खरे तर ज्या शिवसेनेचे बोट धरून भाजपाने महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रोवली ती भाजप शिवसेनेचे अख्खे बोटच कापण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीची सुरू असलेली यशस्वी सत्ता उलथविण्यासाठी भाजपाने हजारो कोटींवर पाणी फिरवित शिवसेना फोडून आघाडीची सत्ता उध्वस्त केल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांनी लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेचे 39 आमदार, खासदार फोडून भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करीत एकाच फटक्यात अनेक उद्देश साध्य केलेले आहेत. शिवसेना अनेकवेळा फुटली मात्र भाजपाने ज्या पद्धतीने शिवसेना फोडली ते नुकसान अनेक वर्षे भरून न निघण्यासारखे आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर आले असता उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा करीत जमीन दाखविण्याचे आव्हान भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे शिवसेनेला अशा काही ठोस उपाययोजना कराव्या लागताहेत जे की शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देतील. त्या दिशेने शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पावले टाकत आहेत.
शिवसेनेची भूमीका
खरे तर शिवसेनेच्या विचारधारेवर मुळ प्रभाव हा प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचा अधिक राहिलेला आहे. मात्र शिवसेनेने आपल्या राजकीय महत्वांकक्षेसाठी पुढे चालून जहाल हिंदुत्वाचा पुरस्कार केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रारंभीची भाषणे आणि कार्य पाहिले तर सर्वसामान्यांना आपलेसे वाटेल असेच राहिले आहे. देशभरात भाजपाचा वाढता प्रभाव आणि हिंदुत्वाचा अजेंडा हिंदुत्ववादी विचारणीच्या लोकांबरोबर काही इतर मागासवर्गीयांनाही आकर्षित करत होता. अशी बदलत चाललेली राजकीय परिस्थिती पाहून भाजपापेक्षा अधिक प्रखर आणि वैचारिक भूमिकांतही शिवसेनेने बदल केला. त्यामुळे शिवसेना एक जहाल हिंदुत्वादी पक्ष बनला. खरे तर ही सुद्धा भूमिका फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण शिवसेनेत अठरा पगड जातीतील लोक होते. त्यामुळे शिवसैनिक भाजपाच्या कार्यकर्त्यांसारखे पोटात एक अन ओठावर एक असे कधीच राहिले नाहीत. खरे तर शिवसेनेला मानणारा जो मोठा वर्ग आहे त्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणूस सोबतच ओबीसी, मराठा, मुस्लिम आणि राजकीय इतिहास अधिक नसलेल्या सामान्यांचा पक्ष अशीच ओळख. गाव खेड्यात शिवसेनेचा अधिक वारू. युवकांची तगडी फौज शिवसेनेत. शिवसेनेच्या घौडदौडीला भाजपा सर्वत्र खिंडार पाडत आपले वर्चस्व प्रस्थापित करू लागली. हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपल्या भूमिकेत बदल करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती करून महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यामुळे सत्ता गेल्याने बिथरलेल्या भाजपाने चवताळून शिवसेनेवर हल्ला केला आणि अख्खी शिवसेना फोडली अन् शिवसेनेचे सर्व विश्वासू आपल्या गोटात ’अर्थ’पूर्ण पद्धतीने ओढून घेत सत्ता स्थापन केली. ही फूट मागील तीन फुटीप्रमाणे सामान्य नव्हती. कारण छगन भुजबळ, राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी शिवसेनेला तेवढे नुकसान पोहोचविलेले नव्हते, जेवढे या फुटीने पोहोचविले आहे. शिवसेनेला कायदेशीर शह देण्यासाठीही भाजपा आणि शिवसेनेतील फुटीर गट प्रयत्नात आहेत. मात्र शिवसेनेने कायदेशीर आणि सामंजस्याची भूमीका घेत फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनिती अमलात आणण्याला सुरूवात केली आहे. शिवसेनेची होत असलेली पडझड थांबविली आहे. अशात शिवसेनेने संभाजी बिग्रेडशी युती करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविली आहे. याचा फटका भाजपा व शिंदे गटाला बसेल, असे निश्चितपणे म्हणता येईल. आजच्या घडीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळता, जनमानसावर प्रभाव असलेला एकही प्रभावी लोकनेता शिवसेनेत दिसत नसला तरी जनमानसात शिवसेने प्रती प्रचंड सहानुभूती आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास दिसून येत आहे. मग ती सामाजिक माध्यमांवर व्यक्त होत असो की गावागावात होत असणाऱ्या चर्चेतून व्यक्त होणारी मते असोत. सर्व उद्धव ठाकरेंसोबत दिसत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे कठीण परिस्थितीत कारभार हाकत महाराष्ट्राच्या जनतेला आपलेसे वाटेल असे काम करून दाखविले. विशेषतः कोरोनाची परिस्थिती ज्या कौशल्याने हाताळली त्यामुळे शिवसेनेला न मानणारा वर्गही उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेशी जोडला गेला आहे. ही जमेची बाजू शिवसेनेला येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
संभाजी ब्रिगेड
पुरुषोत्तम खेडेकर यांनी या 1 सप्टेंबर 1990 रोजी मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता. मराठा सेवा संघानं स्थापनेच्या काही वर्षांतच 32 ते 33 विभाग सुरू केले. त्यात पुढे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले ते महिलांसाठीचं जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठीचं संभाजी ब्रिगेड.
संभाजी ब्रिगेडचे कार्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना समोर ठेवून मार्गक्रमण करणारे दिसून येते. महाराष्ट्रात दंगलींचा मोठा इतिहास आहे. मात्र या दंगली रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने मोठे काम केले आहे. त्यामुळे संभाजी बिग्रेडला मानणारा मोठा वर्ग आज सर्वच समाजात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज आपलेसे वाटतात. मात्र राज्यात काहीजणांनी हिंदुत्ववादाचे नाव पुढे करीत राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून काही संघटन व पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गढूळ करण्याचा प्रयत्न केला. अशा संघटनांना व व्यक्तींना थोपविण्याचे प्रयत्न संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी केले. संभाजी ब्रिगेडने क्रांती करीत गाव खेड्यातील मुलांना वैचारिक अधिष्ठान आणि मंच उपलब्ध करून देत शिवरायांचा खरा इतिहास अवगत करून दिला. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात छत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्राचे स्वास्थ खराब करणाऱ्यांना आळा बसला आहे. संभाजी ब्रिगेडसारख्या प्रगल्भ वैचारिक संघटनेमुळे निश्चितच शिवसेनेलाही फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळेल, असे वाटते. कारण शिंदे गटाकडे फक्त भाजपाचा पाठिंबा आहे. शिवसेनेसारखे कुठलेही वैचारिक अधिष्ठान त्यांच्याकडे नाही.
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती
शिवसेना-संभाजी बिग्रेडची युतीची घोषणा 26 ऑगस्ट रोजी मुबईत मातोश्री येथे शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते गंगाधर बनवरे तसेच सुभाष देसाई उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, इतिहास घडवू आणि मराठी माणसाला असलेल्या दुहीच्या शापालाच गाडून टाकू. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याचा मला आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. या संबंधीच्या न्यायालयीन निर्णयामध्ये होत असलेला विलंब ही अभूतपूर्व अशी बाब आहे. या संबंधातील न्यायालयीन निर्णय हा आपल्या देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, हे ठरविणार आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेडने आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा, लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी घेऊन एकत्र लढण्याचे धोरण अवलंबले आहे. आमची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे. आतादेखील महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.
मतभेद आणि साम्य
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन, हिंदुत्वाचे राजकारण करणारी शिवसेना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेऊन, ‘शेंडी, जानवे व पंचपळीच्या हिंदुत्वा’वर तुटून पडणारी संभाजी ब्रिगेड, या दोन पक्षांनी यापुढे एकत्र काम करण्याची घोषणा केली आहे. भूतकाळात उभय पक्षांमध्ये अनेक मुद्यांवर टोकाचे मतभेद दिसले असले तरी, त्यांच्यात काही साम्यस्थळेही आहेत. दोन्ही पक्षांनी आधी समाजकारणाचा वसा घेतला आणि मग राजकारणाची वाट धरली! शिवाय प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेवर चालण्याचा दावाही दोन्ही पक्ष करतात. 2016 मध्ये राजकारणात प्रवेश केल्यानंतर अद्यापपर्यंत तरी संभाजी ब्रिगेडला कोणत्याही निवडणुकीत प्रभाव पाडता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर उभय पक्ष एकत्र आले आहेत. स्वाभाविकपणे या घडामोडीचा राज्यातील राजकीय समीकरणांवर कितपत प्रभाव पडेल, हे येणारा काळच दर्शविल.
- बशीर शेख
Post a Comment