भोंग्यावरून वातावरण तापवणाऱ्यांना चपराक
बुलडाणा
सध्या महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून वातावरण तापवण्याचे काही ‘राज’कारण्यांकडून प्रयत्न होत आहेत. असे असताना बुलडाणा जिल्ह्यातील केळवद गावच्या हिंदू बांधवांनी गावच्या मशिदीला भोंगा भेट देऊन सामाजिक सौहार्दतेचे दर्शन घडविले आहे. ही एका प्रकारे भोंग्यावरून राजकारण करणाऱ्यांना चपराकच आहे. महाराष्ट्राची ओळख शांती,सौहार्द, एकात्मता आणि प्रगती असून, काही राजकारण्यांमुळे प्रतिमेला तडा जात आहे. मात्र बुलढाण्यातील हिंदू बांधवांनी मशिदीला भोंगा भेट देत आमचे ’राज’कारण्यांच्या द्वेषी राजकारणाला विरोध असल्याचे दर्शविते.
एकीकडे मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिला जात असताना केळवद गावच्या मशिदीला भोंगाच नाही हे लक्षात आल्यानंतर गावच्या हिंदू बांधवांनी आपसात एकजूट दाखवत भोंगा विकत घेऊन तो मशिदीला दिला. मंगळावरी ईद उल फित्रच्या दिवशी हिंदू बांधवांनी भोंग्याची अनोखी भेट दिल्याने मुस्लिम बांधव भारावून गेले.
केळवद गावची लोकसंख्या पाच हजार त्यात मुस्लिम बांधवांची संख्या अवघी दीडशे. गावात सर्वधर्मियांत गुण्यागोविंदाचे वातावरण आहे. सध्याच्या वातावरणात सामाजिक दुरावा तयार करू पाहणाऱ्या ‘भोंग्या’कडे कानाडोळा करीत केळवदच्या ग्रामस्थांनी भेट दिलेला भोंगा हा शांती व सलोख्याची भेट आहे. सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीत केळवद गावातील हे एक आगळेवेगळे उदाहरण समोर ठेवले गेले आहे.
’राज’कारण्यांचा भडकावूपणा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू आहे. यांच्या द्वेषी राजकारणाला बळी न पडता शांती, एकात्मता आणि भाईचाऱ्याने त्यांचे डाव उधळून लावणे गरजेचे आहे.
Post a Comment