(जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष - १७ मे २०२२)
उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दाब वाढतो, या दबावाच्या वाढीमुळे, रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह राखण्यासाठी हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते. उच्च रक्तदाबामध्ये, हृदयावर रक्त पंप करण्याकरिता ताण वाढतो त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात आणि हृदयविकार, स्ट्रोक आणि काहीवेळा मृत्यूचा धोका सुद्धा वाढतो, उच्च रक्तदाब मूक मारेकरी म्हणून काम करीत असतो. जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी 17 मे रोजी जगभरात जनजागृतीसाठी साजरा केला जातो. या वर्षी जागतिक उच्च रक्तदाब दिन 2022 ची थीम आहे "तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, नियंत्रित करा, दीर्घायुष्य जगा".
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि इतर रोगांचा धोका वाढतो. आफ्रिकन देशात उच्चरक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक आहे (27%), तर यूएसमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात कमी आहे (18%). जगभरातील 30-79 वर्षे वयोगटातील अंदाजे 1.28 अब्ज प्रौढांना उच्च रक्तदाब आहे, त्यापैकी बहुसंख्य (दोन तृतीयांश) कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. उच्च रक्तदाब असलेल्या अंदाजे 46% प्रौढांना या स्थितीबद्दल माहिती नसते. उच्च रक्तदाब असलेल्या निम्म्याहून कमी प्रौढांचे (42%) निदान आणि उपचार केले जातात. उच्च रक्तदाब असलेल्या 5 पैकी 1 प्रौढ व्यक्तीमध्ये (21%) हे नियंत्रणात असते. उच्च रक्तदाब हे जगभरातील अकाली मृत्यूचे प्रमुख कारण आहे.
लॅन्सेट अभ्यासानुसार 2016 मध्ये भारतातील एकूण मृत्यूंपैकी 28.1% मृत्यू हृदयरोग आणि स्ट्रोकचे होते. उच्च रक्तदाब हा मृत्यू आणि अपंगत्वाचा चौथा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. भारतातील सुमारे 200 दशलक्ष प्रौढांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. भारतात उच्च रक्तदाब निदानाचा दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे. देशातील 60% ते 70% पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या वास्तविक स्थितीबद्दल अनभिज्ञ आहेत. 200 देशांमध्ये उच्च रक्तदाब निदान दरामध्ये भारत महिलांसाठी 193 वा आणि पुरुषांसाठी 170 व्या क्रमांकावर आहे. अशा कमी निदानामुळे उच्च रक्तदाबाचा रोग जीवघेणा ठरतोय, ज्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात, उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांची (30-79 वर्षे) टक्केवारी 1990 मध्ये 25.52% वरून पुरुषांमध्ये 30.59% आणि 26.53% महिलांमध्ये 29.54% पर्यंत वाढली आहे.
भारतात उच्चरक्तदाबाचे लवकर निदान आणि चांगले उपचार केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे ओझे कमी होईल. असा अंदाज आहे की भारतातील सिस्टोलिक ब्लड प्रेशरमध्ये 2 मिमी-व्यापी घट झाल्यामुळे कोरोनरी धमनी रोगामुळे होणारे 151,000 मृत्यू आणि स्ट्रोकमुळे 153,000 मृत्यू टाळता येतील. उच्च रक्तदाब कमी केल्याने हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे नुकसान तसेच इतर आरोग्य समस्यांपासून संरक्षण होते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे जसे की: उच्च रक्तदाबावर डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे, मिठाचे सेवन कमी करणे (दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी), फळे आणि ताज्या हिरव्या, अंकुरलेल्या भाज्या खाणे, तळलेले- पापड, लोणचे, चाट- मसाला सारख्या पदार्थ टाळणे. नियमित व्यायाम, चालणे-फिरणे, सायकल चालवणे, साधे-सोपे शारीरिक व्यायाम करणे जसे एरोबिक, पोहणे, संतुलित वजन राखणे, सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहणे, पौष्टिक आहार घेणे आणि संपृक्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे, आता तर आधुनिक जीवनशैली पासून ही अंतर राखणे गरजेचे झाले आहे. तणाव कमी करणे, आनंदी वातावरण राखणे, सकारात्मक विचार करणे, रागाचा भार आपल्यावर न येऊ देणे, विचारशक्ती वाढवणे, शारीरिक आणि मानसिक बळकटीसाठी योगासने करणे महत्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्या-पिण्यावर योग्य नियंत्रण ठेवणं, कारण जिभेचा थोडाश्या चवीकरीता संपूर्ण शरीर बिघडवणं आणि महागड्या आजारांना बळी पडणं हे कुठलं शहाणपणाचं आहे. या विषयाचा सखोल विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
आज प्रत्येकजण दगदगीच्या वातावरणात स्वतःला व्यस्त ठेवण्यात मग्न आहे. अन्नातील भेसळ, प्रदूषण, गोंगाट, असंस्कृत वर्तन, निसर्गाचे अति शोषण, यांत्रिक संसाधनांचा अतिवापर, यामुळे जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तणावमुक्त जीवनाद्वारे आपण उच्च रक्तदाब तसेच अनेक घातक आजारांपासून दूर राहू शकतो. तणाव नियंत्रणात ठेवणे आपण आपल्या देशातील नेत्यांकडून शिकले पाहिजे. नेत्यांचे वय कितीही असो, सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, त्याच्यावर कितीही गंभीर आरोप झाले असेल, किंवा कोणी त्याच्याबद्दल अपशब्द वापरले, कडवट भाषा वापरली असेल, नेते नेहमी पुढे जाण्याचा प्रयंत्न करतात, प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहून संयम दाखवतात, प्रत्येक परिस्थितीत सक्षम राहतात, आशा सोडत नाही, सर्व पक्षांशी संपर्क ठेवतात, दिनक्रम कितीही व्यस्त असले तरी ते नेहमी उत्साही दिसतात, सामान्य माणसाप्रमाणे ते लहानसहान गोष्टींवर आपला संयम गमावत नाहीत, ही जिंदादिली प्रत्येक माणसाने शिकली पाहिजे. परोपकाराची भावना बाळगा आणि सद्गुण घ्या, समाधानी व्हायला शिका, निसर्ग नुरूप जगायला शिका, आनंदी रहा, तणावमुक्त जीवन जगा.
- डॉ. प्रितम भि. गेडाम
मोबाइल नं. 082374 17041
Post a Comment