रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेळोवेळी हिंदू-मुस्लिम, एकूणच सांप्रदायिक सद्भावाविषयी आपले मत मांडले आहे. सध्या ते चर्चेत आहेत, ‘येत्या पंधरा वर्षांत अखंड भारत साकार करणार’ या घोषणेबाबत. मागेसुद्धा अखंड भारताविषयी त्यांनी एका कार्यक्रमात आपले मत मांडले होते. त्याचे आम्ही स्वागत केले होते. या वेळी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचे स्वागत आहे. आणि आता त्यांनी गेल्या महिन्यात देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये रामनवमीप्रसंगी झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या विचारांशी सहमती व्यक्त करत त्यांचे स्वागत करत आहोत. सरसंघचालक असे म्हणतात की जे लोक हिंसा करतात, हिंसेवर विश्वास ठेवतात त्यांनी हे जाणून घ्यावे की आता अशी कृती करणाऱ्या हिंसाचारी लोकांचे दिवस संपून गेले आहेत. ते म्हणाले की आम्हाला सर्व लोकांची साथ घेऊन मानवतेचे रक्षण करावे लागणार आहे. हिंसेमुळे कुणाचाही फायदा होत नसतो. तेव्हा आम्हाला याचे भान ठेवायला हवे की ज्या लोकांना हिंसा प्रिय आहे, ज्यांचा हिंसेवर विश्वास आहे त्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की आता त्यांचे दिवस संपले आहेत. मोहन भागवत यांनी या अगोदरदेखील सामाजिक सद्भावनेवर जोर देत सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान केले होते. पण दुर्दैव असे की त्यांच्या त्या विधानानंतर काही महिन्यांतच देशाच्या विविध भागांत काही समाजकंटकांनी हिंसाचार माजविण्याची मालिकाच सुरू केली आहे. त्यांनी त्या वेळच्या भाषणात असेदेखील म्हटले होते की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. तेव्हा आपसात विविध धार्मिक आस्थांमुळे भेदभाव करणे गैर आहे. अशाचवेळी मागे त्यांनी एकदा असेच विचार व्यक्त केले होते. यावेळी ते असेही म्हणाले होते की डॉ. हेडगेवार म्हणतात, हिंदुंनी आपल्या दुरवस्थेला इंग्रज आणि मुस्लिमांना दोषी ठरवू नये. तुम्ही आपल्या देशाचे मालक आहात. तुमची संख्या एवढी मोठी आणि तुमचे विचारदेखील उच्च प्रतीचे असताना तुम्ही इतरांना दोष देण्याचे कारण काय? डॉ. भागवत म्हणतात की, मुस्लिमांना ते तथाकथित अल्पसंख्याक मानत नाहीत. ते याच देशाचे नागरिका आहेत. तरीदेखील बहुसंख्यकांकडून अत्याचार होण्याची भीती त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला नको. इस्लाम धर्म या देशातून संपणार नाही, असेही ते म्हणाले होते. इतर राष्ट्रांमध्ये असे लोत असेल, पण भारतात जे एकदा आले ते कधीच संपणार नाहीत. डॉ. भागवतांनी आणखीन बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. यापुढेही सांगत राहतील. प्रश्न असा की मग त्यांच्या विचारांना हिंसावादी विचारसरणीचे लोक प्रतिसाद का देत नाहीत? वेळोवेळी शांततेच्या गोष्टी सांगण्याचा मग उपयोग काय? खरी गोष्ट अशी की सध्या देशाच्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या भीतीपोटी लोक नको त्या गोष्टी करत आहेत. दुसरी गोष्ट अशी की सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळतसल्यास हीसुद्धा एक प्रकारची हिंसा आहे. लोक अधिक विषमतेमुळे त्रस्त आहेत. जेव्हा देशाच्या १० टक्के नागरिकांकडे देशाची ५८ टक्के संपत्ती एकवटली असेल आणि त्यातही एक टक्का लोकांचा देशाच्या ८० टक्के मालमत्तेवर ताबा असेल तर ही जी हिंसा आहे त्यामुळेच इतर प्रकारच्या हिंसेचा उगम होतो, याकडेदेखील सरसंघचालकांनी लक्ष दिले पाहिजे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment