Halloween Costume ideas 2015

आत्मविश्वास आणि धैर्य

आपल्या आजुबाजूला प्रतिकुल परिस्थिती असतांनाही ज्यांनी प्रचंड यश मिळविलेले आहे, त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात "हे यांना कसे शक्य झाले?" असा प्रश्न पडतो, इतकेच नव्हे तर अशा यशस्वी व्यक्तीबद्दल काही अफवा सुद्धा पसरवून त्याच्याबद्दल असूया व मत्सर व्यक्त केला जातो, मात्र यशस्वी व्यक्ती अशा फूटकळ गोष्टींकडे साधे लक्ष ही देत नाहीत, कारण त्यांच्या मनात आपल्या कामाबद्दल तसेच यशाबद्दलचा दांडगा आत्मविश्वास असतो, तसेच प्रत्यक्ष वाटचालीत त्यांच्याकडे प्रचंड धैर्य असते.

आत्मविश्वास आणि धैर्य जीवनात माणसाला यशस्वी बनवतात, "मी हे नक्कीच पूर्ण करीन, माझ्या अंगात तितके सामर्थ्य आहे." असा आत्मविश्वास ते काम सुरू करतानाच व्यक्त करतात, तसेच त्यांच्या अंगी प्रचंड धैर्य असल्याने ते अंगीकृत कार्यात किती ही संकटे आली तर किंवा अडचणी व अडथळे निर्माण झाले तर धैर्याने त्या संकटांना अडचणींना व अडथळ्यांना तोंड देतात व अशा गोष्टींवर मात करून पुन्हा यशस्वी होण्यासाठी मागे लागतात, ते इतरांवर फारसे अवलंबून राहत नाही, "जो दुसर्‍यावरही विसंबला त्याचा कार्यभाग नासला" हे सुभाषित त्यांनी आपल्या मनात कायमचे बिंबवलेले असते. त्यामुळे स्वत:वर पूर्णपणे अवलंबून राहणे किती सुखाचे असते, ते त्यांना अनुभवातून चांगलेच उमजलेले असते.

आत्मविश्वास आणि धैर्य या गुणांच्या जोरावर ते कितीही कठीण काम असो, त्याच्या पूर्ततेसाठी झटत असतात, ‘धाडसाला लक्ष्मी माळ घालते’  या न्यायाने त्यांच्यावर लक्ष्मी व भाग्य दोन्ही ही भरपूर कृपा करतात. आत्मविश्वास व धैर्य या गुणांमुळे त्यांच्याठायी प्रचंड  जीवनऊर्जा निर्माण होते. त्यातूनच प्रचंड उत्साह निर्माण होतो, जीवनउर्जा आणि उत्साह त्यांना सतत प्रेरणा व प्रोत्साहन देत असतात, अशा सतत उत्साही असलेल्या व्यक्तीबद्दल मित्रमंडळींना ही आदर वाटत राहतो, त्यामुळे मैत्रीचे वर्तुळ ही वाढू लागते. अर्थात त्यामुळे त्यांचा नित्य उगवणारा दिवस मोठ्या आनंदात व्यतित होतो.

जीवन हे एक आव्हान आहे, हे अशा व्यक्तींना पुरेपूर ज्ञात असते, त्यामुळे याच जीवनात, याचवेळी काहीतरी भव्यदिव्य प्रचंड करून दाखवावे, असा त्यांचा आतला आवाज त्याला नेहमी सांगत असतो, त्यांच्या अंगी असणारा दांडगा आत्मविश्वास व प्रचंड धैर्य त्याला यश मिळेतोपर्यंत गप्प बसू देत नाही. त्यमुळे सतत ते कार्यमग्न असतात. या त्यांच्या सततच्या उद्यमशीलतेमुळे त्यांच्यामध्ये मोठी क्षमता व गुणवत्ता निर्माण झालेली असते, त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास अधिक वृद्धींगत होतो.

‌आत्मविश्वासामुळे अशा व्यक्ती निर्णय घेण्यात तत्पर असतात. पुढाकार घेणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे, आशावादी होवून अंगीकृत कार्यात इंटरेस्ट किेंवा उत्साह निर्माण करणे, सर्वांना बरोबर घेवून पुढे जाणे अशा गोष्टींमुळे त्यांना यश नजरेच्या टप्प्यात आल्यासारखे वाटते, ध्येयाकडे लक्ष देवून उत्साहाने कार्यारंभ करतात, त्यांच्या अंगात एक प्रकारची धमक निर्माण झालेली असते.‌अशा यशस्वी व्यक्तींचा स्वतःच्या मनावर प्रचंड ताबा असतो, भावना व सवयीच्या आहारी ते जात नाहीत, सर्वांगाने विचार करून आपल्या यशस्वी जीवनाला तारक असणारा निर्णय ते घेत असतात, त्याकरिता त्यांच्याकडे संयम हा गुण ही असतो, प्रचंड आत्मविश्वास त्यांना नेहमी चेतना व उत्तेजन देत असतो, मार्वा कॉलिन्स एकेठिकाणी म्हणतो "यश आपल्याकडे चालत येत नाही, आपल्यालाच त्याच्याकडे जाव लागतं" हे सुभाषित यशस्वी व्यक्ती नेहमी लक्षात ठेवून वागत असतात. सॅम्युअल जॉनसन तर म्हणतो की, "कोणत्याही महान कार्यासाठी सर्वप्रथम आवश्यकता असते, ती आत्मविश्वासाची." आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्लीच म्हणायला हवी, तसेच धैर्य म्हणजे यशाच्या उंबरठ्यावर जाण्यासाठी सातत्याने करावे लागणारे प्रयत्न होय. धैर्यामध्ये प्रचंड ताकद असते. आपल्याला नेहमीचे ‘वार’ माहीत आहेत, पण यशस्वी व्यक्तीला ‘धैर्यवार’ माहीत असतो, जो त्याला प्रत्येक संकटातून सोडवू शकत असतो. 

आत्मविश्वास आणि धैर्य या दोन गोष्टी अशा आहेत की व्यक्तीच्या जीवनातील संकटे त्याच्यापुढे नतमस्तक होतात, किंवा अशा व्यक्तीच्या यशापुढे ते तग धरू शकत नाहीत, म्हणून आत्मविश्वास आणि धैर्य नसणारी व्यक्ती गरीब,  अपयशी व कमनशिबी असते, असे म्हंटले जाते, ते उगीच नाही. यशासारखे दुसरे यश नाही, अर्थात यश मिळण्यासाठी व्यक्तींजवळ आत्मविश्वास आणि धैर्य असणे आवश्यक आहे.


- सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी - 9420351352

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून 'करवीर काशी' चे संपादक  आहेत.)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget