Halloween Costume ideas 2015

एकमेकांच्या घरात प्रवेश करण्याचे शिष्टाचार


दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करण्याचे शिष्टाचार प्रेषितांनी फक्त सांगितलेलेच नसून तर स्वतःआचरणात आणूनही दाखविले आहेत. म्हणूनच आज हे शिष्टाचार इस्लामी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. विशेष म्हणजे हे शिष्टाचार ब्रिटिश कायद्याप्रमाणे दिवाणी स्वरूपाचे नसून फौजदारी स्वरूपाचे आहेत. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर शासनाने दखल घेऊन शिष्टाचार भंग करणाऱ्यांना शिक्षा देणे अपेक्षित आहे.  

पोलीस खात्यात असतांना ईदच्या दिवशी मी माझ्या सर्व स्टाफला आमंत्रण द्यायचो. एकदा अशीच ईद आली, स्टाफ आला आणि शिरखुर्मा पिऊन गेला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या चेंबरमध्ये बसलेलो असतांना माझी एक सहकारी महिला फौजदार आणि एक महिला कर्मचारी माझ्याकडे आल्या व म्हणाल्या की, सर आम्हाला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे आहे. मी हातातील फाईल बाजूला केली आणि त्यांच्याशी वार्तालाप सुरू केला. त्या दोघी कालच्या माझ्या ईदच्या कार्यक्रमामुळे अतिशय प्रभावित झालेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या की, सर तुमच्याकडे ही पद्धत फार चांगली आहे की, महिला पाहुण्यांसमोर येत नाहीत. काल आम्ही दोघींनी तुमच्या घराच्या आत जाऊन मॅडमची भेट घेतली. त्यांच्याशी बोलतांना जाणवले की त्या अतिशय समाधानी आहेत. नाहीतर आम्हाला पाहुणे आल्यावर स्वयंपाक तर करावाच लागतो व परत पुरूषांमध्ये येवून जेवण वाढावं लागतं. तेव्हा खूप संकोचल्यासारखं वाटतं. महिलांची तुमच्याकडची ही पद्धत आम्हाला फार आवडली. 

मी त्यांना धन्यवाद दिले. त्या निघून गेल्या. काल तफहिमुल कुरआन वाचत असताना मला अचानक वरील प्रसंग आठवला. मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी यांनी कुरआनमधील सूरे नूूरचे भाष्य करताना दुसऱ्याच्या घरी जाण्याचे शिष्टाचार तपशीलासह नमूद केलेले आहेत. माझ्या महिला स्टाफची प्रतिक्रिया आणि मौलानांनी लिहिलेला तपशील वाचून मला एक कल्पना सूचली की आपण सर्वही एकमेकांच्या घरी जातो, किंबहुना जावच लागतं. अशावेळी कोणते शिष्टाचार पाळायला हवेत, ही माहिती वाचकांना दिली तर ती त्यांच्यासाठी उपयुक्त राहील व आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी सहाय्यक ठरेल. म्हणून हा लेखन प्रपंच.

मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी लिहितात,  लोक आज जसे ‘गुड-मॉर्निंग’, ‘गुड-इव्हिनिंग’ म्हणत सरळ घरात घुसतात, तसेच प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पूर्वीच्या अज्ञानकाळात काळीही ’सुबह-ब-खैर’, ’शाम-ब-खैर’ म्हणत सरळ एकमेकांच्या घरात घुसत होते. अशांमुळे अनेकदा बेसावध बसलेल्या महिलांवर त्यांच्या      -(उर्वरित पान 7 वर)

नजरा पडत. त्यामुळे महिलांना अवघडल्यासारखे होत असे. त्यांची स्वतःला सावरतांना तारांबळ उडत असे. तेव्हा महिलांची या अडचणीत कायमची सुटका करावी यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अल्लाहच्या आदेशाने एक आचारसंहिता लागू केली. ज्याचा उल्लेख सुरे नूरमध्ये खालीलप्रमाणे आलेला आहे. 

1. हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करीत जाऊ नका जोपर्यंत त्या घरातील लोकांची सम्मती मिळत नाही आणि त्या घरातील लोकांना तुम्ही सलाम करीत नाही. ही पद्धत तुमच्यासाठी उत्तम आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाल. (सुरे अ-न्नूर 24: आयत नं. 27)

2. मग जर तेथे कोणी आढळला नाही तर प्रवेश करू नका जोपर्यंत तुम्हाला परवानगी दिली जात नाही, आणि जर तुम्हाला सांगितले गेले की, परत जा तर निघून जा. ही तुमच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे. आणि जे काही तुम्ही करता ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो.  (सुरे अ-न्नूर 24: आयत क्र. 28)

3. तथापि तुमच्यासाठी यात काही हरकत नाही की अशा घरात प्रवेश करावा जे कोणाच्या राहण्याचे स्थान नाही आणि ज्यात तुमच्या लाभाची (अथवा कामाची) एखादी वस्तू असेल. तुम्ही जे काही जाहीर करता आणि जे  काही  लपविता  सर्वांचे  अल्लाहला  ज्ञान  आहे.   (सुरे अ-न्नूर 24: आयक क्र. 29)

या आयातींवर भाष्य करतांना मौलाना लिहितात, शरियत किसी बुराई को महज (फक्त) हराम कर देने या उसे जुर्म (गुन्हा) करार (घोषित) देकर उसकी सजा मुकर्रर (निश्चित) कर देने पर इत्तफा (संतुष्टी) नहीं करती. बल्के वो उन असबाब (कारणों) का भी खात्मा कर देने की फिकर कर देती है. जो किसी शख्स को उस बुराई में मुब्तला (लिप्त) होने पर उकसाते हों. या उसके लिए मौका बाहम पहूंचाते हों, या उसपर मजबूर कर देते हों. नेज (आणखीन) शरियत जुर्म (गुनाह) के साथ असबाबे जुर्म (गुन्हंची कारणे), मुहर्रिकाते जुर्म (गुन्हा करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या गोष्टी) और रसायल व जराये जुर्म (गुन्हा करण्याचे स्त्रोत) पर भी पाबंदीयाँ लगाती हैं. ता के आदमी को असल जुर्म को ऐन सरहद पर पहूंचने से पहले काफी फासले पर ही रोक दिया जाए. शरयित इसे पसंद नहीं करती के लोग जुर्म की सरहदों पर टहलते रहें, रोज पकडे जाएं और सजा पाएं. वो सिर्फ  मोहतसीब (प्रॉसिक्युटर/अभिवक्ता)  ही नहीं है, बल्के हमदर्द (दयावान), मसलेह (सुधारणावादी) और मददगार भी है. इसलिए वो तमाम तहेजीबी (सांस्कृतिक), अख्लाकी (नैतिक), मुआशरती (सामाजिक) तदाबीर (उपाय) इस गर्ज के लिए इस्तेमाल करती है के, लोगों को बुराईयों से बचने में मदद दी जाए

मौलाना पुढे लिहितात, वरील तीन आयातींच्या समुच्चयांचे रूपांतरण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एका आचारसंहितेत केले व प्रत्येक नागरिकाला नीजतेचा अधिकार (राईट टू प्रायव्हसी) असल्याचे जाहीर केले. एवढेच नव्हे तर एकमेकांच्या निजतेच्या अधिकाराचे पालन करण्यासाठी लोकांनी कसे वागावे याची नियमावलीही ठरवून दिली. तीच नियमावली अर्थात एकमेकांच्या घरात कसे यावे जावे याचे शिष्टाचार, जे प्रेषितांनी ठरवून दिले आहेत, त्यांचा आज आपण विचार करणार आहोत. ते खालीलप्रमाणे - 

नियम क्रमांक 1- 

दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये. 

प्रेषित सल्ल. यांनी हा नियम एवढा कडक ठेवला आहे की, एकदा त्यांनी भर सभेमध्ये एका व्यक्तीला सांगितले की, जर कोणी तुझ्या घरात डोकावत असेल तर तू दगड फेकून मारल्यावर डोकावणाऱ्याचा डोळा गेला तरी तुझ्यावर गुन्हा नाही. याचाच अर्थ इस्लामी शरियतमध्ये दुसऱ्याच्या घरात डोकावणे हा किती मोठा गुन्हा आहे, याचा अंदाज वाचकांना येईल. याच संदर्भात दुसऱ्यांदा प्रेषित सल्ल. आपल्या अनुयायांपुढे म्हणतात, जर एखाद्याने दुसऱ्याच्या घरात बाहेरून डोकावून पाहिले तर मग परवानगी घेऊन घरात प्रवेश करण्याचा काय उपयोग? नजरेने तर त्याने आधीच प्रवेश केलाय ना! 

दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करण्याचे शिष्टाचार प्रेषितांनी फक्त सांगितलेलेच नसून तर स्वतःआचरणात आणूनही दाखविले आहेत. म्हणूनच आज हे शिष्टाचार इस्लामी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. विशेष म्हणजे हे शिष्टाचार ब्रिटिश कायद्याप्रमाणे दिवाणी स्वरूपाचे नसून फौजदारी स्वरूपाचे आहेत. या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यावर शासनाने दखल घेऊन शिष्टाचार भंग करणाऱ्यांना शिक्षा देणे अपेक्षित आहे.  

अबु दाऊद या हदीस संग्रहात एका ठिकाणी म्हटले आहे की, हुजूर सल्ल. जेव्हा एखाद्याच्या घरी जात तर एकदम दारासमोर कधीच उभे राहत नसत. ते दाराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला आडोसा घेऊन उभे राहत व हाक मारून घरात प्रवेश करण्याची परवानगी मागत.

नियम क्रमांक 2-

आपल्या घरी सुद्धा परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश करू नये. या संदर्भात एक प्रसंग मौलानांनी खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे. एकदा एका व्यक्तीने प्रेषित सल्ल. यांना विचारले, मी माझ्या आईच्या खोलीमध्ये जातांनाही परवानगी घेऊ का? त्यावर प्रेषित सल्ल. उत्तरले ‘हो’. त्यावर तो म्हणाला, माझ्याशिवाय त्यांची सेवा करणारा दुसरा कोणीही नाही. अशावेळेस मला वारंवार त्यांच्या खोलीत जावे लागते. मग प्रत्येक वेळेस मी परवानगी घेत जाऊ का? त्यावर प्रेषित सल्ल. रागावून म्हणाले की, तुला हे आवडेल का की तू तुझ्या आईला अर्धनग्न अवस्थेत पाहशील? 

एवढेच नव्हे तर अब्दुल्लाह इब्ने मसूद रजि. जे की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जवळचे शिष्य होते त्यांनी इथपर्यंत म्हटलेले आहे की,  तुम्ही तुमच्या पत्नीच्या खोलीत जातांना सुद्धा अचानक जाऊ नका. कमीत कमी तुम्ही येत असल्याची तिला चाहूल लागेल अशी कृती करा. कृत्रिमरित्या खोकला  किंवा अन्य काहीही कृती करा. अब्दुल्लाह इब्ने मसऊदच्या सुविद्य पत्नी जैनब यांनी म्हटलेले आहे की, इब्ने मसऊद जेव्हा माझ्या खोलीत येत तेव्हा ते असे काही आवाज काढत की ज्यामुळे मला त्यांच्या येण्याची सूचना मिळत असे. त्यांना हे मुळीच आवडत नव्हते की, त्यांनी अचानक माझ्या समोर येवून उभे रहावे. 

नियम क्र. 3.

तीन वेळेस परवानगी मागूनही जर घरमालकाने परवानगी नाकारली तर नाराज न होता परत जा. परवानगी मिळाली तरी घराच्या आतल्या खोलीत नजर पडणार नाही असा कोण करून बसा व येण्याचा हेतू संपला, बोलणं संपलं की तात्काळ निघून जा, ना जणो तुमच्या जास्तवेळ बसण्याने आतील महिलांच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या असतील.

नियम क्र. 4

घरात प्रवेशाची परवानगी अधिकृत व्यक्तीने दिल्यावरच प्रवेश करावा. एखाद्या लहान मुलाने म्हटले की, या तर मुळीच आत प्रवेश करू नका. 

नियम क्र. 5

परवानगी देण्यासाठी आग्रह धरू नका. वाद तर मूळीच घालू नका. 

नियम क्र. 6.

रिकाम्या किंवा बंद घरातही घर मालकाच्या परवानगीशिवाय प्रवेश करू नका. 

नियम क्र. 7.

घरमालकाने ओळख विचारल्यास आपले नाव आणि ओळख सांगा. 

वरील सर्व नियमावली ही स्त्रियांना त्यांचा निजतेचा अधिकार विनाअडथळा उपभोगता यावा यासाठी केलेली आहे.  याचे कारण असे की, परपुरूषाच्या विखारी नजरा या महिलांना नेहमीच अडचणी उत्पन्न करीत असतात. या संदर्भात मौलाना मौदुदी रहे. असे म्हणतात की, पुरूषासाठी ही गोष्ट योग्य नाही की त्याने आपल्या पत्नी किंवा महेरम स्त्रिया  (रक्ताच्या नात्यातील महिला) यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसर्या स्त्रिला नजरभरून पाहील. एखाद्या वेळेस अचानक परस्त्रीवर नजर पडली तर ती माफ आहे. परंतु यासाठी क्षमा नाही की, एखाद्या व्यक्तीची नजर परस्त्रीवर पडली आणि त्यात त्याला आकर्षण वाटले आणि मग तो सारखा तिला बेशर्मपणे रोखून पाहिल. प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे की, परस्त्रीला रोखून पाहणे नजरेचा व्याभिचार आहे. परस्त्रीशी लाघवीपणे बोलणे जीव्हेचा व्याभीचार आहे. तिचे लाघवी बोलणे ऐकणे कानांचा व्याभिचार आहे. तिला वाईट हेतूने स्पर्श करणे हाताचा व्याभिचार आहे. महिलांचे सौंदर्य पहावे म्हणून त्यांच्याकडे जाणे पायांचा व्याभिचार आहे. व्याभिचाराच्या या सर्व प्रस्तावना पूर्ण झाल्यावर व्याभिचाराची पूर्तता गुप्तांगाकडून होते किंवा पूर्तता होण्यापासून काही कारणांमुळे राहून जाते. 

वरील विवचेनावरून इस्लाममध्ये स्त्रीयांच्या निजतेच्या अधिकाराला किती महत्त्व दिलेले आहे हे वाचकांच्या लक्षात आलेलेच असेल. स्त्री पुरूषांच्या नात्यामध्ये जोपर्यंत एवढे पावित्र्य जपले जाणार नाही तोपर्यंत आदर्श समाज निर्माण होणार नाही. इस्लामने ठरवून दिलेल्या या आचारसंहितेचा स्तर आणि आज समाजाची स्थिती पाहता परिस्थिती किती बिकट आहे याचा वाचकांनी स्वतःच अंदाज बांधावा. नुकतेच अभिनेता रणवीरसिंग यांनी आपले नग्न फोटो समाज माध्यमांवर टाकले असता त्याचे किती कौतुक झाले हे आठवा. विद्या बालन सारख्या नटीने तर निर्लज्जपणे सांगितले की, मर्द ही औरतों के तरफ देखकर अपनी नजरें सेंकते हैं पहली बार औरतों को मौका मिला है हमें भी अपने नजरें सेंकने दें.

एकमेकांच्या घरात येण्या जाण्याचे हे तत्त्वज्ञान फक्त महिलांच्या सोई साठीच नव्हे तर संपूर्ण समाजाला सामुदायिकरित्या नैतिकतेच्या मार्गाने चालणे सुलभ व्हावे यासाठी उपयोगी  आहे. मग कुणाला पटो अगर न पटो. या तत्त्वज्ञानाचा अव्हेरकरून समाजात जे काही सुरू आहे त्याची किंमत फक्त महिला व मुलांना चुकवावी लागते पुरुष नामानिराळे होऊन जातात. हे लक्षात घेतले पाहिजे.

एकंदरित आज समाजामध्ये स्त्री-पुरूष संबंध हे एवढ्या निच्चांकावर पोहोचलेेले आहेत की, इस्लामी शरियतच्या वर नमूद नियमांनी ठरवून दिलेल्या स्तरापर्यंत त्यांना नेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याचा वाचकांनी स्वतःच अंदाज घ्यावा. भारतीय मुस्लिमांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी स्वतः या स्तरावर राहून इतरांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. असे न केल्यास समाजामध्ये जे वाईट परिणाम होणार आहेत त्याचे भोग इतरांबरोबर त्यांनाही भोगावे लागतील.

शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह ! आम्हा सर्वांना स्त्रीयांच्या निजतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची समज आणि शक्ती दे. (आमीन).

- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget