हजरत अबू जर गफ्फारी म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारलं की ह. इब्राहीम (अ.) यांच्या शिकवणी कोणत्या होत्या. त्यांनी उत्तर दिले की ह. इब्राहीम (अ.) यांच्या शिकवणी अशा आहेत -
"हे बादशाह, तुला सत्ता देऊन परीक्षेत टाकले गेले आहे. मी (अल्लाह) तुला या दुनियेत अमाप मालमत्ता गोळा करण्यासाठी पाठवलेले नाही तर मी तुला यासाठी सत्ता दिलेली आहे की तू अत्याचारपीडितांशी न्याय करावा, जेणेकरून त्यांनी माझ्याकडे याचना करू नयेत. कारण मी अत्याचारपीडितांच्या विनंतीला रद्द करत नाही. ते मुस्लिम असोत की परधर्मीय, कुणी का असेनात. विद्वान माणसे जोपर्यंत सक्रिय असतील त्यांनी वेळेचे नियोजन करावे. काही वेळ अल्लाहकडे विनंती करण्यात घालवावा, काही वेळ आत्मपरीक्षण करावं आणि काही वेळ अल्लाहच्या निर्मिती आणि त्याच्या आकर्षणात चिंतन करावे. काही वेळ आपल्या खाण्यापिण्याची चिंता करावी. केवळ त्या उद्दिष्टासाठी प्रवास करावा की परलोकातील यशप्राप्ती किंवा स्वतःच्या साधनांची टंचाई दूर करण्यासाठी आणि जे काही वैध आहे त्याची चव चाखण्याकरिता. विद्वान माणसांनी काळाचे भान ठेवणे आवश्यक आहे. स्वतःच्या स्थितीत सुधार करावा. आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे. जर माणसांनी आपल्या जिभेपासून निघालेल्या गोष्टींचे परीक्षण करत राहावे. असे केल्याने तोंडातून अशाच गोष्टी निघतील ज्या लाभदायी असतील."
मी पुन्हा विचारले की हे अल्लाहचे प्रेषित (स.) ह. मूसा (अ.) यांच्या शिकवणी कोणत्या. प्रेषित (स.) म्हणाले की त्यांच्या शिकवणी अशा आहेत -
"ज्या माणसाला मृत्यू येणार आहे यावर विश्वास असूनदेखील त्याने संपत्ती गोळा करत त्यावर अभिमान बाळगला, अशा माणसाचे महा आश्चर्य वाटते. तसेच हीदेखील आश्चर्याची गोष्ट आहे की त्याला नरक आहे यावर विश्वास असावा तरीदेखील त्याने हसत राहावे आणि ज्याला आपल्या भाग्यावर विश्वास असूनदेखील तो माणूस जगात ऐहिक संपत्ती गोळा करण्यात व्यस्त असतो यावरही मला आश्चर्य वाटते. जी व्यक्ती हे जग आणि यात फेरबदल होत असताना पाहतो, तरीदेखील या जगालाच तो आपलं ध्येय मानतो आणि कयामतच्या दिवशी हिशोब घेतला जाणार यावर विश्वास असून देखील नेक कर्म करत नाही, याचेही मला आश्चर्य वाटते."
यानंतर मी (ह. अबूजर र.) म्हणालो की हे अल्लाहचे प्रेषित (स.), मला काही मार्गदर्शन करा.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी उत्तर दिले, "मी तुम्हाला अल्लाहची भीती बाळगण्याची ताकीद करतो, कारण हे सर्व नेकींचे मूळ आहे."
मी विचारले की हे अल्लाहचे प्रेषित (स.), आणखीन काही?
प्रेषित (स.) म्हणाले, "स्वत:ला जास्त हसत राहण्यापासून वाचवा, कारण यामुळे हृदयावर प्रभाव पडतो आणि चेहऱ्यावरील तेज कमी होते."
हे अल्लाहचे प्रेषित (स.) आणखीन काही?
"अल्लाहच्या मार्गात संघर्ष करणे स्वतःवर अनिवार्य करा. गोरगरीबांशी प्रेमाने वागा आणि त्यांच्या संगतीत राहा."
"जे लोक संपत्ती आणि जगातील वैभवात तुमच्यापेक्षा कमी आहेत, त्यांच्याकडे पाहा. ज्यांना अधिक संपत्ती आणि वैभव असेल त्यांच्याकडे पाहू नका. कारण यामुळे तुमच्यामधील अल्लाहच्या देणगी क्षुल्लक वाटणार नाहीत. लोकांशी सत्य बोहत जा. जरी त्या गोष्टी लोकांना आवडो की न आवडो."
"तुमच्यामध्ये जे दोष (कमतरता) आणि उणिवा आहेत त्यांना चांगले ओळखता, त्यावर नजर ठेवा. इतरांचे दोष आणि उणिवा शोधू नका. असे कुठले कृत्य करू नका जे लोकांनी केले असेल त्यावर तुम्हाला राग येत असेल. माणसासाठी हे दोष पुरेसे आहेत की त्यांनी स्वतःच्या उणिवा ओळखू नये, आणि इतरांच्या उणिवा शोधत राहावे. जे कार्य तो स्वतः करतो त्च दुसऱ्यांनी केले तर त्यावर नाराजी व्यक्त करू नये."
नंतर प्रेषितांनी माझा हात धरला आणि म्हटले, "हे अबू जर (र.) जो माणूस परिणामाची चिंता करतो तो प्रतिभावंत आहे, सर्वांत बुद्धिमान आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट निषिद्ध बाबूंपासून स्वतःला वाचवणे आणि सर्वांत उत्तम प्रामाणिकपणा म्हणचे लोकांशी चांगला व्यवहार करणे होय."
(तरगीब व तरहीब, संदर्भ इब्ने हय्यान)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment