Halloween Costume ideas 2015

सध्या विषमता वाढू लागली आहे


लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं. सत्य आपलं कथन उच्चारत राहात असतं. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असं सांगत राहतो. आपण पाहिलं, ऐकलं पाहिजे हे मात्र खरं.

- भारत सासणे, संमेलनाध्यक्ष


आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये आता प्रवेश केला आहे. या भ्रमयुगाबाबत, या फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत मला आपणाशी थोडं सविस्तर बोलायचं आहे. आपण थाळी वाजवली आणि ती वाजवताना लेखक, विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरंतर राज्यकर्त्यांनासुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये बारा वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुकेकंगाल होऊन ‘त्राहिमाम्’ म्हणत सैरावैरा झाला होता. भुकेकंगालांच्या जरत्कारू टोळया अन्नाच्या शोधात बाहेर पडून थाळया वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळीनादाशी जोडली गेलेली आहे.

काही विचारवंत आता दबल्या आवाजात असं सांगत आहेत की, सध्या विषमता वाढू लागली आहे. गरीब लोक आता दरिद्री होतायत. श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत. मध्यमवर्ग वेगाने विभाजित होतो आहे. तो कनिष्ठ मध्यमवर्गात ढकलला जातो आहे. दरी वाढते आहे. कदाचित पुढे चालून आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्टया बरी परिस्थिती असलेल्या समाजवर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. विचारवंत दक्षिण आफ्रिकेतील घटनांकडे अंगुलिदर्शन करीत आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल असा इशारा विश्लेषक विचारवंत देत आहेत. लेखक हे ऐकून चिंतित होतो आहे. थाळीवादनाचे ध्वनी त्याने ऐकले आणि येऊ घातलेल्या परिस्थितीकडेही तो पाहतो आहे.

लेखकाने सत्य बोललं पाहिजे आणि निर्भयतेने बोललं पाहिजे, असंही साहित्य सांगतं. सत्य आपलं कथन उच्चारत राहात असतं. ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवानेदेखील उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी. द्रष्टा लेखक असं सांगत राहतो. आपण पाहिलं, ऐकलं पाहिजे हे मात्र खरं. माझी एक आरसा नावाची अप्रकाशित कादंबरी आहे. कथानक असं की, लेखकाच्या घरातला आरसा फुटलेला आहे. लेखक अवचितपणे असं बोलून जातो की, बरं  झालं, आरसा फुटला, नाहीतरी आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागले आहेत. आरसे मंडळी हे उद्गार ऐकतात आणि नाराज होतात. त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला आलेला आहे. तो लेखकासारखाच दिसतो. पण उलटा आहे. म्हणजे, लेखकाची उजवी बाजू तर याची डावी बाजू इत्यादी.

आरशांचा प्रतिनिधी निषेध करून असं म्हणतो की सत्यकथन करणं हे आरशाचं कामच आहे, कारण आरसा सत्यव्रती असतो. लांगुलचालन करणे हा काही त्याचा धर्म नव्हे. पण आरसा असंही सांगतो की, बाजारामध्ये काही बाजारबसवे आरसे आलेले आहेत, जे दिसायला सुंदर दिसतात आणि तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवतात. उदाहरणार्थ, तुम्ही लठ्ठ असाल तर आरसा तुम्हाला सौष्ठवपूर्ण असं दाखवतो आणि तुमचे पांढरे केस या आरशात पांढरे दिसतच नाहीत. तुम्ही मोठे रुबाबदार, यशस्वी, धोरणी आणि अवतारी पुरुष दिसू शकता. असं दाखवणाऱ्या आरशांची बिलकूल कमतरता नाही. त्याउलट, एक आरशांची गुप्त संघटना भूमिगत राहून काम करते आहे, सत्यघोष करते आहे. ‘सांग दर्पणा मी कशी दिसते?’ या प्रश्नावर ‘तू सुंदर नाहीस’ असं स्पष्ट सांगणारा आणि म्हणून फुटलेपणाची शिक्षा भोगणारा आरसादेखील प्राचीन काळापासून या संघटनेचा सदस्य आहे. ‘दीने इलाही’ची स्थापना झाली तेव्हा प्रतीकरूपाने ठेवलेला आरसा या संघटनेत सामील आहे. बाळशात्री जांभेकरांचा ‘दर्पण’सुद्धा या संघटनेत सदस्य आहे. हे आरसे जुने आहेत, आकर्षक नाहीत. पण खरं बोलणारे आहेत. अशा गुप्त संघटनेला भेट देण्याची लेखकाला ‘प्रातिनिधिक भीती’ वाटू लागते. सुदैवाने माझी ही कादंबरी अजून प्रकाशित झाली नाही. पण या भीतीचं कारण तर आहेच. ते कारण सर्वाना माहीतदेखील असतं. परंतु, या कारणामागचं कारणसुद्धा शोधता येतं.

अमृतकाळ

मित्रहो! अमृतकाळ सुरू झाला आहे असं सांगितलं जात आहे. लेखकाने अमृतकाळाबद्दल ऐकलं आणि तो थोडा चकित झाला. थोडं आठवू लागला. त्याने स्वत:ला विचारलं, ‘‘काय असावं हे? अमृतकाळ कसला?’’ तेवढयात त्याने काही चाहूल ऐकली. कार्टूनच्या चित्रात दडलेला ‘कॉमन मॅन’ त्याच वेळेला लपतछपत येऊन पोहोचला. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता. कारण मोबाइलमधून हेरगिरी केली जाते असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडेतिकडे पाहिलं आणि म्हटलं, ‘‘तुम्हाला समजलं नाही? अमृतकाळाबद्दल?’’

लेखकाला काही समजलं नाही असं लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन दबल्या, भयभीत आवाजात पण उत्तेजित होऊन सांगू लागला.. अहो..!.. त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे दोन थेंब? ते मिळवण्यासाठी त्या बिचाऱ्याने वेषांतर केलं. रूपांतर केलं. छद्मरूप धारण केलं. फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला. तेही पुढे, पुढच्या रांगेत, अग्रभागी. द्यायचे होते दोन थेंब अमृताचे. पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलंत. तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलंत. तुम्ही त्याचा अपमान केला. उपहास केला. निर्भर्त्सना केली. तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही. तुम्ही त्याचा शिरच्छेददेखील केला. नसता केला तर, एकटा एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो! पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे दोन झाले-राहू आणि केतू. एकाकडे कुटिल विचार, तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती. एकाकडे डोकं, दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती.. राहूचे उपासक आता छद्मरूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपी उपासक आहेत. ते दुष्टबुद्धी, क्षुद्रबुद्धी आणि छद्मबुद्धी आहेत, आणि त्यांना सूड उगवायचा आहे. एक म्हणतो आहे, मी काशी. दुसरा म्हणतो, मी मथुरा. तिसरा म्हणतो आहे मी द्वारका, मी अयोध्या, मी.. मी.. मी! हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृतिरक्षक होतात. कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात. कधी ते ज्योतिषी होतात. कधी ते भाष्यकार होतात. राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरीवादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून आणि मोहित करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे. आता मात्र त्या लोककथेप्रमाणेच, समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहित होऊन जातायत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे.’’

कॉमन मॅन पुढे सांगू लागला, हळुवार आवाजात.. ‘‘नसता केला शिरच्छेद, दिले असते चार थेंब तर ही वेळ आली नसती. आता ‘राहू-केतू’चा उच्छाद सहन करणं इतकंच आपल्या नशिबी आहे. ज्योतिषाचार्याना जाऊन विचारण्याची सोय नाही, कारण ते आधीच विकले गेलेले आहेत. ही तर नियतीचीच इच्छा आहे असं ते तुम्हा नियतीवाल्यांना सांगत आहेत. अमृतकाळ सुरू आहे आणि अमृताच्या चार थेंबांसाठी लढाई सुरू आहे. श्रेयासाठी  लढाई सुरू आहे. राहूचे उपासक सूड घेण्याच्या प्रयत्नात आहेत.’’ कॉमन मॅनचं सांगून झालं असावं. लेखकाने विचारलं, ‘‘मग? एकूण बरं चाललेलं नाही?’’ या प्रश्नावर तो थबकला. मग सांगू लागला.. उद्याची पहाट सुंदर असेल या त्यांच्या आश्वासनावर खरंतर मी विश्वास ठेवायला नको होता, कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते, उद्याचा दिवस येतच नसतो. कॉमन मॅनला शेरोशायरीची आवड नाही. ज्ञान पण नाही. पण तो स्टाइलने कपाळाला हात लावतो. मथितार्थ काव्यमय. दाग़ नावाच्या कवीच्या कवितेसारखा. तो सुचवतो-

‘गजब किया, तेरे वादे पर ऐतबार किया ।

 तमाम रात क़यामत का इंतज़ार किया।’

(समाप्त)

उदगीर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदाच तालुक्याच्या ठिकाणी झाले. त्याचे यशस्वी आयोजन, नियोजन करून पार पाडले. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाला राज्यभरातील साहित्यीकांनी आपला सहभाग नोंदवित दर्जेदार साहित्याची मांडणीही केली. साहित्य संमेलनाचे उदघाटन खा. शरद पवार  यांनी केले तर समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावत संमेलन चर्चेत आणले. 


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget