Halloween Costume ideas 2015

हॅकिंग : चांगले, वाईट आणि कुरूप


अमेरिकेतील ‘एमआयटी’ ही संस्था म्हणजे हॅकर्सचे माहेरघर. ‘हॅकर’ शब्दही आला तो ‘एमआयटी’तूनच. पण ते आजच्या रूढार्थाने ‘हॅकर’ नव्हते. या हॅकिंगचा प्रारंभ झाला तो टेलिफोन हॅक करणाऱ्या फ्रिकर्सपासून. त्यांचे एक वेगळेच तत्त्वज्ञान होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे मूल्य आणि मुक्त माहिती हे ध्येय होते. एकाधिकारशाहीला, तटबंदीला त्यांचा विरोध होता. पण त्यात गुन्हेगारी मानसिकता नव्हती. पुढच्या काळात ती येत गेली. त्यामुळे या फ्रिकर्सना वर्तमानातील हॅकिंगच्या अधोविश्वाचे उद्गातेच म्हणावे लागेल. आ ता 50 वर्षे होऊन गेली त्याला. 1971 च्या ऑक्टोबरमधली ही गोष्ट. 21 वर्षांच्या त्या तरुणाच्या हातात एक मासिक पडले. ‘एस्क्वायर’ त्याचे नाव. त्यातील एका लेखाने त्याचे लक्ष वेधले. त्याचा मथळा होता - ‘सिक्रेट्स ऑफ द लिटल ब्लू बॉक्स’. आजच्या वाचकांना आश्चर्य वाटेल, पण तो पुस्तकाची 50 पाने भरतील एवढा प्रदीर्घ लेख होता. तो होता फ्रिकर्सबाबत. फ्रिकर्स म्हणजे फोन ‘फ्रिकिंग’ करणारे, दूरध्वनी यंत्रणा हॅक करणारे.

अमेरिकेत टेलिफोनचा वापर सुरू होऊन आता नव्वदेक वर्षे झाली होती, पण अजूनही एका टेलिफोन एक्स्चेंजमधून दुसऱ्या केंद्रातील नंबरला फोन करायचा तर त्यासाठी ‘ट्रंक कॉल’ करावा लागे. तो महाग. दूर अंतरावर फोन करायचा, तर अधिकच खर्चिक. पण मग दूरध्वनी कंपन्यांना चुना लावून, फुकटात कॉल करता आला तर? अमेरिकेतील अनेक तंत्र-बंडखोर त्यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हाची दूरध्वनी यंत्रणा होती ‘टोन’ आधारित. साधारणतः विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या आवाजाद्वारे ट्रंक कॉल यंत्रणेला सिग्नल मिळणार आणि ती तो कॉल त्या विशिष्ट नंबरला जोडणार, अशी ती पद्धत. काही लोक तोंडाने शिट्टी वाजवून तो विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा ‘डायल टोन’ काढत असत. ‘कॅप्टन क्रंच सेरिअल’च्या बॉक्समध्ये लहान मुलांसाठी एक शिट्टी येत असे. तिच्यातून तसा ध्वनी निर्माण होत असे. योगायोगाने ती गोष्ट जॉन ड्रेपर या अभियंत्याच्या लक्षात आली. काही तंत्र-बंडखोरांनी तर तसा ‘डायल टोन’ निर्माण करणारे यंत्र तयार करून हे सारंच सोपं केलं. हाताच्या तळव्यात मावेल अशा त्या यंत्राला ‘ब्लू बॉक्स’ म्हणत. एखाद्या सार्वजनिक टेलिफोनवरून नंबर फिरवायचा. ब्लू बॉक्सवरची बटणे दाबून तो ध्वनी निर्माण करायचा. तो टोन रिसिव्हरला ऐकवायचा की पुढचे काम टेलिफोन यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने करायची. अशा पद्धतीने ही मंडळी परदेशातही फोन करू शकायची. तेही अगदी सुरक्षित. ते कुठून फोन करताहेत हेही दूरध्वनी कंपनीला समजायचे नाही. यातील काही लोक केवळ गंमत म्हणून, थरार म्हणून हा उद्योग करायचे. ते याकडे बौद्धिक-तांत्रिक आव्हान म्हणून पाहत. काहींनी मात्र असे ब्लू बॉक्स बनवून विकायचा धंदाच सुरू केला. रॉन रोझेनबम हे नावाजलेले पत्रकार-कादंबरीकार. त्यांनी ल गिल्बर्टसन, ‘कॅप्टन क्रंच’ जॉन ड्रेपर अशा काही नावाजलेल्या फ्रिकर्सशी बोलून हे सगळे प्रकरण मुळातून समजून घेतले आणि ‘एस्क्वायर’मध्ये लेख लिहिला.

तो लेख, त्यातील सखोल माहिती वाचून तो तरुण भारावलाच. त्याने लगेच त्याच्या मित्राला फोन केला. त्या दोघांनी तातडीने स्टॅनफर्ड विद्यापीठातील ग्रंथालयात धाव घेतली. तांत्रिक पुस्तकांची कपाटेच्या कपाटे होती तेथे. हे नेहमी तेथे जात. आता त्यांना हवी होती टेलिफोनविषयक तांत्रिक माहितीची पुस्तके, कार्यपत्रिका, मासिके. तसे एक पुस्तक त्यांना सापडले. त्यात डायल टोनच्या सगळ्या फ्रिक्वेन्सींची नोंद होती. त्यांनी त्याचा अभ्यास केला. कॅप्टन क्रंच यांना मोठ्या प्रयासाने शोधून त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडून धडे घेतले आणि अनेक प्रयत्नांती स्वतःचे ब्लू बॉक्स तयार केले. इतरांपेक्षा ते खूपच वेगळे होते. ते डिजिटल होते. ते निर्माण करून हे दोघेही फ्रिकर्सच्या पंगतीत जाऊन बसले. त्यातील त्या मोठ्या तरुणाचे नाव होते स्टीव्ह वॉझनियाक. वॉझ म्हणत त्याला. आणि त्याच्या त्या 17 वर्षांच्या मित्राचे नाव होते - स्टीव्ह जॉब्ज. हे दोघेही ‘पल’चे जनक. यांच्या ‘व्यवसाया’ची सुरुवात झाली, ती मात्र फोन फ्रिकिंगमधून. दोन्ही स्टीव्हपैकी वॉझ हे ब्लू बॉक्स करीत आणि जॉब्ज त्याच्या विक्रीची बाजू सांभाळत. त्या व्यवसायतही ते दुपटीहून अधिक फायदा कमावत होते. हे सारेच बेकायदेशीर. या सर्व फ्रिकर्सच्या विरोधात पुढे ‘एफबीआय’ने आघाडी उघडली. अनेक फ्रिकर्सना पकडले. ज्यांच्याकडे ब्लू बॉक्स सापडले, अशांनाही तुरुंगात टाकण्यात येऊ लागले. वॉझ आणि जॉब्ज यांच्या ग्राहकांपर्यंत एफबीआय’ पोहोचली होती. संगणकविश्वाचे सुदैव की, तेव्हा त्यांना हातकड्या पडल्या नाहीत. हे फ्रिकर्स म्हणजे आजच्या अर्थाने आद्य हॅकर्स. बेकायदेशीर, अनधिकृत काम करणारे. तसे हॅकर्सचे चांगले आणि वाईट, ‘व्हाइट’ आणि ‘ब्लॅक हॅट’ असे प्रकार आहेत. पण तरीही हॅकिंग म्हटले की, समोर उभे राहते ती गुन्हेगारीच. या शब्दाला आधी मात्र अशी काळी छटा नव्हती. एखाद्या यंत्रणेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करणे या अर्थाने हॅकिंग या शब्दाचा वापर 1959 मध्ये पहिल्यांदा झालेला आढळतो. ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील (एमआयटी) ‘टेक मॉडेल रेलरोड क्लब’मधून हा शब्द लोकप्रिय झाला. रेल्वेचे काम कसे चालते, हे समजून घेऊन त्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने या क्लबची स्थापना झाली होती. 

‘एमआयटी’तील विद्यार्थी तेथे फावल्या वेळात काम करीत असत. नवनवे प्रयोग करीत असत. त्यांचे विविध गट असायचे. त्यातला एक होता- सिग्नल अँड पॉवर कमिटी. ते स्वतःला अभिमानाने ‘हॅकर’ म्हणवून घेत असत. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत काय बदल करता येतील, ती अधिक अत्याधुनिक-अधिक सुधारित कशी करता येईल असे त्यांचे उद्योग चालायचे. प्रारंभी यातलेच काही विद्यार्थी संस्थेच्या अवाढव्य संगणकाचा गुपचूप वापर करत असत. या संगणकाचा वेगवेगळ्या पद्धतीने कसा उपयोग करता येईल याच्या विविध शक्यता ते आजमावून पाहायचे. संगणकीय भाषांची, तंत्रांची उत्क्रांती झाली ती अशा गोष्टींतूनच.

या हॅकर्सचे एक वेगळेच तत्त्वज्ञान होते. स्वातंत्र्य हे त्यांचे मूल्य होते. एकाधिकारशाहीला, तटबंदीला त्यांचा विरोध होता. मुक्त माहिती हे त्यांचे ध्येय होते. कधी कधी ते गमतीजमती करीत, खोड्या काढीत. पण त्यात गुन्हेगारी मानसिकता नव्हती. पुढच्या काळात ती वाढत गेली. त्यामुळे हॅकिंगच्या अधोविश्वाचे उद्गाते म्हणावे लागेल, ते त्या फोन फ्रिकर्सना. त्यांच्याविषयी ‘एस्क्वायर’मध्ये लेख आला आणि तोच त्यांच्या अंताचा प्रारंभ ठरला. हा तोच काळ होता, जेव्हा संगणकांची ताकद वाढत चालली होती आणि दुसरीकडे इंटरनेटचा पाळणा हलू लागला होता. त्याची सुरुवात झाली होती 1969 मध्ये.. अर्पानेटपासून.

अर्पानेट म्हणजे ‘डव्हान्स रिसर्च प्रोजेक्टस एजन्सी नेटवर्क’. हा अमेरिकी लष्कराचा प्रकल्प. लष्करासाठी काम करत असलेल्या संशोधन संस्थांतील संगणक दूरध्वनीद्वारे एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशाने तो सुरू करण्यात आला होता. पण या जाळ्याद्वारे ‘एमआयटी’सारख्या विविध संस्थांतील हॅकर्सही एकमेकांना जोडले गेले होते. हॅकिंगची संस्कृती विस्तारत चालली होती. व्यवस्थेला, कायदे आणि नियमांना धाब्यावर बसवणे हा या संस्कृतीचा पायाच. पण ती चांगल्याकडून वाईटाकडे, कुरूपतेकडे चालली होती. 1981 मध्ये ‘आयबीएम’चा वैयक्तिक संगणक आला आणि ही कुरूपता सामान्यांच्या घरापर्यंत पोहोचली. 

ravi.amalegmail.com

संपर्क : 9987084663

साभार : दिव्य मराठी, रसिक स्पेशल


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget