मित्रहो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्व विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतनपरंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळया-पांढऱ्या चौकटींवर, स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वत:च पाहात रमत बसलेला असतो. मला स्वत:ला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे.
स्वत: काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं-द्यावं लागणार असतं. तत्पूर्वी, लेखक का लिहितो याची थोडी चर्चा करूया. निर्मिती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्यामुळे ‘आपण अस्वस्थ आहोत’ असं विधान प्रतिभावान कलावंत करताना दिसतात, मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मलादेखील हा प्रश्न विचारला गेला आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्रतिभावंत-कलावंत-स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूमिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱ्यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करतं. निर्मिती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वत:ला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मितीच्या शक्यता नसतात, म्हणून त्याला, त्यामुळे स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचं आकर्षण वाटत राहतं.
आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली, अनेक पातळयांवरून, अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काहीएक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागधेय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागे शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे.
तुमचं लेखन वास्तववादी असलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह लेखकाच्या भोवती धरला जातो. वास्तववाद म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या मात्र वेगवेगळया असू शकतात. आपल्या साधनाकाळातच लेखकाने वास्तवाचा हा गुंता सोडवणं हितकारक असतं. एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसतं. एकाचं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं याची जाणीव लेखकाने ठेवणं गरजेचं असतं. वास्तव बदलत राहतं आणि मुळातून ते बदलतसुद्धा नाही. उदाहरणार्थ चिरंतन मूल्यं किंवा ईश्वरी सत्ता बदलत नाही. समाज बदलतो, मान्यता बदलतात, गरिबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची साहित्याने दखल घ्यायची असते.
सामान्य माणसाचं दु:ख प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा असेल तर सामान्य माणूस लेखनप्रेरणेचा केंद्रबिंदू मानावा लागतो हे तथ्य साधनाकाळातच लेखकाने स्वीकृत केलेलं बरं. लेखकासाठी सर्वसामान्य माणूस हा नेहमीच आस्थेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. लेखकाला सर्वसामान्य माणसाच्या शोधाबाबत आस्था असावी लागते. त्याच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोट्या छोट्या लढायांबद्दल आस्था बाळगावी लागते. सर्वसामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेबाबत कुतूहल लेखकाला चिंतनशील बनवतं. सामान्य माणसाच्या दु:खाचा परिहार कसा होऊ शकेल याबाबत काहीएक चिंतन लेखकाला उपकारक ठरून श्रेष्ठत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्यभूत ठरतं.
सर्वसामान्य माणसांच्या जीवनव्यवस्थेतील छोट्या छोट्या लढायांबाबत लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्यक्षेत्रात परिचितही झालेला असतो. येथून पुढे मग ‘व्यवस्था’ तुम्हाला ‘कमिट’ होण्याचा आग्रह धरू लागते. तुम्हाला कथित ‘सामाजिक बांधिलकी’ आहे वा नाही याबाबतची एक झाडाझडती एव्हाना होऊन गेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. कोण आहात तुम्ही? तुम्ही व्यवस्थाविरोधी आहात काय? की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात? तुम्ही कोणत्या कळपामध्ये जाऊन पोहोचला आहात? प्रश्नांचा हा असा गलबला असला तरी लेखकाला स्वत:च्या अंत:प्रकाशात आपली स्वत:ची वाट स्वत:च शोधावी लागते, आणि त्याची किंमतही मोजावी लागते.
कलाकृती ही ‘कलाकृती’ असल्यास त्याकडे कलाकृती म्हणून पाहिलं पाहिजे असं कोण्या जाणकार समीक्षकाने म्हटलं आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं लेखकावर आणि कलाकृतीवरही लादणं योग्य नसतं, याचा विचार सहसा कोणी करताना दिसत नाही. लेखकाला हे ‘अडाणी ओझं’ संत्रस्त करू शकतं. आपल्या निर्मितीच्या प्रक्रियेत अशा अपेक्षा अडकाठी ठरणार नाहीत याची काळजी त्याला घ्यावी लागते. पण मग लेखकाची बांधिलकी कोणती, हा प्रश्न शिल्लक राहतोच. मी स्वत:, सामान्य माणसाला लेखनाचा केंद्रबिंदू मानतो. ज्या मातीशी त्याची नाळ जुळलेली असते आणि ज्या नाळेतून त्याला जीवनरस प्राप्त होतो त्या नाळेशी माझी बांधिलकी आहे.
एकूणच उत्तराधुनिक व्यामिश्र जीवनपद्धतीला स्वत:त सामावून घेण्याची व समकालीन परिस्थितीबद्दल काहीएक समर्थपणे सांगण्याची शक्ती दीर्घकथेमध्येच असल्यामुळे येथून पुढे दीर्घकथेकडे आपण आशेने पाहू शकू असं चित्र दिसतं. दीर्घकथेची काहीएक परिभाषा तयार करणं, दीर्घकथेचे तंत्र काही प्रमाणात स्पष्ट करणं असं काही काम मराठी समीक्षेच्या क्षेत्रामध्ये होणं आता गरजेचं आहे. मराठीतल्या दीर्घकथेच्या रूपाने मराठी भाषेने अन्य भाषांना देणगी दिली आहे अशी चर्चा मी नुकतीच वाचली. मी या विधानाचं स्वागत करतो.
आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र, हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर ,बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा होतो आहे.
जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्यदर्शनातून का वगळला जातो आहे हे पाहिलं पाहिजे. त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करावं लागेल. मुख्य म्हणजे ‘सामान्य माणसा’बाबतचं कोणतं आकलन आपल्या लेखकाला झालं आहे हा प्रश्न तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही ‘प्रेयस आणि श्रेयस’ यात अडकला आहे. तो सत्य म्हणजे काय, याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करीत नाही असं निरीक्षण आहे. सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसीहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. पण असा कोणी मसीहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्ट्या कवींनी ती उद्याची पहाट उजाडेल असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहास देखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो. वाट पाहणं केवळ या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे. तो भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहतो आहोत. या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी कथा अस्तित्वात येण्याची आवश्यकता आहे.
साहित्याच्या परिघामध्ये एक विचित्र असा तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. परप्रकाशित, परभृत, इतरांच्या प्रभावळीतील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावाद आणि प्रदूषण पसरवीत राहिलेले असतात ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरुचीचा अपमान होतो आणि मेहनती साहित्यिकांचा अवमानदेखील होतो, याची दखल सहसा घेतली जात नाही. अशा बेजबाबदार टिंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत याची त्या अनुयायांना जाणीव नसते कारण, काहीएक बौद्धिक विकृती त्यांच्या ठायी निर्माण झालेली असते. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी या संदर्भात उघडपणे नाराजी प्रकट केलेली आहे. पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबाबत बोलणं टाळलं जातं हा चिंतेचा विषय.
मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुतरस हद्दपार केलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान यांच्या कोड्यांनी भरलेलं, नीरस असं झाल्याचं दिसतं आहे. लांब नाकाच्या चेटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरात ढकलून दिलं. संस्कारवादी बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडलेली आहे. विशिष्ट वयात अद्भुतरसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेली आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची बनतात असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. त्याउलट, अद्भुतरसाचा संपर्क ज्या मुलांच्या मनाशी घडला नाही ती मुलं पोटार्थी, शुष्क, अविकसित व्यक्तिमत्त्वाची, अविचारी, अरसिक निपजतात.
मित्रहो, काही टीकाकारांनी असं दाखवून दिलं आहे की, मराठी साहित्याचं विश्व नेहमीच कर्मठ, स्थितीवादी, आत्मकेंद्री व वास्तवाची दखल न घेणारं असं राहिलं आहे. टीका अशी आहे की, स्वातंत्र्यसंग्रामाबाबत मराठी साहित्यविश्वात विशेष असं काही लिहिलं गेलं नाही. महात्मा गांधींच्या खुनाच्या घटनेचे पडसाददेखील मराठी साहित्यात विशेष उमटलेले नाहीत. महात्मा गांधींचं योग्य ते आकलनच मराठी साहित्याला व साहित्यिकांना नीटसं झालेलं नाही अशी टीका केली गेली आहे. मोठ्या अशा समूहाने धर्मातर करणं, बहात्तरचा मोठा दुष्काळ व त्यानिमित्ताने शेतकऱ्याचं उद्ध्वस्त होणं या घटनादेखील मराठी साहित्यात आल्या नाहीत. वर्तमानाचं भान नसणं हा मराठी साहित्याचा दोष लक्षात घेता जगात, भारतात व महाराष्ट्रात ज्या महत्त्वाच्या घटना अलीकडे घडल्या त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडण्याची कितपत शक्यता आहे असा थोडासा टोकदार सवाल आहे.
(क्रमशः)
Post a Comment