(९४) सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तर आम्ही आमच्या कृपेने शुऐब (अ.) ला आणि त्याचे साथी श्रद्धावंतांना वाचविले, आणि ज्या लोकांनी अत्याचार केला होता त्यांना एका - भयंकर स्फोटाने असे गाठले की ते आपल्या वस्त्यांमध्ये जे निपचित पडले ते पडूनच राहिले, (९५) जणूकाय ते कधी तेथे राहिले, वसलेच नव्हते. ऐका! मदयनवालेसुद्धा दूर फेकले गेले ज्याप्रमाणे समूदवाले फेकले गेले होते.
(९६,९७) आणि मूसा (अ.) ला आम्ही आपल्या वचने व (पैगंबरत्वाच्या)स्पष्ट नेमणूक प्रमाणासह, फिरऔन आणि त्याच्या राज्याच्या सरदारांकडे पाठविले पण त्यांनी फिरऔनच्या हुकूमाचे अनुसरण केले. वस्तुत: फिरऔनचा हुकूम सत्याधिष्ठित नव्हता.
(९८) पुनरुत्थानाच्या दिवशी तो आपल्या लोकांच्या पुढे पुढे असेल आणि आपल्या नेतृत्वात त्यांना नरकाग्नीकडे नेईल.१०४ किती वाईट आगमनस्थान आहे हे ज्यावर एखादा पोहचतो!
(९९) आणि त्या लोकांचा जगातदेखील धिक्कार केला गेला व पुनरुत्थानाच्या दिवशीही केला जाईल. किती हे वाईट फळ आहे जे एखाद्याला मिळेल.
(१००) हा काही वस्त्यांचा वृत्तान्त आहे जो आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत. काही अद्यापही उभ्या आहेत व काहींचे वस्तीरूप पीक कापले गेले आहे.
(१०१) आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही त्यांनी आपण होऊन स्वत:वर अत्याचार केला. आणि जेव्हा अल्लाहची आज्ञा आली तेव्हा त्यांचे ते उपास्य ज्यांचा ते अल्लाहला सोडून धावा करीत असत, त्यांच्या काही उपयोगी पडले नाहीत आणि त्यांनी विनाश व विध्वंसाव्यतिरिक्त अन्य कोणताच फायदा त्यांना दिला नाही.
(१०२) आणि तुझा पालनकर्ता जेव्हा एखाद्या अत्याचारी वस्तीला पकडतो तेव्हा त्याची पकड अशीच असते, खरोखरच त्याची पकड अत्यंत कठोर आणि दु:खदायक असते.
(१०३) वस्तुस्थिती अशी आहे की यात एक संकेत आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याने परलोकातील यातनांचे भय बाळगले.१०५ तो एक दिवस असेल जेव्हा सर्व लोक जमा होतील आणि मग जे काही त्या दिवशी घडेल ते सर्वांच्या डोळ्यांदेखत घडेल.
१०४) या आयतने आणि कुरआनच्या दुसऱ्या स्पष्टीकरणांनी माहीत होते की जे लोक जगात एखाद्या राष्ट्राचे नेतेपद भूषवितात तेच कयामतच्या दिवशी त्यांचे नेते असतील. जगात ते नेकी आणि भलाई आणि सत्याकडे मार्गदर्शन करीत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी जगात त्यांचे अनुसरण केले, ते कयामतच्या दिवशीसुद्धा त्यांच्याच झेंड्याखाली जमा होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जन्नतमध्ये दाखल होतील. जे जगात मार्गभ्रष्टतेचा व दुष्टतेचा मार्ग जो सत्यतेचा मार्ग नाही, त्याच्याकडे लोकांना बोलावितात आणि लोक त्यांच्या मागे चालतात तर कयामतच्या दिवशीसुद्धा हे लोक त्यांच्याच मागे असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात नरकाचा मार्ग धरतील. याच विषयाची अभिव्यक्ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते. त्यांचे कथन आहे, "कयामतच्या दिवशी अज्ञानकाळातील काव्याचा झेंडा इमरूल कैसच्या हातात असेल आणि अरब अज्ञानकाळातील सर्व कवी त्याच्याच नेतृत्वात नरकाची वाट धरतील." आता हे दृष्य प्रत्येक व्यक्ती आपल्या कल्पनेने डोळ्यासमोर आणून समजू शकतो की हे दोन्ही प्रकारच्या मिरवणुकींनी लोक कशाप्रकारे आपापल्या ठिकाणी जातील. स्पष्ट आहे, ज्यांनी जगात लोकांना मार्गभ्रष्ट केले आणि असत्य मार्गावर चालवले अशा मार्गभ्रष्ट नेत्यांचे अनुकरण करणारे, तिथे पाहून घेतील की या अत्याचारींनी त्यांना कोणत्या ठिकाणी आणले आहे. तेव्हा हे लोक आपल्या सर्व संकटांचे मूळ कारण या नेत्यांनाच समजून घेतील. अशा मार्गभ्रष्टांची मिरवणूक त्या वेळी अशा थाटात निघेल की पुढे पुढे हे नेतेगण असतील आणि त्यांचे अनुयायी मागे धिक्कार करत जातील. याविरुद्ध ज्या नेतृत्वामुळे लोक जगात सत्यमार्गी बनून राहतील त्यांना स्वर्गाचे हकदार बनविले जाईल. त्यांचे अनुयायी तिथे त्यांच्यासाठी प्रार्थना करतील आणि मिरवणुकीत स्वर्गाकडे जाताना आपल्या नेते मंडळीची ते प्रशंसा करीत जातील.
१०५) म्हणजे इतिहासाच्या या घटनांमध्ये एक अशी निशाणी आहे ज्यावर विचार केल्याने मनुष्याला विश्वास होतो की परलोकातील शिक्षा निश्चित आहे आणि त्याविषयी पैगंबरांनी दिलेली खबर सत्य आहे. याच निशाणीद्वारा हेसुद्धा माहीत होते की परलोकातील शिक्षा कशी कठोर असेल आणि हा विचार त्याच्या मनात ईशभय निर्माण करून त्या माणसाला सत्यमार्गी बनविल. इतिहासात ती कोणती निशाणी आहे ज्याला परलोक आणि त्याच्या शिक्षेची निशाणी म्हटले जाते. तो मनुष्य सहज जाणू शकतो जो इतिहासाला फक्त एक घटनाचक्रच समजत नाही तर त्या घटनांच्या तर्कांवरसुद्धा विचार करतो आणि त्यापासून निर्णयाप्रत येतो. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासात राष्ट्रघडण व राष्ट्रपतन हे नियमित होत राहिले आहे आणि या घडणीत आणि पतनामागे जी नैतिक कारणे आहेत, राष्ट्राचे पतन ज्या ज्या दंड-शिक्षेमुळे झाले, हे सर्व त्या सत्याकडे स्पष्ट संकेत आहेत की मनुष्य अशा शासनाचा शासित आहे, जे आंधळ्या भौतिक नियमांवर शासन करत नाही. ते शासन स्वत:च्या एका नैतिक नियमावर आधारित आहे.
या नैतिकतेच्या सीमेवर राहणाऱ्यांना पुरस्कृत केले जाते. तसेच या विशिष्ट नैतिक सीमेखाली राहणाऱ्यांना काही काळापर्यंत ढील दिली जाते आणि जेव्हा त्या सीमेच्या फार खाली ते जातात, तेव्हा त्या लोकांना फेकून दिले जाते की ते एकबोधप्रद निशाणी बनून राहतात. मानवी इतिहासात या घटनांचे एका क्रमात घटीत होत राहाणे याविषयी संदेह (शंका) घेण्यापलीकडचे असते की दंड देणे आणि पुरुस्कृत करणे, सृष्टीच्या शासनव्यवस्थेचा एक स्थायी नियम आहे.
जे प्रकोप जगात वेगवेगळ्या राष्ट्रांवर कोसळले आहेत, त्यांच्यावर अधिक विचार केल्यावर कळून येते की ही न्यायाधिष्ठित दंड-शिक्षा आणि पुरस्काराची नैतिक निकड काही सीमेपर्यंत या शिक्षेने पूर्ण होतात. परंतु मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत, कारण जगात जो प्रकोप झाला त्यामुळे त्या विद्यमान मानववंशाची पकड केली, परंतु ज्यांनी दुष्टतेचे बी पेरले होते आणि दुष्टता व अत्याचारांची पिके जोपासून सुगीच्या हंगामापूर्वीच जग सोडून गेले, ज्यांच्या कुकर्मांची फळे नंतरच्या पिढीला भोगावी लागली, परंतु मूळ गुन्हेगार मात्र दंड प्रकि्रयेपासून सुरक्षित राहिले. मानवी इतिहासाच्या अध्यायनाने सृष्टी शासन-स्वभावाला जाणून घेतले तर अध्ययांती स्पष्ट होते की बुद्धी आणि न्यायाने दंडविधानाची नैतिक निकड या जगात अपूर्ण राहिली आहे. या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी हे न्यायीशासन निश्चितपणे दुसरे जीवन निर्माण करील आणि तिथे या सर्व अत्याचारींना कठोर शिक्षा दिली जाईल. जगातील प्रकोपांपेक्षा ते प्रकोप अधिक भयंकर असेल. (पाहा सूरह 7, टीप 20 आणि सूरह 10, टीप 10)
Post a Comment