प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, तुमच्यामधील असे लोक मला सर्वांत प्रिय आहेत, जे चारित्र्यसंपन्न आहेत, मवाळ स्वभावाचे आहे, ते इतर लोकांशी प्रेम-सद्भावनेचे वर्तन करतात आणि इतर लोक त्यांच्याशी तशाच प्रकारे वागतात.
(ह. अबू हुरैरा, तरगीब व तरहीब)
हजरत सअद बिन अबी वकास म्हणतात, एक व्यक्ती प्रेषित (स.) यांच्याकडे आली आणि म्हणाली, प्रेषितांनी मला काही उपदेश द्यावा.
प्रेषित (स.) म्हणाले, तुम्ही लोकांच्या धनसंपत्तीजवळ जाऊ नका. त्यांच्याशी ईर्षा करू नका. संपत्तीच्या मोहात पडू नका, नसता वंचित व्हाल. आणि अशा प्रकारे नमाज अदा करा जसे तुम्ही या जगातून जात आहात. असे कोणतेही कृत्य करू नका ज्यामुळे तुम्हाला माफी मागावी लागेल.
(तरगीब व तरहीब, संदर्भ- हाकिम, बैहकी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ज्या कुणाला ह्या चार गोष्टी लाभल्या त्याला या जगी आणि परलोकात सर्व काही मिळाल्यासारखे आहे. अल्लाहच्या देणगीमुळे ज्याचे हृदय कृतज्ञसंपन्न असेल, अल्लाहचे स्मरण करणारी जीभ, कष्ट सहन करणारे शरीर आणि अशी पत्नी जी आपल्या पतीची संपत्ती आणि स्वतःच्या शीलाचे रक्षण करत असेल.
(ह. इब्ने अब्बास (र.), तरगीब व तरहीब, तिब्रानी)
प्रेषित म्हणतात, तीन प्रकारचे लोक कष्टात सापडलेले असतील,
१) असा सत्ताधीश, ज्याची चांगल्या प्रमाणे जरी (त्याच्या आदेशांचे) पालन केले तरीदेखील तो अशालोकांची कदर करत नसेल, आणि जर कुणाकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करणार नाही.
२) वाईट शेजारी, ज्याच्याशी तुम्ही भलाईचे वर्तन केले तर त्याला प्रतिसाद देत नाही पण जर तुमच्यात काही अवगुण त्याला दिसल्यास तो सर्वत्र त्याची चर्चा करतो.
३) अशी पत्नी जी तुम्ही घरी परतल्यास तुम्हास इजा देत राहते.
(ह. फुजाला बन उबैद, तरगीब व तरहीब, तिब्रानी)
हजरत हसन (र.) म्हणतात की माझे आजोबा (नाना) (प्रेषित मुहम्मद (स.)) यांनी हे शिकविले आहे की ज्या कोणत्या गोष्टीत तुम्हाला शंका असेल ते सोडून असा पर्याय निवडा ज्यात तुम्हाला शंका नसेल. सत्यतेपासून समाधान प्राप्त होते. आणि खोटे बोलण्याने शंकाकुशंका निर्माण होतात.
(तरगीब व तरहीब, संदर्भ- तिर्मिजी)
प्रेषित (स.) म्हणतात, जे लोक अल्लाहशी भिऊन असतात त्यांना संपत्तीमुळे कोणता धोका नसतो. चांगले स्वास्थ्य अल्लाहची भीती बाळगणाऱ्यांना संपत्तीपेक्षा अधिक चांगले असते. प्रसन्नता संपन्न हृदय अल्लाहची मोठी देणगी आहे.
(संदर्भ- मिश्कात)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment