इस्लामी जगताचे मोठे नुकसान
मौलाना जलालुद्दीन उमरी यांचे व्यक्तीमत्व सर्वसमावेशक होते. ते एक उत्कृष्ट लेखक होते. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांचे लेखन ज्वलंत विषयावर असे. त्याची सांगड ते कुरआन आणि हदीसशी घालत. त्यांनी आपले आयुष्य तहेरीके इस्लामीसाठी खर्ची घातले. अल्लाह त्यांना आत्मशांती देओ. - सय्यद सआदतुल्लाह हुसैनी, अध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद.
सय्यद जलालुद्दीन उमरी यांचा जन्म 1935 साली पुट्टाग्राम उत्तरी आर्कोट मद्रास प्रेसिडन्सी ब्रिटिश इंडियामध्ये झाला होता. त्यांचे देहावसान 26 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीच्या ओखला येथील शिफा हॉस्पिटलमध्ये रात्री 8.30 च्या सुमारास वयाच्या 87 व्या वर्षी झाले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण जामिया दारूस्सलाम उमराबाद तामिळनाडू येथे झाले होते. म्हणून ते आपल्या नावासमोर उमरी लावत. याशिवाय त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इंग्रजी भाषेमध्ये पदवी प्राप्त केली होती. सय्यद जलालुद्दीन उमरी हे आपल्या विद्यार्थी दशेपासूनच जमाअते इस्लामी हिंदशी जोडले गेले होते. मात्र अधिकृतरित्या त्यांनी 1956 मध्ये जमाअतची सदस्यता प्राप्त केली होती. तदनंतर जमाअते इस्लामी हिंद अलिगढचे ते 10 वर्षे स्थानिक अध्यक्ष म्हणून राहिले. जमाअतचे उर्दू भाषेतून निघणारे मुखपत्र ’जिंदगी -नौ’ या प्रतिष्ठित मासिकाचे 5 वर्षे संपादक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांना जमाअते इस्लामी हिंदचा उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तेथे त्यांनी चार टर्म काम केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 2007 मध्ये त्यांची जमाअते इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते मार्च 2019 पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.
मौलाना जलालुद्दीन उमरी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामी स्कॉलर होते. त्यांनी अनेक अरबी भाषेतील इस्लामी पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत. त्यांचे स्वतःचे मारूफ व मुनकर, इस्लाम की दावत, मुसलमान औरत के हुकूक और उनपर एतराज का जायजा, सेहत व मर्ज और इस्लाम की तालीमात, इस्लाम में खिदमते खल्क का तसव्वुर, इस्लाम और मानवाधिकार, हमारा समुदाय और राष्ट्र की स्थिती तथा हमारी जिम्मेदारीयाँ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.
अत्यंत साधे राहणीमान आणि उच्च विचाराचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे जलालुद्दीन उमरी होते. 2019 मध्ये जामिया नगर ओखला येथील जमाअते इस्लामीच्या मुख्यालयात सात दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये मला त्यांना जवळून पाहण्याचा अनुभव आला. 2019 पर्यंत जमाअते इस्लामी हिंद सारख्या पुरोगामी संघटनेचा अध्यक्ष राहिलेला हा अवलिया माणूस दीड खोल्यांच्या एका क्वार्टरमध्ये राहत होता. ज्याच्या छताचे पापुद्रे निघालेले होते, भींतीचा रंग उडालेला होता, आतल्या खोलीत एक सिंगल, साधे बेड व समोरच्या अर्ध्या खोलीत एक जीर्ण लाकडी टेबल आणि खुर्ची, त्यावर पुस्तकांचा ढीग, कुरआनच्या अनेक प्रती ही त्यांची एकूण मालमत्ता होती. मेसमधील अतिशय साधे जेवण करून सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याची त्यांची सवय प्रत्येकाला त्यांच्याकडे आकर्षित करत होती. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी ताहयात काम केले. इस्लामच्या प्रत्येक प्रश्नाबाबत ते तोंडी उत्तर देत. अतिशय नम्र स्वभाव आणि मनमिळावू वृत्तीमुळे प्रत्येकजण त्यांना भेटण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहायचा. मी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढण्याची जेव्हा विनंती केली तेव्हा त्यांनी ‘इसकी क्या जरूरत है भाई’ असे म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी हट्ट धरला तेव्हा त्यांनी माझ्या बरोबर एक फोटो काढण्यास संमती दिली.
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इस्लामी विचारवंत नौशाद उस्मान यांनी मौलांनाची एक आठवण समाज माध्यमांवर प्रकाशित केलेली आहे. ज्यात ते म्हणतात, ‘‘भ्रृणहत्येविरोधात जनजागरण अभियानांतर्गत एका पत्रकार परिषदेत मौलाना उमरी यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की, ‘‘मुस्लिम समाजामध्ये सहसा कन्या भ्रृहणत्या होत नाहीत. म्हणून हा तुमच्या नव्हे तर आमच्या मुलींचा प्रश्न आहे. तेव्हा तुम्ही कशाला यावर अभियान राबविता? यावर मौलानांनी इतके हृदयस्पर्शी उत्तर दिले होते की, त्याची नोंद भारतीय इतिहासात झाली पाहिजे. मौलाना म्हणाले होते, ‘‘इस देश की हर बच्ची मेरी अपनी बच्ची है‘‘.
मार्च 2019 मध्ये जेव्हा केंद्र सरकारने जमाअते इस्लामी जम्मू अँड कश्मीर वर प्रतिबंध लावला तर त्या प्रतिबंधाच्या बातमीसोबत मौलाना जलालुद्दीन उमरी यांचा काहीएक संबंध नसतांना त्यांचे छायाचित्र वापरल्यामुळे रिपब्लिकन टिव्हीला मौलांनाची बिनशर्त माफी मागावी लागली होती.
इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी जेव्हा भारत भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी आवर्जुन सय्यद जलालुद्दीन उमरी यांची भेट घेतली होती. ते आदर्श एक व्यक्तीमत्व होते.
जमाअते इस्लामी हिंदचे एकूण पाच अध्यक्ष झाले. त्यापैकी जलालुद्दीन उमरी हे पाचवे अध्यक्ष होते. त्यांच्या पूर्वी अबुलैस इस्लाही, मुहम्मद युसूफ, सिराजुल हसन, डॉ. अब्दुल हक अन्सारी हे अध्यक्ष होऊन गेले. या सर्वांचे वैशिष्ट्ये हे की, यापैकी कोणाचेही एकमेकांशी कुठलेही रक्ताचे नाते किंवा नातेसंबंध नव्हते. शुद्ध मेरिटवर हे निवडले गेले होते. यांच्यापैकी कोणीही आपल्या नातेवाईकांना पुढील अध्यक्ष म्हणून पुढे केलेले नव्हते. जलालुद्दीन उमरी यांच्या मनात आले असते तर त्यांनी एक भव्य मदरसा निर्माण करून आपल्या वारसांना दिला असता. परंतु, ते इस्लामचे सच्चे पाईक व राष्ट्र व मानवतेला समर्पित असे व्यक्तीमत्व होते. खरे तर 87 वर्षाचे यशस्वी जीवन ते जगले आणि आपल्या ज्ञानाचा वारसा मागे ठेऊन गेले. त्यांच्या निधनाने जमाअते इस्लामी हिंदचीच नव्हे तर इस्लामी जगताची मोठी हानी झालेली आहे. यात वाद नाही. अल्लाहकडे प्रार्थना करतो की, मौलाना जलालुद्दीन उमरी यांना जन्नतुल फिरदौसमध्ये स्थान अता करावे आणि त्यांची मग्फीरत करावी. आमीन.
- एम.आय.शेख
Post a Comment