Halloween Costume ideas 2015

सूरह हूद :ईशवाणी (सुबोध कुरआन)

 


(६२) त्यांनी सांगितले, ‘‘हे सॉलेह (अ.)! याच्यापूर्वी तू आमच्यामध्ये असा इसम होतास ज्याच्याशी मोठ्या अपेक्षा निगडित होत्या.७० तू आम्हाला त्या उपास्यांच्या उपासनेपासून रोखू इच्छितोस काय ज्यांची पूजा आमचे वाडवडील करीत होते?७१ तू ज्या पद्धतीकडे आम्हाला बोलवीत आहेस त्याच्याबद्दल आम्हाला मोठी शंका आहे जिने आम्हाला संभ्रमात टाकले आहे.’’७२ 

(६३) सॉलेह (अ.) ने सांगितले, ‘‘हे माझ्या देशबंधुंनो! तुम्ही कधी या गोष्टीचादेखील विचार केलात काय की जर मी आपल्या पालनकत्र्याकडून एक स्पष्ट साक्ष बाळगत होतो आणि त्याने आपल्या कृपेनेदेखील मला उपकृत केले. तेव्हा यानंतर अल्लाहच्या तावडीतून मला कोण वाचवील जर मी त्याची अवज्ञा केली? तुम्ही माझ्या कोणत्या उपयोगी पडू शकता याखेरीज की मला जास्त तोट्यात घालाल.७३

(६४) आणि हे माझ्या देशबंधुंनो! पाहा ही अल्लाहची सांडणी तुमच्यासाठी एक संकेत आहे. हिला अल्लाहच्या जमिनीत चरावयास मुक्त सोडा. हिची जरादेखील छेड काढू नका अन्यथा काही जास्त वेळ लागणार नाही की तुमच्यावर अल्लाहचा प्रकोप येईल.’’

(६५) पण त्यांनी सांडणीला मारून टाकले. यावर सॉलेह (अ.) ने त्यांना बजावले, ‘‘आता केवळ तीन दिवस आणखी आपल्या घरात निवास करा, ही अशी मुदत आहे जी खोटी ठरणार नाही.’’

(६६) सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तेव्हा आम्ही आमच्या कृपेने सॉलेह (अ.) व त्या लोकांना ज्यांनी त्याच्याबरोबर श्रद्धा ठेवली होती, वाचविले आणि त्या दिवसाच्या नामुष्कीपासून त्यांना सुरक्षित ठेवले.७४ नि:संशय तुझा पालनकर्ता वस्तुत: शक्तिशाली व वर्चस्व बाळगणारा आहे.

(६७) उरले ते लोक ज्यांनी अत्याचार केले, एका भयंकर विस्फोटाने त्यांना धरले आणि ते आपल्या वस्तीत अशाप्रकारे निपचित पडलेले पडूनच राहिले,

(६८) जणूकाही ते तेथे कधी वसलेच नव्हते. ऐका, समूद लोकांनी आपल्या पालनकत्र्याशी द्रोह केला. ऐका, दूर फेकले गेले समूद.



७०) म्हणजे तुमचा विवेक, बुद्धिमत्ता, सूझबुझ, गंभीरता आणि शालीनता तसेच प्रतिभाशाली व्यक्तित्वाला पाहून आम्हीही आशा करून होतो की तुम्ही मोठे माणूस बनाल आणि आपले भौतिक जग खूप बनवाल. दुसऱ्या राष्ट्रासारखे तुमच्या ज्ञानाचा लाभ उठविण्याची संधी मिळेल. परंतु तुम्ही एकेश्वरत्व आणि परलोकत्वाचा नवा राग अलापून आमच्या सर्व आशांवर पाणी फेरले आहे. लक्षात असू द्या की असेच काही विचार पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी त्यांच्या समुदायातील लोकांचे होते. ते पैगंबर होण्यापूर्वी मुहम्मद (स.) यांच्या श्रेष्ठ योग्यतांना मानत होते आणि समजत होते की हा मनुष्य एक मोठा व्यापारी बनेल. याच्या सजग बुद्धीने आम्हालाही फायदा होईल. परंतु त्यांच्या आशेविरुद्ध पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकेश्वरत्व आणि परलोकत्व तसेच उच्च् नैतिक गुणांकडे बोलविणे सुरु केले. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या समुदायातील लोक (मक्कावासी) निराशच झाले नाही तर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी बेजार झाले. ते म्हणू लागले की चांगल्या भल्या कामाचा माणुस होता; अल्लाहलाच माहीत की याला कोणता जादूटोणा झाला आहे. स्वत:चे जीवन बरबाद केले आणि आमच्या सर्वांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

७१) हा एक तर्क आहे की हे उपास्य उपासनेचे अधिकारी का आहेत? (पूर्वजांच्या काळापासून त्यांची उपासना होत आली आहे म्हणून) त्यांची उपासना सोडली जाऊ शकत नाही.

७२) ही शंका आणि बेचैनी कोणत्या गोष्टीत होती? याचे स्पष्टीकरण येथे देण्यात आले नाही. त्या वेळी बेचैन तर सर्वजण होते, परंतु प्रत्येकाची बेचैनी वेगळया प्रकाराची होती. सत्य संदेशाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे जेव्हा तो उभा ठाकतो तेव्हा लोकांच्या मनात बेचैनी उत्पन्न होते. प्रत्येकाची भावना वेगवेगळी असली तरी या बेचैनीत सर्वांनाच हिस्सा मिळतो. यापूर्वी सुख-चैनीत व मार्गभ्रष्टतेत लोक होते. त्यांना आपण काय करत आहोत, याचा कधीही मनात विचार येत नसे. या संदेशामुळे (एकेश्वरत्वाचा संदेश) ते सुखचैन आता राहिले नाही आणि यापुढे राहूही शकत नाही. अज्ञानतापूर्ण व्यवस्थेच्या कमतरतांवर सत्य वाहकाची सडेतोड आलोचना, सत्याला सिद्ध करण्यासाठी त्यांचे जोरदार तर्क, तसेच त्यांचे उच्च् कोटीचे चरित्र, त्यांचे दृढ संकल्प, त्यांची सहनशीलता, सज्जनता, त्यांचे सत्यनिष्ठ व्यवहार आहेत. त्या सत्यवाहकाचे अत्यंत तत्त्वदर्शितापूर्ण ज्ञान ज्याचा प्रभाव मोठमोठ्या दुराग्रहीच्या मनावर पडतो, त्यांच्या जीवनात या सत्य संदेशाच्या प्रभावाने असाधारण क्रांती होत जाते. हे सर्व परिवर्तन मिळून त्या लोकांच्या मनांना बेचैन करून टाकतात, ज्यांना सत्य आल्यानंतरही पुरातन अज्ञानता सोडूशी वाटत नव्हती.

७३) म्हणजे मी आपल्या विवेकाविरुद्ध आणि त्या अल्लाहने दिलेल्या ज्ञानाविरुद्ध केवळ तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी भ्रष्टतेच्या मार्गावर तुमच्याबरोबर चालणे कसे शक्य आहे ? अल्लाहच्या पकडीतून तुम्ही मला वाचवू शकणार नाही तर तुमच्यामुळे माझा अपराध आणखीन वाढेल आणि अल्लाह मला शिक्षा देईन. अल्लाहने तर मला तुम्हाला सरळमार्ग दाखविण्यासाठी नियुक्त केले होते. मी तुम्हाला सरळमार्ग दाखविण्याऐवजी हेतुपुरस्सर उलटा मार्ग दाखवून मार्गभ्रष्ट केले तर हे कसे शक्य आहे?

७४) सीना प्रायद्वीपमध्ये जी कथनं प्रसिद्ध आहेत, त्याद्वारा माहीत होते की जेव्हा समूदच्या लोकांवर प्रकोप कोसळला तेव्हा आदरणीय सॉलेह (अ.) हिजरत (स्थलांतर)करून तेथून गेले होते. म्हणून आदरणीय मूसा (अ.) यांच्या पर्वताजवळील एका पर्वताचे नाव बनीसॉलेह आहे. सांगितले जाते की हीच त्यांच्या थांबण्याची जागा होती.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget