Halloween Costume ideas 2015

काँग्रेस समोरील आव्हान

कौन दिशा से हम आये थे कौन दिशा अब जाना बाबा!


काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते पक्षावर आपली पकड मजबूत करू पाहता आहेत. तर गांधी परिवाराला पक्षावर निर्णायक नियंत्रण हवे आहे. दोन्ही गट आपल्या भूमिकेत बदल करायला तयार नाहीत. इंदिरा गांधीनी अशा वेळी जो पर्याय निवडला तसा पर्याय गांधी परिवाराकडे उपलब्ध नाही.  

लाल बहादूर शास्त्रीनंतर जेव्हा दिवंगत इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवण्यात आले तेव्हा त्यांचे देशात तर नाहीच काँग्रेस पक्षात देखील काहीच महत्व नव्हते. पक्षावर ज्येष्ठ नेत्यांची पकड मजबूत होती. कामराज काँग्रेस अध्यक्ष होते. अशा वेळी इंदिरा गांधी यांना ज्येष्ठ नेत्यांचे आव्हान संपविण्याचा संकल्प केला. 1966-67 साली काँग्रेसचे त्यांनी विभाजन केले आणि सर्व दिग्गज ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या बाहेरची वाट दाखवली. यासाठी त्यांनी राष्ट्रपती अध्यक्षांच्या निवडणुकीचा उपयोग करून घेतला. पक्षाचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी होते. त्यांना ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा भक्कम पाठिंबा होता. अशा वेळी इंदिरा गांधी यांनी व्ही.व्ही. गिरी यांच्या राष्ट्रपती अध्यक्षांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि त्यांना निवडून देखील आणले. पक्षश्रेष्ठींना वेळ न देता त्यांनी काँग्रेस पक्षाचे विभाजन केले आणि सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाबाहेरची वाट दाखविली. 

सध्या खरे पाहता काँग्रेसची परिस्थिती तशीच आहे. काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते पक्षावर आपली पकड मजबूत करू पाहत आहेत. तर गांधी परिवाराला पक्षावर निर्णायक नियंत्रण हवे आहे. दोन्ही गट आपल्या भूमिकेत बदल करायला तयार नाहीत. इंदिरा गांधीनी अशा वेळी जो पर्याय निवडला तसा पर्याय गांधी परिवाराकडे उपलब्ध नाही. कारण त्यावेळी पक्षाचीच नव्हे तर देशाची धुरा इंदिरा गांधीकडे होती. त्या सत्तेवर होत्या म्हणून त्यांना ते जमलं. गांधी परिवार सत्तेत नाही याचे भान त्यांना राहिले नाही. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कपिल सिब्बल, गुलाम नबी इत्यादींना काँग्रेस पक्षाशी दुरावा केला आणि जी-23 नावाने त्यांची ओळख होऊ लागली. तरी त्यांना काँग्रेस पक्षात विभाजन घडवून आणण्याइतकी सक्षमता त्यांच्यात नाही. एक तर ते तळागाळातील राजकारणातून आलेले नाहीत आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या समर्थक मतदारच नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांचे सुद्धा समर्थन प्राप्त नाही म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षाशी दुरावा केला असेल तरी ते काँग्रेस कार्यालयाच्या वरांड्यात बसलेले आहेत. गांधी परिवार तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसवर आपली पकड कायम ठेवायची असली तरी दोघांना यासाठी काय करावे लागेल हे त्यांना माहित नाही. त्या दोघांना अशा पक्षाशी सामना करायचा ज्याच्या तोडीला दूसरा पक्ष देशातच नव्हे तर जगाच्या कोणत्याही राष्ट्रात नाही. कार्यकर्त्यांचा ताफा त्यांच्याकडे, अफाट धन दौलत त्यांच्याकडे आणि एका मागून एक राज्य जिंकत आपली राजकीय शक्तीचा विस्तार त्यांच्याकडे अशा पक्षाशी गांधी परिवार किंवा ते वरांड्यात बसलेले काँग्रेस नेते कसे करू शकतील? 

राहूल गांधी यांना सोनिया गांधींनी पक्षाध्यक्ष केले. पण राहुल गांधींनी काय करावे काय नाही काय बोलावे, मुस्लिमांच्या बाबतीत बोलायचे की नाही, अख्लाकच्या घरी जायचे नाही हे सगळे नियंत्रण काँग्रेसच्या नेत्यांनी लावले. शिवाय निवडणुकीच्या काळात प्रचारात हे लोक का सहभागी होत नाहीत. प्रचार मोहिमा सभा का घेत नाहीत. हे न समजण्यासारखे कोडे आहे. प्रियंका गांधी ’लडकी हूं मैं लड सकती हूं’ ह्या घोषवाक्याद्वारे उत्तर प्रदेशातील निवडणुकांत यश मिळवतील यासारखी अजब गोष्ट कोणतीच नाही. एक उमेदवार त्या प्रदेशात काँग्रेसचा जिंकून आला ते कशामुळे हा संशोधनाचा विषय असू शकतो. 

सध्या काँग्रेस पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. सोनिया, राहुल, प्रियंका आपल्या राजकीय अस्तित्वासाठी काँग्रेस पक्षावर अवलंबून आहेत. काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही तर त्याचे काय होणार? जी-23 मधली काही मंडळी भाजपाची वाट धरतील. खरे तर आता पासूनच त्यांनी तशी व्यवस्था करून ठेवली असेल. पक्षात वारसा हक्क मिळाला असता तरी पक्ष चालवण्याची कला स्वतःच्या अंगी असावी लागते आणि त्या कलेचा सध्या काँग्रेसमध्ये तुटवडा आहे. भारतातील बहुसंख्य सामान्य माणसाला काँग्रेस पक्ष म्हणजे भारतीयांचा पक्ष भारतीय स्वभावाचा पक्ष वाटत होता आणि आजही आहे आणि ज्या लोकांना काँग्रेसमुक्त भारत करायचे आहे त्यांना पक्षमुक्त नव्हे तर भारतीय स्वभावाचे राजकारण मुक्त भारत करायचे आहे. याची जाणीव जर काँग्रेस नेतृत्वाने ठेवली असती तर पक्षावर हे संकट आले नसते. भारतातील सामान्य नागरिकांना आजही काँग्रेस पक्ष हवा आहे पण त्यांच्या भावना ओळखणारे नेतृत्व काँग्रेसकडे नाहीत. गम्मत अशी की ज्या लोकांना काँग्रेसच्या राजवटीची सवय लागली आहे त्यांचा भाजपाशी असा आग्रह असतो की त्यांनी काँग्रेस पक्षासारखा देश चालवावा. त्यांना हे कळत नाही की भाजपची स्वतःची राजकीय विचारधारा आहे त्यांची स्वतःची आर्थिक निती आहे त्यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून जाहीर केलेले आहे. तेव्हा त्यांच्याकडून धर्मनिरपेक्षतेची आशा बाळगणं आणि त्यावर आग्रह धरणं किती चुकीचे आहे. ते त्यांना कळत नाही. भाजपाला दोष देण्यात काही अर्थ नाही हे पक्ष स्वतःच्या राजकीय धोरण राबवित आहेत. जनतेला काय द्यावे काय देऊ नये, कोणती अर्थकारणे सामान्य जनतेचं भलं होणार याची त्यांना काळजी नाही कारण त्यांचे धोरण उद्योगपतींनी ठरवलेले आहेत. यात सामान्य जनतेचा आर्थिक विकास कुठे बसतोे? 

दूसरीकडे काँग्रेस स्वतःला हिंदुवादी म्हणत आपोआप भाजपाच्या जाळ्यात अडकते. लोकांना हेच कळत नाही की काँग्रेसची हिंदुवादी विचारधारा आणि भाजपाची हिंदुत्ववादी यात काय फरक? योगेंद्रे यादव यांनी एके ठिकाणी असे म्हटले होते की, भाजपाने 90 वर्ष देशावर आपला एजंडा प्रस्थापित करण्यासाठी झटले आहे. तेच इतर पक्षांनी 90 दिवस सुद्धा वैचारिक राजकारणाची दिशा आखण्यासाठी कार्य केले नाही. 

काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यालाच आपला वारसा म्हणून घट्ट धरले. भविष्यात तो वारसा कसा पुढे नेहायचा यासाठी वैचारिक मंथन तर नाहीच त्यावर विचार सुद्धा केला नाही. दिवंगत इंदिरा गांधीनी आपल्या सृजनशील नेतृत्वाच्या बळावर काँग्रेसचा स्वातंत्र्याचा वारसा पुढे चालविला. सोनिया गांधी यांनी येनकेन प्रकारेन पुढच्या दहा वर्षासाठी ही परंपरा जपली. पण आता त्यांच्यानंतर कोणी हा प्रश्न काँग्रेसला भेडसावत आहे. 

जर एखाद्या पक्षाला कॉरपोरेटच्या धर्तीवर सीईओची नेमणूक करून पक्ष चालवायची गरज पडत असेल तर तो पक्ष राजकीयदृष्ट्या संपल्यातच जमा आहे. प्रशांत किशोर यांना पक्षात घेऊन त्यांच्या निवडणूक रणनीति नुसार पक्ष चालवायचा विचार करण म्हणजे राजकीय दिवाळखोरी शिवाय काही नाही, कोणत्याही पक्षाचे हजारो लाखो कार्यकर्ते असतात त्यांच्याकडे अनेक राजकीय यु्नत्या तसेच त्यांना मतदारांची मानसिकता माहिती असते. हे सगळं एकट्या निवडणूक रणनीतितज्ञाकडे नसते. कार्यकर्ते लाईव्ह भांडवल असतात. सल्लागाराकडे हे सर्व नसतात. 

मुस्लिम हे काँग्रेसच्या एकेकाळचा व्होट बँक होता. भाजपाने अत्यंत चालाखीन टप्प्या टप्प्याने हे संपवले. बाबरी मस्जिद प्रकरणाने मुस्लिम दुरावले. त्यानंतर काँग्रेसच्या काळी आतंकवादी हल्ल्यात मुस्लिम तरूणांना गोवण्यात आले. यामुळे मुस्लिम काँग्रेसपासून अधिक दूर झाले. भाजपा सत्तेवर आल्यानंतर मुस्लिमांचा छळ सुरू झाला. काँग्रेस पक्षाने यापासून आपले डोळे, कान आणि तोंड (महात्मा गांधीचे तीन पुतळे) बंद करून घेतले. काही झाले तरी तोंडातून मुस्लिम हा शब्द बाहेर काढायचा नाही. हे काँग्रेसच्या नेत्यांनी राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांना विवश केले. या मागची भूमीका कोणाची हे सर्वश्रुत आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की सध्याचे राजकारण व्यवसायासारखे झाले आहे. इतर कोणत्याही उद्योगधंद्यात इतकी कमाई नाही जितकी या व्यवसायात आहे. राजकीय विचारधारा, नितीमत्ता वगैरे गोष्टी इतिहासजमा आहेत. 25 एक कोटी गुंतवले आणि जिंकून आले की त्यांचे 1000 कोटी व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे संपत्तीद्वारे सत्ता आणि सत्तेद्वारे जास्तीची संपत्ती असा हा व्यवसाय बनलेला आहे. 

गांधीवादी विचार नेहरू इंदिरा परंपरा वगैरेचा काळ उलटून गेला. भाजपाचे राजकीय धोरण सर्वांना माहित आहे. पण त्याचे शेवटचे उद्दीष्ट मोजक्यांनाच माहित. ज्यांना माहित नाही त्यांना याची काळजीही नाही. आर्थिक धोरण म्हणजे लोकांना एक वेळेचे जेवण पुरे की दोन वेळचे. या गणितावर तो आधारित आहे या पलिकडे काहीच नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवण्याचा लढा चालू ठेवायचा आहे. काँग्रेस नेतृत्वाबरोबरच त्यांच्या कार्यकर्त्यांची अशी गत झाली आहे की कोणत्या दिशेने ते इथपर्यंत पोहोचले आणि आता कोणत्या दिशेने त्यांना जायला हवं हेच त्यांना कळत नाही. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget