प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक मुस्लिमाने ज्ञान प्राप्त करणे त्यांच्यावर अनिवार्य आहे. (हजरत अनस (इब्ने माजा)
प्रेषितांचे विधान आहे की या धरतीवर ज्ञानी लोक आकाशावरील ताऱ्यांसारखे आहेत. ज्यांच्याद्वारे समुद्र आणि जमिनीवर लोकांचे मार्गदर्शन होते. जर हे तारे दिसेनासे झाले तर लोकांना आपला मार्ग सापडणार नाही. ज्ञान हे अशा गोष्टींचा उलगडा करते ज्या आपल्याला माहीत नाहीत.
(ह. अनस (र.) मुसनद अहमद)
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो, वाचा (ज्ञान प्राप्त करा). तुमचा विधाता महान कृपा करणारा आहे. ज्याने लेखणीव्दारे तुम्हाला ज्ञान शिकवले आणी अशा गोष्टींची माहिती दिली ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या. (अल-अलक-५)
अल्लाहने पवित्र कुरआनमध्ये जागोजागी ह्या सृष्टीच्या निर्मितीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. मागे अल्लाहचे हेच उद्दिष्ट आहे की माणसाने सृष्टीच्या निर्मितीवर निरनिराळ्या निर्मितीचे अध्ययन करावे आणि ही माहिती त्याने रचनात्मक कार्यासाठी उपयोगात आणावी. अल्लाहने जे काही निर्माण केले आहे ते उगीचच नाही. त्या निर्मितीद्वारे माणसाने लाभ घ्यावा आणि माणसाच्या कल्याणासाठी अल्लाहने दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करावा.
पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो, धरती आणि आकाशाच्या निर्मितीमध्ये आणि रात्र व दिवसाच्या आलटूनपालटून येण्यामध्ये अशा लोकांसाठी बरेच संकेत आहेत जे उठताबसता अल्लाहचे स्मरण करत राहतात. तसेच धरती आणि आकाशाच्या बनावटीवर चिंतन मनन करतात आणि ते म्हणतात, अल्लाहने हे सर्व उगीचच निर्माण केलेले नाही. (पवित्र कुरआन, ३:१९०-१९१)
अल्लाहच्या या निर्मितीचे बारकाईने अध्ययन करून मुस्लिमांनी औषधी, खगोलशास्त्र, पदार्शविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादी विज्ञानाच्या शाखांमध्ये भरीव योगदान दिले. हे कार्य करत असताना ते श्रद्धावंत असल्याची जाणीव देखील कधी नजरेआड केली नाही, तर अल्लाहच्या या आयतीवरील श्रद्धेमुळेच त्यांच्यामध्ये ज्ञान संपादनाची जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी या विज्ञानाचा उपयोग मानवतेसाठी संहारक ठरेल असे कोणतेच कार्य कधी केली नाही. प्रेषितांच्या वरील उक्तीनुसार ज्ञानप्राप्ती त्यांचे अनिवार्य कर्तव्य आहे. ही जाणीव ठेवूनच त्यांनी मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचे सृजनात्मक आणि रचनात्मक उद्दिष्ट नेहमी समोर ठेवले होते.
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment