(१०४) आम्ही त्याच्या आणण्यात काही फार जास्त दिरंगाई करीत आहोत असे नाही, बस्स एक ठराविक वेळ त्याच्यासाठी निश्चित आहे.
(१०५) जेव्हा ती येईल, तेव्हा कोणाची बोलण्याची बिशाद राहणार नाही, याखेरीज की एखाद्याने अल्लाहच्या अनुमतीने काही विनंती करावी.१०६ मग काही लोक त्या दिवशी दुर्दैवी असतील व काहीजण सुदैवी.
(१०६,१०७) जे दुर्दैवी असतील ते नरकात जातील. (तेथे उष्णता व तहानेच्या अतिरेकाने) ते उसासे टाकतील आणि हुंकार देतील आणि त्याच स्थितीत ते सदैव राहतील जोपर्यंत आकाश व पृथ्वी टिकून आहेत,१०७ याखेरीज की तुझा पालनकर्ता जी इच्छा करील. नि:संशय तुझा पालनकर्ता पूर्ण अधिकार राखतो की जी इच्छा असेल ते करतो.१०८
(१०८) उरले ते लोक जे भाग्यवान ठरतील ते स्वर्गामध्ये जातील आणि तेथे सदैव राहतील जोपर्यंत आकाश व पृथ्वी टिकून आहेत, याखेरीज की तुझ्या पालनकत्र्याने काही अन्य इच्छा करावी.१०९ असले बक्षीस त्यांना मिळेल ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही.
(१०९) म्हणून हे पैगंबर (स.)! तू त्या उपास्यांच्या बाबतीत कोणत्याही शंकेत पडू नकोस ज्यांची हे लोक उपासना करीत आहेत. हे तर (परिपाठाचे अंधानुकरण करणारे बनून) त्याचप्रमाणे पूजाअर्चा करीत आहेत ज्याप्रमाणे पूर्वी यांचे वाडवडील करीत होते,११० आणि आम्ही यांचा हिस्सा यांना भरपूर देऊ इतका की त्यात कसलीही काटकसर केली जाणार नाही.
१०६) म्हणजे हे नादान लोक या भरोशावर आहेत की अमुक महाभाग आमची शिफारस करून आम्हाला वाचवतील. अशा महाभागांचे म्हणणे अल्लाह टाळू शकत नाही, अशी त्यांची गैरसमजूत असते. परंतु अल्लाहच्या दरबारात कोणाचेही काही चालणार नाही, जोपर्यंत स्वत: अल्लाह सर्व सत्ताधीशांचा सत्ताधीश कोणाला त्याच्यासमोर बोलण्याची परवानगी देईल. म्हणून लोक आपल्या बनावटी उपास्यांच्या, संताच्या, पीर, वलीच्या शिफारशीवर भरोसा करून बसलेेले आहेत, त्या सर्वांना तिथे भारी निराशा होईल.
१०७) येथे अभिप्रेत परलोकाचे आकाश व जमीन आहे किंवा फक्त म्हणीच्या रूपात 'सदासर्वदा' या अर्थाने वापरले आहे. वर्तमान जमीन व आकाशसाठी हा शब्द प्रयुक्त झाला नाही. कारण कुरआनच्या वर्णनाच्या प्रकाशात हे दोन्ही कयामतच्या दिवशी बदलून टाकले जातील आणि येथे ज्या घटनांचा उल्लेख होत आहे त्या कयामतनंतर घडणार आहेत.
१०८) म्हणजे दुसरी अशी शक्ती नाही जी या लोकांना शाश्वत कोपापासून वाचविल, परंतु अल्लाह स्वत: एखाद्याच्या परिणामाला बदलू इच्छितो किंवा एखाद्याला शाश्वत शिक्षेऐवजी मर्यादित काळापुरती शिक्षा देऊन माफ करू इच्छितो तर असे करण्याचा पूर्ण अधिकार त्या अल्लाहकडे आहे. कारण सर्व नियमांचा निर्माता तोच आहे. कोणताच असा दुसरा नियम नाही जो अल्लाहच्या अधिकारांना सीमित करू शकतो.
१०९) म्हणजे त्यांचे स्वर्गात राहाणे, एखाद्या सर्वोपरी नियमांवर आधारित नाही ज्यामुळे अल्लाहला असे करणे भाग पडले. परंतु ही पूर्णत: अल्लाहची कृपा असेल की तो त्यांना स्वर्गात ठेवील. अल्लाह त्यांचे भाग्य बदलण्याचा पूर्ण अधिकार बाळगून आहे.
११०) याचा अर्थ असा नाही की पैगंबर मुहम्मद (स.) खरोखर त्या उपास्यांविषयी शंकेत होते, किंबहुना हे पैगंबर मुहम्मद (स.) यांना संबोधित करून सर्वांना सांगितले जात आहे. म्हणजे एखाद्या विवेकशील माणसाला या शंकेत राहाता कामा नये की हे अनेकेश्वरवादी ज्या उपास्यांची उपासना करतात आणि त्यांच्याशी प्रार्थना करतात तर त्यांना काहीतरी अनुभूती झाली असेल म्हणूनच ते त्या उपास्यांपासून लाभाची आशा ठेवून आहेत. सत्य हे आहे की या उपासना, भेट, नैवेद्य, प्रार्थना इ. ज्ञान, अनुभव आणि निरीक्षणाच्या आधारावर नसून सर्वकाही अंधश्रद्धेच्या पोटी होत आहे. शेवटी हीच वेदी व आस्थाने व उपास्य मागील पिढीतसुद्धा होते आणि अशाच तथाकथित करामती त्यांच्यात प्रसिद्ध होत्या. पंरतु जेव्हा अल्लाहचा कोप झाला तर त्यांचा सर्वनाश झाला आणि हे वेदी व आस्थाने जागेवरच राहिले.
Post a Comment