प्रेषित मुहम्मद (स.) प्रबोधन करताना असे म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती कोणता गुन्हा करते आणि नंतर त्यावर पश्चाताप व्यक्त करते आणि त्याबाबत अल्लाहकडे क्षमायाचना करते, तेव्हा अल्लाह म्हणतो की माझ्या भक्ताला हे माहीत आहे की त्याचा एक विधाता आहे जो त्याचा गुन्हा माफ करतो आणि गुन्हा झाल्यास त्याची पकड करतो, म्हणून मी त्याला क्षमा करून टाकले. दुसऱ्या वेळी त्याच्याकडून गुन्हा घडतो आणि तिसऱ्या वेळीही गुन्हा घडतो त्यावर अल्लाह म्हणतो त्याला हवं ते करू द्या जोपर्यंत तो पश्चात्ताप करत राहील मी त्याला माफ करत राहणार.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, तुम्ही एकमेकांवर दया करत जा, मी तुमच्यावर कृपा करीन. तुम्ही एकमेकांना माफ करत राहा, तुम्हाला क्षमा केली जाईल. जे लोक एका कानाने भल्या गोष्ट ऐकतात आणि दुसर्या कानाने बाहेर काढून टाकतात अशा लोकांचा विनाश होतो आणि जे लोक आपल्या कुकर्मावर ठाम राहतात आणि त्यांना हे माहीत असते की कुकृत्याची माफ होऊ शकतात, तरीदेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, अशा लोकांचा विनाश होतो. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की जर एखाद्या व्यक्तीकडून कोणते कुकृत्य घडले असेल, त्याने स्वतःवर अत्याचार करून घेतला असेल आणि त्यावर अल्लाहची क्षमा मागितली असेल तर अल्लाह त्याला माफ करणार आहे.
हजरत अनस (र.) म्हणतात, एके दिवशी मी प्रेषित (स.) यांच्या बरोबर होतो. तेव्हा एक माणूस आला आणि प्रेषितांना म्हणाला, माझ्याकडून काही वाईट घडले आहे मला शरियतच्या कायद्यानुसार जे काही शिक्षा असेल ती द्या. प्रेषितांनी काही विचारलं नाही. तेवढ्यात नमाजाची वेळ झाली त्या माणसाने प्रेषितांबरोबर नमाज अदा केली. नमाजानंतर तो माणूस पुन्हा प्रेषितांकडे आला आणि म्हणाला, माझ्याकडून गुन्हा घडला आहे, पवित्र कुरआननुसार मला शिक्षा द्या. प्रेषित त्यास म्हणाले, आमच्यासोबत नमाज अदा केली की नाही? त्याने उत्तर दिले, होय. त्यावर प्रेषित म्हणाले, जा, अल्लाहने तुझा गुन्हा माफ करून टाकला आहे.
माणसाच्या भाग्यात कोणता न् कोणता गुन्हा असतोच, त्याच्यापासून सुटकेसाठी अल्लाहजवळ पश्चात्ताप आणि क्षमायाचना करत राहा, अल्लाहने शिकवलं आहे की जो कोणी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागेल तो माणूस अशा गुन्ह्यांपासून मुक्त होईल, पण जर कोणी आपल्या कुकर्मावर ठाम राहील तर त्याचा नाश होईल.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment