’’नमस्ते बहनो और भाईयो’’ या जादूभऱ्या आवाजाकडे आपल्या देशातील घराघरातल्या कोट्यावधी लोकांचे कान दर बुधवारी रात्री 8 वाजता रेडिओकडे लागायचे. यावेळी रेडिओ वर ‘बिनाका गीतमाला’ आपल्या सुमधुर हिंदी गाण्यांचा खजिना घेऊन येत असे आणि हा आवाज असायचा या गीतामालेचे निवेदक अमिन सयानी यांचा, रेडिओ स्टेशन असायचे ‘रेडिओ सिलोन’.
1952 पासून पुढची तीन दशके या आवाजाने आणि या कार्यक्रमाने जनमानसावर राज्य केले. लहानपणी महाभारतातील कथा ऐकताना कोणीतरी हेही सांगितले होते की, हीच ती रावणाची ‘सोन्याची लंका’. श्री लंकेच्या या पहिल्या ओळखी. रावण म्हणजे क्रूर राक्षस, सीतेला पळवणारा खलनायक. पण हाच रावण, वेद-शास्त्र संपन्न, दशग्रंथी ब्राम्हण, पंडित होता याची संगती लागायची नाही. तो स्वत: बलाढ्य योद्धाही होता. त्याचा स्वत:चा राजवाडा फक्त सोन्याचा नव्हता तर सारे राज्यच सोन्याचे होते. याचा अर्थ त्याच्या राज्यात अपरंपार सुबत्ता होती आणि सामान्य प्रजेची घरेही सोन्याची होती. मग त्या अर्थाने आदिवासी असणाऱ्या हनुमानाने त्याची लंका जाळली म्हणजे त्याच्या प्रजेची घरेही जाळली. रावणाला धडा शिकवायचा तर मग त्याच्या प्रजेला शिक्षा का केली गेली? बरे रावणाने सीतेला स्पर्शही केला नाही. त्याच्या बहिणीला, शूर्पणखेला लक्ष्मणाने भयानक शिक्षा केली. का तर तिने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. या कारणासाठी आपल्या बहिणीला कोणी विद्रूप केले तर त्याचा बदला कोणता भाऊ घेणार नाही? असे एक ना अनेक प्रश्न पडत. पुढे भूगोलात ‘पाचूचे बेट’ म्हणून श्रीलंका पुन्हा भेटली. अत्यंत प्राचीन इतिहास असणाऱ्या या श्री लंकेबद्दल आणखीन एक आकर्षण वाटत गेले आणि ते म्हणजे इ.स.पूर्व 47 मध्ये अनुराधापूर या बलाढ्य राज्याची अनुला ही आशियाई जगाच्या इतिहासातील राज्य करणारी पहिली राणी आणि भारतात स्त्री पंतप्रधान होण्याच्या तब्बल 6 वर्षापूर्वी, 1960 मध्ये श्रीलंकेच्या झालेल्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यामुळे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापर्यंत मुख्यत्वे हिंदू (?) असणारा हा देश सम्राट अशोकाचा पुत्र, महिंदा याच्या आगमनानंतर बौद्ध झाला. आज 22.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात तेथील 70% लोक बौद्ध, 12.6% हिंदू, 9.7% मुस्लिम आणि 7.4% ख्रिश्चन आहेत. या देशातील 75% लोक सिंहली, 11.2% श्रीलंकन तमिळ, 9.2% श्रीलंकन मूर आणि 4.2% भारतीय तमिळ वंशाचे आहेत. अकरा वर्षापूर्वी, 2011मध्ये निसर्ग आणि इतिहास संपन्न अशा या श्रीलंकेला भेट देण्याची संधी मिळाली.
रामायणातील खलनायक रावण हा त्यांचा देव असल्याचेही लक्षात आले. ते स्वाभाविकही वाटले. धर्माने हिंदू असलेल्या श्रीलंकन तमिळांची संघटना एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलाम) आणि मुख्यत्वे बौद्ध असलेले मूळ सिंहली, थोडक्यात श्रीलंका सरकार, यांच्यातील सुमारे 1976 पासून सुरू झालेले प्रदीर्घ आणि सशस्त्र यादवी युद्ध 2009ला संपून हा देश भयानक र्नपाताच्या कालखंडातून नुकताच बाहेर पडला होता. ही यादवी, हे तमिळ लोकांचे स्वातंत्र्य युद्ध होते. पण वेलुपिलाई प्रभाकरन या मूळ श्रीलंकन तमिळ नेत्याने एलटीटीईची स्थापना करून स्वतंत्र तमिळ राष्ट्रासाठी सशस्त्र लढा सुरू केला. एलटीटीई ही थेटगुरीला, अतिरेकी संघटना होती. या यादवी युद्धात किमान लाखभर लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. भारताचे तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्यात 1987 मध्ये झालेल्या करारामुळे राजीव गांधी यांनी श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची शांती सेना पाठवली. भारतातील तमिळ जनतेला श्रीलंकेतील तमिळ लोकांवर अन्याय होत असल्याची भावना असल्याने त्यांची सहानुभूतीही तमिळ इलामला होती. 1991 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान नसताना तामिळनाडूमध्ये एका निवडणूक प्रचाराच्या सभेत एलटीटीईच्या मानवी बाँम्ब बनलेल्या महिलेने त्यांच्या ठिकऱ्या उडवल्या. 2009 मध्ये हे यादवी युद्ध समाप्त झाले. ज्यांच्या काळात प्रभाकरनच्या एलटीटीईचा श्रीलंकेच्या लष्कराने त्याच्या कुटुंबासहित पूर्ण नि:पात केला होता तेच महिंदा राजपक्षे 2011 मध्ये राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचे बंधू गोटाबाया राजपक्षे हे अमेरिकन नागरिकत्व असतानाही देश वाचवण्यासाठी मायदेशी कसे आले, महिंदा यांनी त्यांना सरंक्षण मंत्री कसे केले आणि गोटाबाया यांनी निर्धाराने आणि निष्ठुरपणे तमिळ इलामचा खातमा कसा केला हे कानावर पडले. यादवीतून श्रीलंका नुसताच सावरला नाही तर भरारी घेण्याच्या तयारीत आहे असेही वाटून गेले. पुढील अनेकवर्षे श्रीलंकेच्या आर्थिक भरारीच्या कथा कानावर पडत राहिल्या. तमिळ इलामचा नि:पात केल्यामुळे गोटाबाया लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. एक कणखर, निर्भय नेता अशी त्यांची प्रतिमा झाली. महिंदा यांनी आपल्या भावाकडे नागरी विकास खातेही सोपवले होते. गोटाबाया यांनी एकामागोमाग एक अशा भव्य प्रकल्पांचा सपाटा लावला. हे करताना पर्यावरण चिरडले जात आहे याची पर्वा केली नाही आणि इतक्या भव्य महागड्या प्रकल्पांची देशाला खरंच गरज आहे काय, याचा विचार केला नाही. यादवी युद्धाच्या रक्तपातातून बाहेर पडलेल्या जनतेला हा विकास सुखावत होता. देश वेगाने पुढे जात असल्याची खात्री जनतेला वाटू लागली. एम.आर. आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे करताना त्या जमिनीवर राहणारे हत्ती देशोधडीला लावले आणि स्थलांतर करून येणारे पक्षी चिरडले गेले. पुढे हा ‘पांढरा हत्ती’ बिनकामाचा ठरत गेला आणि वाहतूक नसल्याने जगातील सर्वात ‘शांत विमानतळ’ म्हणून नोंदवला गेला. हम्बनतोटा बंदराची अशीच गत झाली. शेवटी ते चीनला 99 वर्षाच्या भाडेपट्टीवर द्यावे लागले. भव्य क्रिकेट स्टेडियम बांधले गेले. श्रीलंका हा भारतासारखा क्रिकेटवेडा देश. जनता भारावून गेली. सहा पदरी द्रुतगती महामार्ग बांधले गेले. कित्येकदशके जनतेने असा विकास पाहिला नव्हता. जनता थक्कहोत होती. पुढे जे घडले ते काळाच्या उदरात दडलेले होते. त्यावेळी जनतेच्या दृष्टीने हा लोहपुरूष आणि विकासपुरुष होता. देशाला आता अशाच नेतृत्वाची गरज आहे याबद्दल जनता ठाम झाली. महिंदा यांना 2019 मध्ये आपल्या भावाच्या लोकप्रियतेपुढे मान तुकवून त्याला राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. गोटाबाया हे मूळचे श्रीलंका लष्करातील अधिकारी. तब्बल वीस वर्षे लष्करात नोकरी करून, यादवी युद्धात अनेक लढाया लढून, पदके मिळवून त्यांनी 1991 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. 1998 मध्ये चक्क अमेरिकेत स्थलांतर करून तेथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उडी घेतली. 2005 मध्ये बंधूंना मदत करण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी ते परत आले आणि पुढे घडला तो इतिहास आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द हा एक सतत वादाचा विषय राहिला. एलटीटीईच्याविरुद्ध अंतिम युद्ध छेडले तेव्हा गोटाबाया संरक्षण मंत्री होते आणि लष्कराचे नेतृत्व करीत होते जनरल सरथ फोन्सेका. पुढे याच जनरल फोन्सेका यांनी गोटाबाया यांच्यावर त्यांनी एलटीटीईच्या शरण आलेल्या सैनिकांच्या त्यांना फसवून हत्या केल्याचा आरोप केला. बिगर लष्करी तमिळ जनतेच्या पण निर्दय हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. गोटाबाया यांनी जनरल फोन्सेका यांना; तोंड उघडल्यास हत्या केली जाईल अशी थेट धमकी दिली, असे म्हटले जाते. 16 मार्च 2015ला एका श्रीलंकेच्या वाहिनीला मुलाखत देताना गोटाबाया यांनी सांगितले की ते अमेरिकेचे नागरिक आहेत आणि अमेरिका त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून पकडू शकते म्हणून ते अमेरिकेत जाऊ शकत नाहीत. पुढे 2016 मध्ये ते अमेरिकेला जाऊन आले. अमेरिकेने त्यांना सुटू दिले. महिंदा, बासिल आणि गोटाबाया या राजपक्षा बंधू त्रिकुटाला विरोध करणारे अनेक पत्रकार, मानव अधिकार कार्यकर्ते नाहीसे होत राहिले किंवा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होत राहिले. 5 डिसेंबर 2008 ला न्यूयॉर्क टाईम्सने गोटाबाया यांच्यावर टीका करणारा लेख लिहिला. 16 ऑगस्ट 2011ला आपल्या ‘द हिंदू’ ने ‘हाताबाहेर गेलेला भाऊ’ असा त्यांच्यावर लेख लिहिला. गोटाबाया यांच्यावर भ्रष्टाचाराचेही अनेक आरोप सातत्याने होत राहिले. 2015 मध्ये इंटरपोलने लष्करात होत असणाऱ्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे श्रीलंका सरकारला सादर केले. मार्च 2015 मध्ये श्रीलंकेच्या न्यायालयाने लष्करी जहाज त्यांनी वैयक्तिक वाहन म्हणून वापरले म्हणून त्यांच्यावर प्रवास बंदी घातली. पण डिसेंबर 2016 मध्ये ती उठवण्यात आली. अशी पार्श्वभूमी असतानाही महिंदा यांनी 2020 मध्ये आपले बंधू गोटाबाया यांना अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले कारण त्यांच्या विजयाची त्यांना खात्री होती. गोटाबाया हे अमेरिकेचे नागरिक आहेत आणि ते श्रीलंकेचा खोटा पासपोर्ट वापरतात असा आरोप विरोधकांनी करून त्यांना निवडणूक लढविण्याची बंदी घालावी अशी मागणी केली. न्यायालयाने हे आरोप फेटाळले. राष्ट्रवाद, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा या तीन मुद्यांवर त्यांनी निवडणूक लढवली आणि 52.5% मते मिळवून जिंकली. 18 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचे लाडके संरक्षण खातेही स्वत:कडे ठेवले. 21 नोव्हेंबर रोजी बंधू महिंदा यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. बाकी बंधू आणि नातेवाईक यांची मात्र नव्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. आपण घराणेशाही मानत नाही असा संदेश जनतेला देण्याचा हा प्रयत्न होता. कारण महिंदा यांच्या मंत्रिमंडळात आणि सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबातील 40 सदस्य होते. घराणेशाहीचा कळस होता. पण गोटाबाया यांनी त्याला छेद दिला. जनता आणखीन संमोहित झाली. गोटाबाया म्हणजे राष्ट्र असे समीकरण निर्माण झाले. त्यांना विरोध म्हणजे देशद्रोह असे मानणाऱ्या भक्तांंच्या फौजा उभ्या राहिल्या. अल्पावधीत जग कोरोना महासाथीने वेढले गेले.
गोटाबाया यांनी प्रथम टाळेबंदी करण्यास नकार दिला पण रुग्ण संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच थेट संचारबंदी घोषित केली. 2 मार्च 2020 रोजी लोकसभाही विसर्जित केली. देश लष्करी राजवटी खाली गेला. पण त्यांनी केलेल्या अनेक कडक उपायांमुळे महासाथीचा मोठा फटका देशाला बसला नाही असे जनतेचे मत झाले. जनता कृतज्ञ झाली. नेता असावा तर असा. 5 ऑगस्ट 2020ला सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यांच्या पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. प्रचंड बहुमत हातात आल्यावर गोटाबाया यांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला. हे सर्व निर्णय तडकाफडकी, जनतेला तर सोडाच मंत्रिमंडळालाही विश्वासात न घेता घेतले जाऊ लागले. शेतीसाठी अधिक जमीन उपलब्ध व्हावी म्हणून संरक्षित जंगले शेतीसाठी उपलब्ध करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. जंगले हे श्रीलंकेचे वैभव आणि पर्यावरणाचा कणा. यामुळे ज्या हत्तींसाठी श्रीलंका पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे त्याच हत्तींचे वास्तव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. रासायनिक शेती ही हानिकारक आहे, ती थांबवली पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आले. एप्रिल 2021 मध्ये अचानक रासायनिक शेतीवर बंदी घालून संपूर्ण देशात सेंद्रीय शेती बंधनकारक करण्यात आली. अनेक कृषी संस्थांनी सांगण्याचा प्रयत्न केला की हा निर्णय टप्प्या टप्प्याने घ्यायला हवा. सेंद्रीय शेती कशी करायची हे शेतकऱ्यांना शिकवायला हवे. पण अचानक हे केले तर रबर, भात, भाजीपाला, फळे आणि एकूणच शेती उत्पादन धोक्यात येईल. बघता बघता रबर जळाले. भाताचे उत्पादन घटले. भात आयात करण्याची वेळ आली. 1.2 बिलियन डॉलर्स अन्न धान्यासाठी आणि 200 मिलियन डॉलर्स आर्थिक साहाय्य म्हणून देण्याची सरकारवर वेळ आली. शेवटी एप्रिल 2022 मध्ये त्यांनी हा निर्णय बदलला आणि जागतिक बँकेकडून 700 मिलियन डॉलर्स कर्ज मागितले. 2019 मध्ये निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रचंड करकपात जाहीर केली. एशियन डेव्हलपमेंट बँकेने 2019 मध्ये श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही दुहेरी तोट्यात (ट्वीन डेफिसिट) असल्याचे सांगितले होते. म्हणजे देशाचा राष्ट्रीय खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नाच्यापेक्षा अधिक असणे, आणि त्या देशाचे उत्पादन कमी असणे. कोरोना साथीमुळे श्रीलंकेच्या पर्यटन क्षेत्राला 3 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला. बेकारी वाढली. तशात गोटाबाया यांनी अचानक 300 पेक्षा अधिक वस्तूंची यादी जाहीर करून त्यांची आयात करण्यावर बंदी आणली. हा स्वदेशीचा नारा होता. भक्त चेकाळले. श्रीलंका मोठ्या प्रमाणावर तयार कपडे निर्यात करते पण त्यासाठी लागणारी बटणे आयात करावी लागतात. गाड्या, इलेक्ट्रॉॅनिक वस्तू आयात कराव्या लागतात. हे अचानक बंद झाले आणि त्यावर अवलंबून व्यवसाय बंद पडले. बेकारीत भर पडली. देशाचे उत्पादन सर्व बाजूंनी घटले. गोटाबाया केंद्रीय बँकही आपल्या मर्जीने चालवत होते. आर्थिक तुट भरून काढण्यासाठी देश आधीच परकीय गंगाजळी वापरत होताच. आता तोच आधार शिल्लक राहिला. परिणाम, परकीय चलनाची गंगाजळी दोन वर्षात 70%घटली. परकीय कर्ज फेडण्याची क्षमता संपली. श्रीलंकेचे चलन डॉलरच्या तुलनेत 30% घसरले. इंधन, अन्न, औषधे, वीज, गॅस टंचाई सुरू झाली. 10 ते 13 तास वीज बंद होऊ लागली. फेब्रुवारी 2022 मधे 2.31 बिलियन डॉलर्स खजिन्यात आणि कर्ज 4 बिलियन डॉलर्स अशी अवस्था होती. जीवनावश्यक वस्तू, पेट्रोेल, औषधे यांच्यासाठी शेकडो लोकांच्या रांगा लागू लागल्या. कागद नाही म्हणून परीक्षा रद्द होऊ लागल्या. पेट्रोेल पंपांवर लष्कर तैनात करावे लागले.आता मात्र जनतेचा धीर खचू लागला. 13 मार्च 2022 पासून देश पेटला. निदर्शने सुरू झाली. अनेकठिकाणी ती हिंसक बनली. ‘गो गोटाबाया’ असे फलक हातात घेऊन लाखो लोक रस्त्यांवर उतरू लागले. 3 एप्रिलला त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाने निषेधार्थ राजीनामा दिला.
18 एप्रिलला त्यांनी 17 नवे सदस्य घेऊन नवे मंत्रिमंडळ घोषित केले. आता हा विकास पुरुष श्रीलंकेतील जनतेसाठी कोणती पुंगी वाजवतो आणि तिला पुन्हा संमोहित करतो याचे उत्तर काळ देईल. या क्षणी सोन्याची लंका भिकारी झाली आहे हे सत्य आहे. अल्पावधीत भिकारी बनलेल्या सोन्याच्या लंकेची ही कहाणी ! ही कहाणी आणि या कहाणीचा नायक यांच्यात आणि आपल्या देशातील कोणी नेत्यामध्ये तंतोतंत साम्य जरी आढळले तरीही तो निव्वळ योगायोग समजावा! जगाच्या इतिहासात घडणाऱ्या घटना वर्तमानाला इशारे देत असतात असा गैरसमज करून घेऊ नये. नाहीतर एका गोड स्वप्नाच्या निद्रेतून जाग वगैरे येईल आणि डोळे उघडतील !
(साभार : मासिक ‘पुरोगामी जनगर्जना’, पुणे)
- डॉ. अभिजित वैद्य
Post a Comment