Halloween Costume ideas 2015

आत्मशुद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे : मौ. इलियास फलाही


लातूर :
मनुष्याला ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यानेे आत्मशुद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ज्यामुळे त्याचे जीवन हे सुखी, समृद्ध आणि स्वतःच्या व समाजाच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरते. शिवाय, अंतःकरणाच्या शुद्धीकरणामुळे मनुष्याचे व्यक्तीमत्व उजळत असते. ही सातत्याने चालत राहणारी प्रक्रिया असून, यासाठी कुरआन आणि हदीसमध्ये योग्य मार्ग दाखविला आहे, असे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे पूर्व उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही म्हणाले.

मर्कज-ए-इस्लामी खोरी गल्ली, लातूर  येथे जमाअते इस्लामी हिंद द्वारा आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय ’ततहरी-ए-कल्ब’ (अंतःकरणाचे शुद्धीकरण) या एक दिवसीय शिबिरात रविवारी ते बोलत होते. मंचावर लातूरचे जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी, उपाध्यक्ष मुहम्मद आरीफ, शहराध्यक्ष अशफाक अहमद, सचिव अब्दुल वाजीद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने डॉ. असगर उदगीरकर यांनी केेले. 

कुरआनमध्ये ’कल्ब का तसव्वुर और कैफियते कल्ब’ या विषयावर बोलताना मौलाना इलियास फलाही यांनी कुरआन व हदीसचे दाखले देत  म्हणाले की, आत्मशुद्धीसाठी जो व्यक्ती प्रयत्न करत नाही तो व्यक्ती सर्वात अधिक कठोर असतो. ईश्वराने आपल्याला जे अंतःकरण दिलेले आहे ते आजारी पडू नये म्हणून आपणास त्याच्या शुद्धीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आज व्यक्ती छोट्या-छोट्या मोहापाई मोठमोठे नुकसान करून बसतो. ज्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर उभे राहतात. मग तो स्वतःला सोडून इतरांना दोष देण्यात मग्न असतो. त्यामुळे योग्यवेळी आपल्यात होणारे बदल ओळखून त्यामध्ये सुधारणा घडवून आणली पाहिजे. जे अंतःकरण ईश्वराच्या नामस्मरणापासून गाफिल राहते ते कधी  चुकीच्या मार्गावर चालले आहे त्याचे त्यालाच कळत नाही. कुरआनच्या मार्गदर्शनाचा प्रकाश आपल्या अंतःकरणात पाडण्यासाठी त्याचे नियमितपणे वाचन करून ते समजण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. यामध्ये मनुष्याच्या जीवनाशी निगडीत समस्यांच्या निपटाऱ्याची चावी सापडते. ईश्वराने आमच्यासमोर एवढे मोठे ब्रह्मांड उभे केले आहे आणि त्याला समजून घेण्यासाठी आम्हाला मन, मस्तिष्क आणि अंतःकरण दिलेले आहे. जसं शरीर आजारी पडते तसं अंतःकरणही आजारी पडते. या अंतःकरणाला सरळ मार्ग हा कुरआनच्या प्रकाशातूनच मिळतो. मग ते प्रश्न ऐहिक असोत की पारलौकिक. कुठल्याही कामाला छोटे समजून ते करण्यासाठी चलबिचल होऊ नका. मनुष्याचा अहंमपणा त्याला मोठ्या सन्मार्गापासून वंचित ठेवतो. शरीराची स्वच्छता मनाच्या स्वच्छतेसाठीही आवश्यक आहे. चांगली सोबत पाळत जा. ज्यामुळे आपल्यातील गुण, दोष समजायला मदत होते.  

यावेळी ‘मनाचे आजार आणि त्यावर उपाय’ यावर चर्चासत्रही झाले. ज्यामध्ये साजीद आझाद, मुहम्मद इसहाक, सय्यद वाजीब, मुहम्मद अशफाक अहमद, दायमी अब्दुर्रहीम यानी विचार व्यक्त केले. यावर मौलाना इलियास फलाही यांनी विवेचन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुहम्मद आरीफ यांनी तजकिया-ए-नफ्स का आगाज या विषयावर मार्गदर्शन केले. ’आओ अपनी उन खामीयों का इजाला करें’ (या आपल्या त्या दुर्गूनांना दूर करूया) हे खुले चर्चासत्र झाले. ज्यामध्ये विषय होते, उद्धटपणा, अहंभाव, राग, चहाडी, चुगली, सुस्ती, नजरअंदाजी, मनघडंत विचार यावर उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद देत आपली मते व्यक्त केली. याचे संचलन अबरार मोहसीन यांनी केले. पहिल्या चर्चासत्राचे सूत्रसंचलन सय्यद आसेफ यांनी केले. 

दुसऱ्या चर्चासत्रात ’आपल्या मनाचा हिशेब घेऊया’ यावर डॉ. मुजाहीद शरीफ यांनी हदीसद्वारे प्रकाश टाकला. आपल्या ईश्वराशी भेट आणि त्याची तैयारी यावर प्रा. अब्दुल वाजीद यांनी विचार व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष मिसबाहुद्दीन हाश्मी यांनी ’आओ अपना एहतेसाब करें’यावर विचार व्यक्त करताना आपले दैनंदिन नियोजनाची उकल सांगितली. अध्यक्षीय भाषणात मौलाना इलियास फलाही यांनी ’अंतःकरण आणि यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली’ यावर विचार व्यक्त केले. शेवटी प्रार्थनेने कार्यक्रमाचा शेवट झाला.  


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget