Halloween Costume ideas 2015

तर आपण नक्कीच 'लकी' व्हाल...!

प्रत्येकाचे आयुष्य वळण वाटा ने भरलेले असते. माणसाच्या आयुष्यात नेहमी सुख किंवा नेहमी दुखत असते असे नाही, मात्र बऱ्याचदा अनेकांना आपल्या वाट्याला आलेली दुःखे कवटाळण्याची सवय असते,त्यातच त्यांना आनंद मिळतो की काय असे वाटते,खरं तर ते आपल्या आयुष्याला  दुःखाच्या खाईत लोटत असतात. त्यातूनच ते नेहमी 'ना' चा पाढा गात असतात, त्यांची प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भूमिका असते."मी जन्मता दुर्देवी आहे." "माझे नशीबच फुटके आहे". "मी कमनशिबी आहे" किंवा "मला कशातच यश मिळत नाही," अशा प्रकारची त्यांची वाक्ये सतत त्यांच्या तोंडून बाहेर पडत असतात. नशिबाला दोष देण्यात ते धन्यता मानत असतात. माझा एक मित्र सतत कष्ट करीत आला आहे. त्याचा कुरियर सर्व्हीस चा व्यवसाय आहे.तो दिवस रात्र राबत असतो पण त्यामध्ये त्याला जेमतेमच कमाई होते. तो एकदा माझ्या कार्यालयात आला आणि आपली दुर्दैवी कहाणी सांगत बसला. नशिबावर त्याचा विश्वास होता. त्याने सांगितले मी सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करीत असतो. अक्षरश: पाठीचा कणा मोडीस्तोवर राबराब राबत असतो, तरीही मला अपेक्षित असणारे यश गेल्या चाळीस - पन्नास वर्षात मिळाले नाही. काम करण्याच्या मागे सतत कामच लागते, मात्र एवढे काबाडकष्ट करूनही माझ्या आयुष्यात काहीही चांगला बदल झालेला नाही. माझ्या नशिबात छप्पर फाडके यश नाही ,रोज राबणे हेच माझ्या नशिबात आहे.

खरंतर माणसाला आपल्या व्यवसायाचा अंदाज येत असतो अनेकदा पराकोटीचा प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, तर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा त्या व्यवसायात कल्पकतेने बदल केला पाहिजे. राबराब राबून यश मिळत नसेल तर व्यवसाय सुद्धा बदलला पाहिजे,कारण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ऑटोमोबाईल स्पेअर्स पार्ट व्यवसाय वीस वर्ष उत्तमपणे चालत असताना ही सन २००२ साली मला व्यवसायातील मंदीची कल्पना अगोदरच आली होती. मी सदरचा व्यवसायातून हळूहळू निवृत्ती घेतली, आणि दुसरा व्यवसाय सुरू केला,त्या व्यवसायात मी अत्यंत परीश्रमाने तसेच कौशल्याने गती दिली,त्यातूनच मला बऱ्यापैकी यश मिळू लागले. त्यानंतर मी निष्ठापूर्वक त्या व्यवसायात कष्ट घेतले,

थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य म्हणजे प्रत्येकाने आपल्या अधिकृत व्यवसायाचा अंदाज घेऊन वेळीच बदल केला पाहिजे,वारे कोणत्या दिशेने वाहत आहे,हे पाहीले पाहिजे. अन्यथा यश माझ्या नशिबातच नाही असे म्हणून नकारात्मक भावनेला खतपाणी घालून सतत अपयशाचे धनी व्हावे लागते.

 वास्तविक कोणी जन्मताच दुर्देवी किंवा अपशकुनी असत नाही, तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला मी लकी होणारच,असा सकारात्मक संदेश दिला पाहिजे, तर तुम्ही निश्चितच लकी व्‍हाल...! तुमच्या अंतर्मनाला सतत दुखी भावना किंवा अपयशी विचार पेरले की प्रत्यक्षात तुम्ही अयशस्वी होता किंवा अपयशाचे धनी होता असा सर्वांचाच अनुभव आहे. सुखी व समृद्ध होणे हे ९०% सुखी व निरोगी भावनांवर व विचारांवर अवलंबून आहे.

अनेकदा परीक्षेच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत मनाला सकारात्मक विचारांचा संदेश देणे अत्यंत महत्त्वाचे असते. सकारात्मक विचारातूनच प्रगतीला स्फूर्ती व प्रेरणा मिळत असते. मागे एका कुस्तीच्या मैदानात दोन पैलवानांपैकी एक बलदंड वजनदार पैलवान होता, तर दुसरा पैलवान त्याच्या तुलनेने फारच कमी वजनदार होता. या पहिल्या बलदंड पैलवाना समोर त्या दुसऱ्या पैलवानाचा निभाव लागणे अत्यंत कठीण वाटत होते. मात्र जेव्हा दोन्ही पैलवान मैदानात एकमेकाला भिडले,तेव्हा दुसऱ्या पैलवानाकडे असणारी चपळता आणि कुस्तीच्या डावातील कौशल्य या जोरावर बलदंड वजनदार पैलवानाला त्यांने जेरीस आणले आणि काही मिनिटांतच त्या बलदंड पैलवानांला त्यांने अस्मान दाखवले. पुढे त्या विजयी पैलवानाची मी मुलाखत घेतली त्यावेळी त्याने संपूर्ण यशाचे श्रेय त्याच्या सकारात्मक विचारांना दिले, तो म्हणाला की माझी या पैलवानासोबत ज्या दिवशी सलामी झाली. त्या दिवसापासून मी विजय होणारच आहे, अशा सूचना मी माझ्या अंतर्मनाला देत होतो, शिवाय  मी माझ्या अंगात जास्तीतजास्त चपळता आणण्यासाठी दररोज दहा बारा मैल पळण्याचा व्यायाम करीत होतो. शिवाय पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत मैदानातील लाल मातीत मेहनत करून स्टॅमिना वाढविण्याचा प्रयत्न करीत होतो. आपण ही कुस्ती जिंकणारच आहे असा भाव सातत्याने कायम ठेवण्यात मी यशस्वी झालो होतो, त्यामुळेच मी शेवटी त्या बलदंड व वजनदार प्रतिस्पर्ध्यास पराभूत केले आणि मी विजयी झालो.

तात्पर्य प्रत्येकाने आपल्या नशिबाला दोष न देता सकारात्मक विचाराने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते. यासाठी मात्र सकारात्मक विचारधारा महत्त्वाची आहे, अन्यथा सतत नकारात्मक विचारांचा पाढा वाचत बसल्यास अपयशाचे धनी व्हाल. तुम्ही स्वतःला "लकी" म्हणत चला म्हणजे "लक" आपल्या पाठीशी लागेल,व आपण नक्कीच लकी व्हाल.

-सुनीलकुमार सरनाईक

भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी वृत्तपत्राचे संपादक आहेत)


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget