Halloween Costume ideas 2015

असे असतात का आमचे उत्सव?


१०  एप्रिलची घटना गोव्यात घडणे ही लज्जास्पद बातमी आहे. गोवा जे एक शांतीप्रिय राज्य मानले जाते त्यात असे प्रसंग घडणे हे त्याच्या शांतीला भंग करते. राम नवामीची मिरवणूक वास्को, इस्लामपूर इथे चालली होती. अचानक खबर पसरली की कोणीतरी दगडफेक केली. मिरवणूक तिथे असलेल्या मस्जिदीकडे वळली. मस्जिदमध्ये लोक इफ्तार म्हणजे रोजा सोडण्याच्या तयारीत होते. तिथे जाऊन मिरवणुकीत सलभागी असलेल्या समाजकंटकांनी मारहाण सुरु केली. ह्या प्रसंगात खूपशा गोष्टी चिंतन करण्यालायक आहेत. खरंच दगडफेक झाली का? की ही फक्त अफवा होती? मस्जिद रस्त्यावरून  १०० ते २०० मीटरच्या अंतरावर असून तिची दिशा ही वेगळी असताना तिथून मिरवणुकीवर दगडफेक करणे संभव आहे का? मिरवणुकीत सहभागी असलेल्यांनी मस्जिदमध्ये सरळ जाऊन दंगल करणे कितपत वैध आहे? का ह्याची सूचना पोलीस कर्मींना नाही दिली? का कायदा आपल्या हातामध्ये घेतला? 

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली तर जवळपास हेच समजण्यात येते की ह्या हिंसाचारामध्ये काहीतरी पूर्वनियोजित होते. एका संघटनेचा आणि उत्सवाचा आधार घेऊन शांततामय गोव्याची शांती भंग करण्याचा हा एक मोटा प्रयत्न होता. २०१४ नंतर देशात असे प्रसंग खूप उमटले आणि आजही देशभरात चालू आहेत. ह्याच दिवशी भारताच्या अनेक ठिकाणी राम नवमीच्या मिरवणुकीत ह्याच्याहून जास्त भयानक घटना घडल्या. कोठे मस्जिदच्या मिनारावर भगवे झेंडे लावले गेले तर कोठे गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले.

असे करून काय साबित करायचं असते ह्यांना? हे फक्त मुस्लिम समुदायावरच होणारे अत्याचार नाहीत तर ख्रिश्चन, शीख, दलित, आदिवासी यांसारख्या दुसऱ्या अल्पसंख्याक व मागास समुदायांवर पण हे चालू आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की लोकसुद्धा ह्या अत्याचारांचा निषेध करत नाहीत तर सत्य समजून घेण्याऐवजी आपले एक मन पहिल्यापासूनच एका विशिष्ट समुदायाविरुद्ध बनवून घेतात आणि ज्या समुदायाविरुद्ध त्यांना जे शिकवले गेले आहे त्याचीच हामी भरतात.  काय लोकांची ही जबाबदारी नाही की पूर्णसत्य दोन्ही बाजूंनी जाणून घ्यावी? बऱ्याच वेळा हेच बघायला मिळते की जी बातमी पूर्वी ऐकायला मिळाली त्यात फक्त अर्धसत्यच होते.

होळीच्या दिवशीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा दोन गटांदरम्यान हाणामारी झाली तेव्हा अगोदर हीच अफवा पसरली की हिंदू आणि मुस्लिम यांच्यात हाणामारी झाली आणि एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर खूप आरोप केले. नंतर हे दिसून आले की ते दोन्ही गट एकाच समुदायाचे होते आणि विवादही भलत्याच प्रकारचा होता. आम्ही सुशिक्षित असताना अशा प्रकारचे अज्ञानतेचे वर्तन आम्हाला शोभते का?

स्पष्ट दिसून येते की असे प्रसंग ह्याचसाठी घडवून आणले जातात की लोकांमध्ये द्वेष, घृणा आणि तिरस्कार वाढावा आणि लोक आपापसात लढून झगडून देशाच्या हिताचे जे वास्तविक, मुख्य मुद्दे आहेत त्यांना विसरून जावे.  असे केल्यामुळे लोकांवर राज्य करणे सोपे होते आणि सत्ता हटविणाऱ्यांना आपले खिशे भरण्यासाठी कसलेही प्रयास करता येतात, ज्याला लोकांचा काहीच अडथळा नसतो. ही योजना सध्या जगाच्या दिग्गज पुढाऱ्यांनी घेतली होती. लोक आपापसात लढतात, आपले नुकसान करून घेतात आणि देशालाही डुबवतात. फायदा फक्त त्या पुढाऱ्यांनाच होतो ज्यांनी लोकांना खोटी आश्वासने दिली आणि धर्माच्या नावावर त्यांना भुलाव्यात ठेवले.

श्रीलंकेचेच उदाहरण आपल्या समोर आहे. श्रीलंकामध्ये सुद्धा असाच प्रकार चालू होता, लोक धर्माच्या जाळ्यात गुंतून राहिले आणि इथे महागाई इतपर्यंत वाढली की आज श्रीलंकेत आणीबाणी घोषित करावी लागली आहे आणि देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. एका विशिष्ट समुदायाला दुसऱ्या समुदायापासून धोका आहे हे दाखवून त्यांच्यामध्ये निर्माण केलेली शंका हीच ह्यासाठी जबाबदार आहे. ज्यामुळे हे सर्व घडहूनही आणले जाते आणि लोकांनाही कोणावर झालेल्या अत्याचाराबद्दल काही आपुलकी वाटत नाही, तर त्या शंकेला जास्त बळ मिळते.

इतिहासाचे अर्धसत्य किंवा पूर्ण खोट्या गोष्टींचे उदाहरण देऊन लोकांना असल्या भ्रमामध्ये ठेवले जाते की जे पूर्वी घडले ते आताही घडेल आणि म्हणून तुम्हाला धोका आहे. म्हणूनच का तुम्हीच कायदा हातात घेऊन ते करणार ज्याची शंका दुसऱ्यांकडून होण्याची शक्यता तुम्हाला वाटते?

एक समुदाय आतंकवादी आहे म्हणून तो देशात एक दिवस आंतक करणार ही मान्यता पाळून का तोच आतंक दुसरा समुदाय आज करून आजच देश आणि जनतेला त्रासात लोटणार? देशाचा सर्वनाश करणार? शांती आणि बंधुभावाने राहणारे देशवासी, शेजारी, मित्र काय तुम्हाला दिसत नाहीत? त्यांच्यापैकी कोणी कोणावर ह्यापूर्वी हत्यार उचलले होते का? बॉम्ब टाकला होता का? काय सर्व एक दुसऱ्याच्या उत्सवांत सहभागी नाही होत होते? एक दुसऱ्याच्या वेळप्रसंगाला कामी नाही पडत होते का? जे देशात पूर्वी दंगे झाले ते अशाच भ्रामिक सत्तेच्या आणि संपत्तीच्या लोभी माणसांच्या कर्तृत्वामुळे होते ज्यांना लोकांच्या सुख, शांती आणि एकतेमुळे धोका होता, ज्यामुळे त्यांना लोकांवर राज्य करणे कठीण होत होते व त्यांना हीच शंका लोकांमध्ये निर्माण करायची होती की वेगवेगळे समुदाय एका देशात राहू शकत नाहीत. जबरदस्ती धर्मांतर भीती सध्या घातली जाते आणि लोकांना ह्या भीतीमध्ये ठेवले जाते की त्यांना ह्याचा सामना एक दिवस करावा लागेल. जबरदस्ती धर्मांतराची किती प्रकरणे गेल्या १००-२०० वर्षांत झाली आहेत ह्याचा कोणी ठोस पुरावा देईल का? जी धर्मांतरने झाली आहेत ती लोकांच्या स्वतःच्या मर्जीने झाली आहेत आणि कुठली श्रद्धा बाळगावी हा लोकांचा वैयक्तिक निर्णय असतो आणि असलाच पाहिजे. त्यात कसलीच जबरदस्ती होऊ शकत नाही कारण श्रद्धा मनाच्या स्वभावावर अवलंबून असते आणि कृतीद्वारे जी व्यक्त केली जाते.

फक्त नाव बदलून श्रद्धा किंवा धर्म बदलत नसतो आणि असे कित्येकशे लोक असतात ज्यांची नावे वेगळी, श्रद्धा वेगळी आणि कृत्य वेगळे असते. पण इथे पण आम्हाला हेच दिसून येते की एक समुदाय धर्मांतर करणार ह्या भीतीने जो समुदाय ह्याच्या विरोधात आहे तोच हे करताना दिसतो. जबरदस्ती दुसऱ्या समुदायाच्या लोकांना पकडून आपल्या श्रद्धेचे गुणगान करण्यास भाग पडतो आणि त्यांना जिवंतसुद्धा सोडत नाही. असे कित्येक मॉब लिंचिंगचे प्रसंग देशात सुरु आहेत. आता सांगा कोणत्या समुदायाला कोणापासून धोका आहे? जे आरोप एक समुदाय दुसऱ्यावर लावतो तोच ते करताना सापडत आहे. हे कसले देशहित आणि लोकहित आहे? हा आतंकवादाला रोखण्याचा प्रयत्न आहे की त्याला वाढवण्याचा? कोण आहे मग खरा आतंकवादी?

कुरआन म्हणतो, धर्माबद्दल जबरदस्ती नाही. (२:२५६)  सर्व लोक एकाच जोडप्यापासून जन्माला आलेत (कुरआन ४९:१३) आणि म्हणूनच आपण सर्व जण एक दुसऱ्याचे नात्याने भाऊ बंधू आहोत. जिहाद आतंकवादाचा नाश करण्यासाठी आणि शांती स्थापन करण्यासाठी केला जातो ज्यामुळे वाईट शक्तीचा प्रभाव लोकांवर पडता कामा नये.

ह्या कुरआनच्या श्लोकांचा अर्थ इतका स्पष्ट आहे तर लोकांमध्ये ही शंका राहिलीच नाही पाहिजे की भारताची शांतीप्रिय जनतेला मुस्लिम समुदायामुळे कशा प्रकारचा धोका आहे. मुस्लिम समुदायाने सुद्धा ह्याची नोंद घेऊन त्याचप्रमाणे शांती आणि सहनशीलतेने काम करायला हवे. जनतेला विनंती आहे की देशात शांती आणि सौहार्द कायम ठेवावा, तथाकथित गोष्टींना बळी न पडता आपसात प्रेमभाव आणि माणुसकीच्या नात्याने आपले संबंध चांगले ठेवावे आणि जो ह्या शांतीला भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरुद्ध एकजूट होऊन त्याचा विरोध करावा. असे नाही झाले तर ही आग एक दिवस सर्वानाच जाळून टाकील.

"जलते घर को देखनेवालों, फूस पे छप्पर आपका है. आपके पिछे तेज हवा है, अगला घर आपका है।

उसकी कत्तल पे मैं भी चूप था, अब मेरा नंबर आया है, अब मेरे कत्तल पे तुम भी चूप हो, अब अगला नंबर आपका है।"

- नजराना दरवेश

गोवा


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget