सध्या देशाच्या निरनिराळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारचे ‘आयोजन’ होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे तर काय सांगावे! राज्याचा कारभार कुणी चालवतो हे समजत नाही. कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष केवळ एकमेकांविरुद्ध सभांचे आयोजन करत आहेत. भोंगे उतरवायला शासनाला सांगण्यासाठी थेट शासनाशी संपर्क न करता त्यासाठी हजारो-लाखोंच्या सभांचे आयोजन होत आहे आणि शेकडो भोंगे लावून अमाप डेसिबलच्या आवाजात भोंगे उतरवण्याचे शासनाला सांगितले जात आहे. त्याच वेळी जर शासनाने तसे केले नाही तर दुप्पट भोंगे लावून दुप्पट डेसिबल आवाजाचे आव्हान दिले जाते. या सभेची पुन्हा उत्तर सभा, पुन्हा दुसऱ्या, तिसऱ्या अशा सभांची मालिकाच दररोज आयोजित केली जाते. सत्तापक्षातले लोक त्याला उत्तर देण्यासाठी केवळ सभा घेतात. उत्तर-प्रत्युत्तर एकमेकांविरुद्ध आरोप. ‘ती’ कुणी पाडली? आम्ही पाडली, तुम्ही नाही. नव्हे तुमचे तर वयदेखील नव्हते. तम्ही आलाच नव्हता तेथे, ही स्पर्धा नव्हे मालिका बाबरी मस्जिदीला पाडण्याचे श्रेय लाटण्यासाठी चालू आहे. झाली एक घटना, संपला विषय. किती वर्षं त्याला जीवंत ठेवायचेय. महाराष्ट्रात जमिनीवर हवेतून वातावरण तापवले जाते तर उत्तरेत जमीन खोदून अवशेषांचा शोध सुरू आहे. आज ह्या मशिदीखाली उद्या त्या इमारतीखाली आणि नंतर... त्यांच्या यादीत किती आणि कोणत्या इमारती व धर्मस्थळे आहेत कुणआस ठाऊक? अवशेष शोधण्याचे कार्य अविरत चालू राहील, असे वाटते. तर देशाच्या इतर दक्षिणेकडच्या राज्यांत हिजाब झाला, हलाल झाले, आता तरुणांना शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे जमिनीखालचे अवशेष पुरे झाले की काय? जमिनीवरच्या धरांवर बुलझोजरद्वारे ‘अवशेषां’मध्ये परिवर्तित केले जाते.
समाजमाध्यमांचा उपयोग प्रत्येक पक्ष एकमेकांवर चिखलफेक करण्यासाठी करतो किंवा एखाद्या समूहाविषयी दुष्प्रचार आणि त्यांच्याविरुद्ध हिंसात्माक वातावरण तयार करण्यासाठी करतो. विधायक कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्हे तर विद्धंसक कार्यक्रमांचा प्रकार करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग होत आहे.
अशा वातावरणात नागरिकांनी जगायचे कसे, तग धरायचे कसे? ते संभ्रमात आहेत. त्यांच्या दैनंदिन जगण्याचे प्रश्नं कुणी सोडवायचे, रोजगार कोण उपलब्ध करणार? श्रीलंकेत झाले ते आमच्या देशात व्हायला नको, पण याची काळजी कुणाला? एकंदर असे की देशाचे नागरिक आज ज्या परिस्थितीशी तोंड देत आहेत याचा त्यांनी कधी स्वप्नातदेखील विचार केला नसावा. बाबरी मस्जिदीच्या अभियानातून आपण या पडावावर आलो आहोत. आता ज्ञानवापी मस्जिदीपासून दुसरा पडाव आपल्याला गाठायचा आहे. भाजपला पुढच्या लोकसभा निवडणुकीची वाट, तशी मोकळीच झाली आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment