झाली. पाण्याचा इतर स्त्रोत त्यांना जवळच मिळाला म्हणून बऱ्याचजणांनी त्या पाण्यात उडी घेतली. जी-23 मध्ये इतर नेते उडी घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस पक्षाचा हा मोठेपणा जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना ते काहीच बोलत नाहीत. कोणती तक्रार नाही. 35 पानी अहवाल त्यांनी या नेत्यांनी जी सत्तेची गेल्या 50-60 वर्षामध्ये देशसेवेच्या नावाखाली केली त्यांचा आराखडा मांडला नाही. सोनिया गांधी असोत की राहुल गांधी की प्रियंका गांधी त्यांनी एक शब्द त्यांच्या विरोधात मुखातून काढला नाही. सत्तेच्या या गुलामांना त्यांनी पक्षातून आझाद केले म्हणजे इतरत्र जाऊन ते पुन्हा सत्तेची गुलामी करतील. गुलाम नबी नवापक्ष काढणार आहेत. जम्मू कश्मीरच्या निवडणुका जवळच आहेत. त्या निवडणुकीत भाजपाची गुलामी त्यांना करायची आहे म्हणून ते काँग्रेस पक्षातून आझाद झाले? एवढेच त्यांच्या काँग्रेसपक्षाशी राजीनाम्याचा अर्थ आहे. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget