राजा शिवछत्रपती ही महाराष्ट्राचीच नव्हे तर सर्व भारतीयांची स्फुर्तीस्थान आहे. मानवी कर्तृत्व कसे आभाळाएवढे भव्यदिव्य असू शकते, याचे ते मूर्तीमंत प्रेरणास्थान आहे. शिवकार्याची महानता केवळ ऐतिहासिक घटना म्हणून नाही तर ती इतिहासातील सुवर्णपान आहे. केवळ ‘शिवाजी’ या नावाचा उच्चार जरी केला तरी प्रत्येक मराठी माणसाचे बाहू आजही स्फूरण पावतात. छत्रपती शिवरायांच्या चरित्र आणि चारित्र्याचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत सर्व प्रकारच्या जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचे अतिशय कठीण काम लीलया करून दाखविले आहे. सध्याच्या काळात छत्रपती शिवरायांच्या या कामगिरीची अधिक विस्तृत ओळख करून देणे अतिशय गरजेचे आहे. कारण राजकीय स्वार्थासाठी जाती-जातींमध्ये धर्मा-धर्मांमध्ये भेद करण्याची कूटनीती जवळपास सर्वच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात वापरण्यात येते, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. ज्या संतांनी समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन जाती-धर्माचा पर्दाफाश करण्याचे महत्कार्य केले तसेच जवळपास सर्व संतांनी जाती-धर्माची बंधने झुगारुन देऊनच समतेची शिकवण दिली, तर सर्व संतांना प्रत्येक जातीने वाटून घेतले आहे, असे चित्र सध्या महाराष्ट्रात तरी ठळकपणे दिसत येत आहे.याबाबत समाजपुरुषाचे प्रबोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.
सतराव्या शतकाच्या मध्यकाळात अवघा हिंदुस्थान परकीयांच्या अमलाखाली अक्षरश: भरडला जात होता. त्या वेळी छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीचे मावळे एकत्र केले. या मराठा मावळ्यांच्या असीम त्यागाने व अद्वितीय पराक्रमाने महाराष्ट्र देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्याचे अद्वितीय कार्य शिवरायांनी केले आहे. त्यांनी अत्यंत कुशलतेने व कल्पकतेने स्वराज्याची निर्मिती केली. या स्वराज्याच्या छायेत जे कुणी राहत होते त्या सर्व जाती व धर्माच्या लोकांना त्यांनी समानतेची वागणूक दिली. त्यांच्या राज्यात उच्चवर्णीय म्हणून कुणालाही खास वागणूक दिली जात नव्हती. स्पृश्य- अस्पृश्य हा भेदभावही केला जात नव्हता. तत्कालीन काळात सर्वस्वी अपरिचित असलेल्या धर्म-जातीनिरपेक्ष अशा लोकांभिमुख नेतृत्वाचे शिवरायांनी प्रत्यंतर आणून दिले. शिवकाळात सर्वजाती धर्माच्या लोकांना एकत्रित करणे, म्हणावे तेवढे सोपे नव्हते, मात्र शिवरायांनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, या उक्तीप्रमाणे सर्व जातीधर्मातील युवकांना एका उच्च ध्येयाने प्रेरित केले व त्यांचे संघटन केले व त्यातून स्वराज्याची निर्मिती केली, त्यांच्या अद्वितीय संघटन व व्यवस्थापन या गुणांचे देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक झाले
आहे.
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रांतात जुलूम, अत्याचार, दंगेधोपे, खंडणी यांनी अक्षरश: थैमान घातले होते. त्यामुळे सामान्य माणूस भीतीच्या व दहशतीच्या दडपणाखाली वावरत होता. आपल्या आया-बहिणींच्या अब्रूंचे धिंडवडे निघताना तो असहाय्य नजरेने पाहत होता. अवघा महाराष्ट्र अन्याय आणि अत्याचाराने पिचून गांजून गेला होता. अनेकांचे बळजबरीने धर्मांतर केले जात होते. पण शिवरायांनी आपल्या जातीच्या व सर्व धर्मांच्या लोकांना दिलासा दिला. त्यांनां आधार दिला. त्यांच्या पदरी सर्व जातींचे तसेच सर्व धर्मांचे, प्रामाणिक, नि:स्पृह व लढवय्यै सरदार व सैनिक होते. त्यांनी धार्मिक क्षेत्रातील अन्यायाला मूठमाती दिली. अंधश्रद्धेला बळी पडून दारिद्रय पदरी घेणार्या तत्कालीन रयतेला श्रमप्रतिष्ठेची शिकवण दिली, आपल्या राज्यात शिवरायांनी परिश्रम आणि पराक्रम या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व दिल्याचे दिसून येते. कष्टकऱ्यांना कष्टाचे मोल मिळाले पाहिजे याविषयी त्यांचा विशेष दंडक असे. "ज्याच्या हाताला रट्टा त्यालाच जमिनीचा पट्टा" असा महसुली आदेश काढून कष्टकऱ्यांना व श्रमजिवींना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी (कारागिरांसाठी) त्यांनी आपल्या राज्यात लोकाभिमुख योजना राबविल्या, त्यासाठी कठोर उपाय योजले तसेच आदेशही काढले. अर्थात स्वराज्य हे कोण्या उच्चवर्णीयांचे व ऐतखावूंचे नसून छातीचा कोट करून पराक्रम गाजविणार्या मर्द मावळ्यांचे आहे. ही भावना त्यांनी सर्वांच्या ठायी रुजविली.
शिवरायांनी त्यांच्या राज्यात धार्मिक अन्यायाला पायबंद बसविला. मुसलमानांच्या मशिदींना हिंदूंच्या देवळाप्रमाणे समान वागणूक दिली. कित्येक मशिदींना व मुस्लिम समाजातील प्रार्थनास्थळांना जमिनी व वतने इनाम देवून त्यांच्या निगराणीची व्यवस्था लावली. शिवरायांच्या या आपलेपणाच्या वागणुकीमुळे जाती-धर्मांमध्ये किंवा
धर्मा-धर्मांमध्ये कलह झाल्याचे कधीच दिसून आले नाही. उलट इथल्या रयतेला शांततेत व सुव्यवस्थेत सुखनैव जगता येते हे पाहून हिंदुस्थानातील इत्तर प्रांतातील लोक शिवरायांच्या सुराज्यात राहायला आले. गुजरात, मारवाड, कर्नाटक, मद्रास येथून आलेले अठरापगड जातींचे व विविध धर्मांचे हजारो लोक मराठी भाषा व इथले रीतिरिवाज शिकून इथे महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. काहींना तर आपला प्रांत कोणता आहे हे आता आठवत सुध्दा नाही, इतके ते इथल्या मातीशी एकजीव झाले आहेत.
आजही भारतीय स्वातंत्र्याचा जरीपटका सतत शिवरायांचा समतेचा विचार दाहीदिशा फडकावित आहे. या झेंड्याच्या आश्रयाखाली जेजे कुणी आले त्या सार्यांना समानतेची व सन्मानाची वागणूक मिळाली आहे अर्थात, या पाठीमागे छत्रपती शिवरायांचे व्यापक राजकीय धोरण कारणीभूत होते. सद्यस्थितीला भारत देशाची एकूणच सामाजिक परिस्थिती पाहिली तर दुसऱ्या कोणत्याही राज्यात महाराष्ट्राइतका राष्ट्रीय एकात्मतेचा समन्वय झालेला दिसून येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दूरदृष्टीचा जाणता राजा या भूमीला लाभल्यामुळेच आजही महाराष्ट्रात सर्व जाती, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत.आभाळाएवढे कर्तृत्व गाजवलेल्या या राजाने रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा आणि पराक्रमाचा आदर्श निर्माण केला आहे, तो आजही अखंडपणे तेवत आहे.
- सुनीलकुमार सरनाईक
भ्रमनध्वनी : 9420351352
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी या वृत्तपत्राचे संपादक आहेत.)
Post a Comment