१ मे : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास लेख
महाराष्ट्र राज्याने यशस्वीपणे हीरकमहोत्सवी वाटचाल पूर्ण करून अमृतमहोत्सवाकडे झेप घेतली आहे. महाराष्ट्र राज्याने या बासष्ठ वर्षांत केलेल्या गौरवशाली वाटचालीचा निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद व अभिमान वाटतो आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून पंडित नेहरूंच्या गळी उतरवून आणला, त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते, तथापि आपले राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा वापरून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचे ध्येय साध्य केले, त्यासाठी प्रसंगी स्वकीयांचा रोष ओढवून घेतला. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीने प्रचंड रान उठविले असतांनाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी त्यांनी जो संस्कार मराठी माणसाच्या मनामनात पेरला आहे, तो निश्चितच अढळ आणि चैतन्यदायी आहे, याची प्रचिती गेल्या साठ-बासष्ठ वर्षांत अनेक वेळा आली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी हिरीरीने काम केले आहे.
'राज्य' म्हणून ६२ वर्षांचा काळ अल्प वाटत असला तरी, मानवी आयुष्यातील तीन पिढ्या या काळात झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्थापनेच्या काळातील पिढी आणि आत्ताची पिढी पाहिली की, महाराष्ट्राने केलेल्या गौरवशाली प्रगतीचा आलेख चटकन् डोळ्यासमोर उभा राहतो. रयतेचा, जाणता राजा कसा असावा या आदर्शाची शिकवण राष्ट्राला देणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, देशात स्त्रियांसाठी शिक्षणाची बंद असलेली कवाडे उघडून अविद्येने केलेले अनर्थ नष्ट करणारे महामानव महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, जातीपातीच्या भिंती तोडून दीनदलितांसाठी आपल्या राज्यात आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेऊन समतेचा कृतीशील संदेश देणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज, अष्टपैलू, न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजनीतिज्ञ, आणि समाजसुधारक, दलितांना त्यांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचून त्यांना आत्मसन्मान मिळवून देणारे थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." असं ब्रिटीशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, देशाला सत्य आणि अहिंसा या विचाराने स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी चले जाव चळवळीचा शंख याच महाराष्ट्राच्या सेवाग्राम आश्रमाच्या कुटीतून पुकारला, कर्ते समाजसुधारक आणि दलितांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी अखंड आयुष्य वेचणारे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, बहुजनांना ज्ञानाची गंगोत्री त्यांच्या घरादारात पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या अनेक महामानवांनी हा महाराष्ट्र अत्यंत उदात्त आणि उन्नत विचारांने आणि कृतीने भक्कमपणे उभा केला आहे. विविध विचारप्रवाहाने महाराष्ट्र भूमी फुलली असली तरी सर्वसमावेशकता महाराष्ट्रातील मराठी माणसाने नेहमीच जपला आहे.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या महाराष्ट्राच्या भूमीत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृती आदी विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कर्मयोगी निर्माण झाले आहेत. सुधारक आणि सुधारणांची महाराष्ट्र ही जननी आहे. महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीतील संतांचा वारकरी संप्रदाय देशभरात व्यापून राहिला आहे. आनंदवन, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीचा अधिकार, अशा विविध सामाजिक चळवळी सर्वप्रथम याच भूमीत जन्माला आल्या. समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या जोखडातून मुक्त करणारे परिवर्तनवादी दलित व ग्रामीण साहित्य देखील पहिल्यांदा महाराष्ट्र भूमीतच प्रवाहित झाले. संगीत रंगभूमीचे शिल्पकार आण्णासाहेब किर्लोस्कर यांनी पारशी आणि मराठी नाट्यसंस्कृतीच्या एकत्रिकरणाची किमया १८ व्या शतकात केली, ती या महाराष्ट्राच्या भूमीतूनच.
कला, विज्ञान, अर्थकारण असो की राजकारण, तथा २१व्या शतकातील माहिती व तंत्रज्ञान असो, या क्षेत्रात महाराष्ट्राने एक वेगळा ठसा उमटवला आहे, हे निर्विवाद सत्य सर्वजण मान्य करीत आहेत. अर्थात विविध क्षेत्रातील प्रगतीमुळे महाराष्ट्राची उज्वल व उन्नत विकासाची कमान उत्तरोत्तर चढतीच राहिली आहे.
गेल्या साठ बासष्ठ वर्षात महाराष्ट्र राज्याने अनेक नवनव्या विकासाच्या वाटा शोधत प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला आहे. इतकेच नव्हे तर देशालाही अनेक बाबतीत नवी दिशा दाखविली आहे. ग्रामीण भागांचा कायापालट करणारी सहकार चळवळ आणि विविध सहकारी संस्था ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देण आहे. लोकशाही समाजव्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणारी पंचायतराज व्यवस्था सर्वप्रथम महाराष्ट्राने साकार केली. आज देशभरात राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेची सुरुवात सर्वात आधी सुरू केली ती महाराष्ट्राने. उद्योग क्षेत्रात ही महाराष्ट्र राज्याने देशात नेहमीच आघाडी घेतली आहे.आजही इतर राज्यांतील कष्टकरी कामगार आपल्या रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येण्यास अग्रक्रम देत आहे.
विकासाच्या वाटेवर चालत असताना महाराष्ट्राला अजूनही मोठ्या आव्हानांशी सामना करावा लागतो आहे.शालेय आणि उच्च शिक्षण या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, शिवाय तेथून बाहेर पडल्यावर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, तसेच शिकल्यामुळे या मुलांना शेती करणे कमीपणाचे वाटते, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे शहराकडे धाव घेतात, शहरातील या वाढत्या घूसखोरीमुळे शहरांत मोठ्या प्रमाणात बकालपणा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महात्मा गांधींच्या "खेड्याकडे चला" या विचारधारेचा पूर्ण फज्जा उडाला आहे. त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयात निम्म्या जागांसाठी विद्यार्थी मिळत नाहीत,अशी वस्तुस्थिती आहे. जे उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत, त्यांना योग्य रोजगार मिळत नाही, या पीढीचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. साखर कारखान्यांच्या मळी व रासायनिक वायूमुळे प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण व वायूप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. थेट नदीपात्रात ही मळी व रासायनिक द्रव्ये सोडल्यामुळे झुळझुळ वाहणाऱ्या नद्या प्रदूषित होत आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना पुरेशा सेवा देण्यासाठी ही अधिक व जलद काम होणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे ऊसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, त्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. धरणे आणि कालवे यांचे पाणी बहुतेक ऊसासाठी वळविण्यात आले आहे, त्यामुळे नदी खोऱ्यातील खालच्या पट्ट्यात असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील बागायती शेती ओसाड होत आहे, शिवाय नदीच्या काठावर वसलेल्या गावांना व वाड्यावस्त्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांची आणि संकटांची मालिकाच राज्यासमोर उभी आहे. अर्थात संकटसमयी महाराष्ट्र कधीच मागे हटलेला नाही. कोरोना सारख्या अस्मानी संकटात ही महाराष्ट्र राज्य डगमगले नाही. कोरोनापासून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी राज्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, राखीव सुरक्षा दल, पारिचारिका, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वच घटकांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत.तरीही अशा आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राने अधिक सक्षम,व सावध असणे आवश्यक आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून उपाययोजना तयार ठेवणे गरजेचे आहे.
अलीकडे हिजाब, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा पठण यांसारख्या धार्मिक व सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या घटनांमुळे यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जातीयवादी विचाराने भरडला जातो आहे की काय, अशी भीतीही वाटते आहे, मात्र राज्याने अशा बाबतीत ठोस निर्णय घेऊन ही जातीयवादी विषवल्ली मुळासकट उपटून टाकली पाहिजे.
एकूणच भविष्याविषयी वाटणारी असुरक्षितता, अनिश्चितता व अस्वस्थ वर्तमान बदलण्यासाठी संयमाने तोंड देऊन आपण सारे मिळून अशा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांना नेस्तनाबूत करू या...! सुरक्षित आणि निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संकल्प करून कवी गोविंदाग्रज यांच्या महाराष्ट्र गीतांने आपल्या महाराष्ट्राला मुजरा करूया....!
"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा हा, महाराष्ट्र देशा..!!"
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर, भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
Post a Comment