प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, इतरांशी परोपकाराचा व्यवहार करणाऱ्या माणसाला वाईट- दुःखद मृत्यू येत नाही. छुप्या मार्गानं दान-धर्म (सदका) करणाऱ्यांवर अल्लाह रागवत नाही. नातलगांशी चांगला व्यवहार करणे, त्यांचे हक्काधिकार देणाऱ्यास दीर्घायुष्य लाभते. (ह. उमामा (र.), तरगीब, तिबरानी)
हजरत उबादा बिन सामज (र.) म्हणतात, एके दिवशी प्रेषितांनी विचारले, मी तुम्हाला अशा गोष्टी सांगू ज्यामुळे अल्लाह आपल्या भक्तांचा दर्जा उंचावतो? लोकांनी उत्तर दिले, हो सांगा हे प्रेषिता! प्रेषित (स.) म्हणाले, जे लोक तुमच्याशी वेडेवाकडे बोलतील, अशा लोकांशी तुम्ही शालीनतेने, सन्मानाने बोला. चांगुलपणाचा व्यवहार करा. जे तुमचावर अत्याचार करतील, त्यांना माफ करत जा. जे तुम्हाला देत नसतील, त्यांना तुम्ही त्या. आणि जे नातेवाईक तुमचे हक्काधिकार देत नसतील, तुम्ही त्यांना त्यांचे हक्काधिकार द्या. अशा सर्व प्रकारच्या कर्मांनी मानसांचे दर्जे उंचावतील. (तरगीब व तरहीब, तिबरानी)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, तुम्ही इतरांच्या महिलांपासून दूर राहा, तुमच्या महिला इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यापासून दूर राहतील. आपल्या माता-पित्यांशी प्रेमळ व्यवहार करा, तुमची संतती तुमच्याशी चांगुलपणाचा व्यवहार करील. ज्या मुस्लिमाकडे त्याचा मुस्लिम भाऊ माफी मागण्यासाठी येईल तेव्हा तो जी काही चुकीची सबब किंवा जे काही सांगेल ते स्वीकार करा, ते खरे असो की खोटे, चौकशी करू नका. जर कुणी माफ केले नाही तर जन्नतमध्ये (हौजे कौसर) त्याची माझ्याशी भेट होणार नाही. (ह. अबू हुरैरा, तरगीब व तरहीब, हाकिम)
प्रेषित (स.) आपल्या प्रबोधनात म्हणतात की, प्रत्येक मुस्लिमाने दररोज सदका (दानधर्माच्या गोष्टी) करणे आवश्यक आहे. त्यांचे अनुयायी म्हणाले, हे प्रेषिता, आमच्याकडे इतकी धनसामुग्री कुठे? आम्ही दररोज कसे दान करू शकतो.
प्रेषित (स.) म्हणाले, सदका करण्याचे बरेच मार्ग आहेत. (केवळ धनदौलतच नाही). अल्लाहची स्तुती करणे (अलहम्दुलिल्लाह), अल्लाहच्या परिपूर्णतेचे वर्णन करणे (सुबहानल्लाह), अल्लाहचा गौरव करणे (अलहम्दुलिल्लाह) आणि अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही (लाइलाहा इल्लल्लाह) हे सर्व उच्चारणे देखील सदका (दान करणे) सारखे आहे. इतरांना भल्या गोष्टींची शिकवण देणे, गुन्ह्लांपासून अलिप्त राहणे, इतरांना त्यापासून रोखणे, रस्त्यावरील त्रासदायक वस्तू बाजूला सारणे, एखाद्या बधीर माणसाला त्याला ऐकू येईल अशा आवाजात बोलणे, आंधळ्या माणसाला चालताना मदत करणे, ह्या सर्व गोष्टी नेक कर्मं आहेत. एखाद्या माणसाला त्याच्या उद्दिष्टप्राप्तीसाठी मदत करणे, कुणी कष्टात सापडला असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे आणि एखाद्या दुबळ्या माणसाचे ओझे उचलून नेणे ही सर्व कर्मं नेकीचे कार्य आहेत. त्या सर्वांचा मोबदला दिला जाणार आहे. (तरगीब व तरहीब, इब्ने हब्बान)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment