Halloween Costume ideas 2015

मा. डॉ. अंजुम कादरी यांचे स्वागताध्यक्षीय भाषण


१६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे नुकतेच पार पडले. प्रथमच एक मुस्लिम महिला या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवडली गेलीय. प्राप्त राजकीय, सामाजिक परिस्थितीत एका मुस्लिम महिलेच्या नेतृत्वात होणारे हे संमेलन ऐतिहासिक असे होते. त्या स्वागताध्यक्ष म्हणून करणार असलेले भाषण देखील भूमिकांच्या बाबतीत खूप धाडसी आहे.

१६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या तमाम रसिक, वाचक, श्रोते आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे उदगीरच्या ऐतिहासिक भूमीत मी स्वागत करते. माणसाच्या विकासाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या उदयगिरी महाराज आणि सुफी हजरत शाह मोहम्मद कादरी यांची ही कर्मभूमी आहे. अनेक संस्कृतींना आणि मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या विचारांना उदगीरने आपल्यात सामावून घेतले आहे. त्यामुळे उदगीरमध्ये सांस्कृतिक बहुलता आढळते. या सांस्कृतिक बहुलता असणाऱ्या शहरात बहुसांस्कृतिकतेच्या संकल्पनेवर आधारित हे संमेलन होत आहे. उदगीर जशी मराठी बोलणाऱ्यांची माउली तशी ती कानडी, उर्दू, दखनी बोलणाऱ्यांची आश्रयभूमी आहे.  उदगीरपासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर समताशिरोमणी बसवण्णांची कल्याण नगरी आहे. त्यांनी दयेवर आधारित धर्माची संकल्पना मांडली. दयेशिवाय, प्रेमाशिवाय धर्म असू शकत नाही हे सांगताना ते म्हणतात,

‘दये इल्लद धर्म याउदय्या

दयेवे बेकु सकल प्राणीगळेरल्ली

दये वे धर्मद मुलवय्या’

हाच बसवण्णांचा दयाभाव दखनीतही अवतरला.  दखनीचा गालिब असणाऱ्या मुल्ला गवासीने जिथे चिरनिद्रा घेतली ते निलंगा शहर बसवकल्याणप्रमाणेच उदगीरची सांस्कृतिक पाठराखण करत आले आहे. मराठी प्रागतिक विचारांच्या चळवळीचे नेतृत्व करणारे ना. य. डोळे आणि सुफी तत्वज्ञानाला नवी दिशा देणारे कुतूब ए दखन मौलाना अ. गफूर कुरैशी यांच्यासारखे सुपूत्र या उदगीरनगरीने घडवले आहेत. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनीही याच उदगीर परिसरात आपल्या कर्तृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माउलीसारखेच प्रेम कानडी आणि उर्दू या आमच्या मावश्यांनीही उदगीरवर केले आहे. उदगीरची मराठीतील साहित्यनिर्मिती पुरोगामी विचारांना अधोरेखित करणारी आहे. तर उर्दू साहित्यानेही मानवी जाणिवांना पुन्हा बळ दिले आहे. उदगीरच्या भुगोलात वसलेल्या लोकसंस्कृतीतूनच  उर्दूची आई असणाऱ्या दखनीचा जन्म झाला आहे. दखनी अस्मितेचा आग्रह धरत हसन गंगू बहामनी यांनी उत्तरेच्या आक्रमणाला रोखले. आणि उदगीरच्या नजीक बिदरला आपली राजधानी स्थापन केली. या राजधानीतच महमूद गवान यांनी जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठातूनच कालांतराने दखनीला समृध्द करणाऱ्या मुल्ला शजी, वजालती, अहमद बगदादी, शाज नुरी सारखे साहित्यीक जन्मले. आणि दखनभूमीला त्यांनी समृध्द केले. दखनी राष्ट्रवादाला जन्म दिला. मुल्ला वजही सारखा शायर दखनीत दखनभूमीविषयी म्हणतो– 

‘‘दखन सा नई ठार संसार में

पंज फजीला का है ठार में

दखन है नगीना, अंगुठी है जग, अंगुठी कूं हरमत नगीना है लग।

के सब मुल्क सर, होर दखन ताज है।’’

अशी बहुसांस्कृतिकता असलेल्या दखनेने कधीही धार्मिक भेदभावाला थारा दिला नाही. इथे तुकाराम महाराजांचे गुरु शेख चांद बोधले होते. तर लाडले मशायख यांना चैतन्यस्वामी म्हणून हिंदूनी आपलेसे केले आहे. बंदानवाज यांचा ‘चक्कीनामा’ असो वा त्यांचे वडील राजू खत्ताल यांचा ‘ सुहागननामा’ हे सारे ग्रंथ दखनी अस्मितेसह हिंदू- मुस्लिम एकतेची साक्ष देतात. 

‘शेख महंमद अविंध त्याच्या हृदयी गोविंद’ म्हणणारे शेख मंहंमद असो वा जंगली महाराज म्हणून नावारुपाला आलेले जंगलशाह कादरी हे सारेच दखनी समाजाने मानवी समाजाला दिलेले हिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे बाबा याकुत आणि शाहू महाराजांच्या दरबारातील लहरी हैदर हे दखनी भिमा-कृष्णा प्रेम संस्कृतीतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत.

त्यामुळेच दखनेत निर्माण झालेल्या मुस्लिम सत्तादेखील सहिष्णू होत्या. आदिलशाहीसारखी प्रमुख राजवट बिदरच्या आश्रयाला आलेल्या युसुफ शाहनेच स्थापन केली होती. उदगीरला तो अनेक दिवस वास्तव्याला होता. म्हणूनच त्याच्या आदिलशाही राजघराण्यात मल्लू आदिलशाह, पार्वती आदिलशाह, किशोर आदिलशाह अशी हिंदू संस्कृतीशी समन्वयाची भूमिका घेणारी नावे आढळतात. बिदरमधूनच कुतूबशाहीची मुहुर्तमेढ रोवली गेली. कुतूबशाही हीच खऱ्या अर्थाने दखनी भाषेची आश्रयदाती राजवट होती. पण कालांतराने उत्तरेच्या आक्रमणापुढे दखनी राजवटी कोसळल्या पण दखनेतला सद्‌भाव संपला नाही. दखन ही खऱ्या अर्थाने माणूसकीची, माणसांची भूमी आहे. आणि उदगीर हे दखनेच्या सर्व सांस्कृतिक राजकीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे. 

त्यामुळे इथे होणारे हे संमेलन ऐतिहासिक ठरले आहे. त्यासोबतच या संमेलनाला वर्तमानातील अतिशय गंभीर अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. केंद्रातील सत्ता मानवी समाजाला काळीमा फासत आहे. अमीर खुसरोंच्या स्वप्नातील माणसाचा हा देश या सत्तेने झुंडीच्या हवाली केला आहे. आसिफासारख्या कोवळ्या लेकरावर बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनार्थ देशात तिरंगा रॅली काढली जात आहे. तर झुंडहत्येतील आरोपीच्या प्रेतावर तिरंगा पांघरला जात आहे. ज्या तिरंग्याला लाल किल्ल्यावरील युनियन जॅकच्या ठिकाणी फडकवण्यासाठी मुस्लिम समाजातील हजारो सुपुत्रांनी प्राण दिले. त्याच समाजाला आज सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. ही भूमी जशी गांधीची तशी ती मौलाना आझादांची आहे. जशी शिवाजी महाराजांची तशी टिपू सुलतानची आहे. जशी भगतसिंगची तशी ती हुतात्मा कुर्बान हुसैन यांचीही आहे. पण आता मुस्लिमद्वेषापोटी या सर्व इतिहासातून एका विशिष्ट समाजाला वगळले जात आहे. 

मुस्लिमद्वेष हा मुख्य सामाजिक आणि राजकीय विचार बनत चालला आहे. मागे नागरिकत्व सुधारणा कायद्यातून अशाच पध्दतीने मुस्लिमांना नागरिकत्वापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. राजकीय निर्णय प्रक्रियेतून मुस्लिम समाजाला बाद ठरवण्यात आले आहे. इतक्या टोकाच्या राजकीय विचारांच्या काळात आपण जगत आहोत. तेंव्हा पुरोगामी, डावे आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. उदगीर शहराने सातत्याने या झुंडशाहीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक समतेच्या चळवळींची पाठराखण केली आहे. याच शहरात शाहीनबागच्या धरतीवर माझ्या नेतृत्वाखाली गांधीबाग आंदोलन आम्ही यशस्वी करुन दाखवले आहे. देशभरातील विद्यार्थी नेते, क्रांतिकारी शाहीर, कवींनी सत्तर दिवस चाललेल्या या आंदोलनाला भेटी दिल्या आहेत. 

या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या प्रासंगिक मुस्लिम महिला नेतृत्वाला विद्रोही सांस्कृतिक चळवळीने सांस्कृतिक नेतृत्व दिले आहे. ही खरी तर माझ्यासाठी भारावून टाकणारी अतिशय भावूक घटना आहे. पुरुषी वर्चस्ववादाने ग्रासलेल्या समाजासमोर महिलेचे नेतृत्व पुढे केले जातेय ही परिवर्तनवादी घटना आहे. भारतीय महिलांसाठी ती एकादृष्टीने सामाजिक न्यायाची आहे. तर दुसऱ्या बाजुने राजकीय - सामाजिक अस्पृश्यता लादल्या जात असलेल्या मुस्लिम समाजासाठी ही सन्मानाची बाब आहे. उदगीर हे पूर्वी हैदराबाद संस्थानातील एक महत्त्वाचे शहर होते. बिस्मिल्ला बिलग्रामी नावाच्या आमच्या माउलीने १८३० मध्ये स्त्री शिक्षणासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. तिच्या बंडाचा आवाज उदगीरपर्यंत ऐकू आला होता. आणि त्याच बंडाची परिणीती आज मुस्लिम महिलेला सांस्कृतिक नेतृत्व प्रदान करण्यात झाली आहे, असे मी मानते. हा माझा एकटीचा सन्मान नसून बिस्मिल्ला बिलग्रामी, सावित्रीमाई, बेगम हजरत महल, मुक्ता साळवे, रमाईचा सन्मान असल्याचे मी मानते. 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक न्यायासाठी विद्रोही चळवळीने लढा दिला आहे. एक मुसलमान महिला म्हणून मी माझ्या समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वाची मागणी येथे करत आहे. हे सांस्कृतिक प्रतिनिधित्व शहरांच्या नामकरणातून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादचे नामांतर हे त्याचाच एक भाग आहे. मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून त्या नामकरणाला विरोध करते. कारण औरंगाबाद शहर हे खऱ्या अर्थाने दखनी मुस्लिमांचे सांस्कृतिक केंद्र आहे. त्या शहरातूनच दखनी मुस्लिम समाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथे दखनी मुस्लिम संस्कृतीच्या समतेचे प्रतिक असणाऱ्या मलिक अंबर यांची समाधी आहे. सातशे सुफी संतांनी या भूमीतूनच आपल्या कार्याला सुरुवात केली होती. हे शहर वसवण्यासाठी मुस्लिम समाजाने प्रचंड योगदान दिले आहे. किंबहुना हे शहर दखनी मुस्लिम संस्कृतीची ओळख आणि अस्मिता आहे. त्यामुळे त्याचे नामकरण करणे याचा अर्थ दखनी मुस्लिम समाजाशी सांस्कृतिक विषमतेचा व्यवहार करण्यासारखे होईल. जर औरंगाबादचे नाव बदलायचेच असेल तर त्याला ज्येष्ठ विचारवंत शरद पाटील यांच्या सुचनेप्रमाणे मलिक अंबरची स्मृती म्हणून अंबराबाद हे नाव देणे संयुक्तिक ठरेल. त्यासोबतच मी या विचारपीठावरुन कर्नाटकातील कलबुर्गी आणि विजयपुरा या शहरांना त्यांचे जुने नाव बहाल करण्याची मागणी करत आहे. 

उदगीर शहर पूर्वी हैदराबाद प्रांतात होते. ऑपरेशन पोलोद्वारे त्याचे विलीनीकरण करण्यात आले. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात दखनी मुस्लिम समाजावर मोठे अत्याचार झाले. त्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी सुंदरलाल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने प्रचंड कागदपत्रे गोळा करुन, सखोल संशोधनाद्वारे अहवाल सादर केला होता. हा अहवाल आजही जाहीर केलेला नाही. विलीनीकरणाचे रौप्यमहोत्सव पुढील वर्षी सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर दखनी मुस्लिम समाजासोबत न्यायाची भूमिका भारत सरकारने घ्यायला हवी. 

विलीनीकरणापासून आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढलेला नाही. उदगीर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल अथवा नागरी सुविधांचा मागील ७५ वर्षात तो सुटलेला नाही. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. रोजगार नसल्याने येथील युवकांना पुणे – मुंबई सारख्या शहरात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध झाल्या नाहीत तर स्थलांतरीतांचे लोंढे वाढतील. आणि मराठवाडा आधिकाधीक बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या मुद्यांकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या नव्या संधी येथे निर्माण झाल्या पाहिजेत. मराठवाड्याची संस्कृती जपण्यासाठी बसव-सुफी संस्कृती विद्यापीठाची स्थापना उदगीर येथे व्हावी अशी मागणी मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष या नात्याने करत आहे. 

सरतेशेवटी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आभार मानते. विशेषतः संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते, प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, किशोर ढमाले, नितीन सांगवे, कॉ. राजू पाटील यांचे आभार मानते.

धन्यवाद. 

जय भारत, जय संविधान!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget