प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका प्रवचनात म्हटले, ‘‘हे लोकहो, तुमच्यापैकी कुणीही भीतीपोटी सत्य सांगण्यापासून स्वतःला रोखू नये.’’ अबू सईद खुदरी म्हणतात की ‘आम्ही वाईट घडत असताना पाहिले पण भीतीपोटी त्यास वाईट म्हटले नाही.’
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुमच्यामधील कुणी स्वतःला अपमानित करू नये.’’ लोकांनी विचारले, ‘आम्ही स्वतःला कसे अपमानित करू शकतो?’ प्रेषितांनी उत्तर दिले, ‘‘अल्लाहच्या आज्ञेचे उल्लंघन होत असताना त्याविरूद्ध काही बोलला नाही. अल्लाह अशा व्यक्तीला विचारेल, तुम्हास कोणी रोखले होते? ती व्यक्ती म्हणेल की मी लोकांना घाबरलो होतो. तेव्हा अल्लाह म्हणेल, याहून उत्तम तर हे होते की तुम्ही मला घाबरावे.’’
सत्ताधाऱ्यांविरूद्ध लढा देण्याचा अर्थ वाईट वृत्तींना रोखणे आहे, त्यांच्याविरूद्ध बंड करणे नव्हे. अशा प्रकारे आपल्या कुटुंबियांना आणि इतर सहकाऱ्यांना जीवित व वित्तहानीचा धोका असेल तरीदेखील त्यांच्याविरूद्ध बळाचा वापर करता कामा नये. पण जर स्वतःला अपमानित करण्यापासून रोखायचे असेल तर हे अधिक उत्तम आहे. पवित्र कुरआनात म्हटले आहे की,
‘‘तुम्ही स्वतःसाठी जबाबदार आहात. दुसरे लोक भरकटून गेले असतील तर तुम्हाला काहीही करू शकत नाहीत. जर तुम्ही स्वतः रास्त मार्गावर असाल तर.’’
हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर (र.) म्हणतात की एकदा आम्ही सर्वजण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सान्निध्यात होतो. प्रेषितांनी अनाचार माजल्याचा उल्लेख केला. आम्ही विचारले की याचा अर्थ काय? प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘जेव्हा तुमच्या समोर लोक वचनभंग करू लागतील, त्यांच्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नसेल आणि ते एकमेकांशी भांडू लागतील.’’ अब्दुल्लाह इब्ने उमर (र.) यांनी विचारले, ‘अशा परिस्थितीत आम्ही काय करावे?’ प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘स्वतःची काळजी घ्या. घरात राहा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जे तुम्हाला माहीत आहे ते धरून ठेवा आणि जे तुम्हाला माहीत नाही ते सोडून द्या. कारण तुमच्यावर तुमची स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही सरळमार्गावर आसाल तर भरकटलेले लोक तुम्हाला हानी पोहोचवू शकत नाहीत.’’ (कुरआन, माइदा-१०५)
अब्दुल्लाह इब्ने मसऊद (र.) म्हणतात, ‘जेव्हा लोकांच्या मनामध्ये तेढ निर्माण होतो आणि लोक वेगवेगळ्या गटातटांत विभागले जातात आणि एकमेकांविरूद्ध बळाचा वापर करू लागतात तेव्हा या शिकवणीचे आचरण करा.’
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
Post a Comment