Halloween Costume ideas 2015

कुछ तो गड़बड़ है ज़ालीम तेरे किरदार में...!


काल सायंकाळी महाविद्यालयातून आले आणि नेहमीप्रमाणे बातम्या बघाव्या म्हणून टी.व्ही. सुरु केला. ठळक बातम्यांमध्ये दाखवले जाणारे दृश्य बघून भीतीपोटी आत खोलवर काहीतरी हाललं. ‘पाठीवर दप्तराची सॅक, हातात खुनशीपणे घेतलेले दगड, डोक्यात धर्मांध द्वेष घेऊन त्याच घातक कैफात बेधुंद, बेफाम, बेताल चेकाळलेले विशी-तेवीशीतील महाविद्यालयीन तरुण उन्मादी घोषणा देताना माध्यमात बघितले आणि क्षणार्धात काळजाचे ठोके धाड्धाड् वाजू लागले. ‘हिजाबी’ भारतीय कन्या वर्गात जाताना तिला डिवचत विरोध करणारा हा असा दहशतवादी दुषित तरुण वर्ग यापूर्वी बघण्यात आला नव्हता. काळजीपोटी जवळच खेळणाऱ्या माझ्या पाच वर्षाच्या लेकाकडे आवंढा गिळत बघत राहिले, घशाला कोरड पडली होती तरी शून्यपणे सुन्न होऊन बसून राहिले कितीतरी वेळ. आपण अनुभवलेला भारत ह्या लहानग्यांपर्यंत तसा कितीसा उरेल? मोठा भयंकर जीवघेणा प्रश्न आहे. होय, मी कर्नाटकात घडलेल्या ‘हिजाब’ प्रकरणावर बोलतेय! ‘तिरंगा’ उतरवून ‘दुहीचे’ निशाण देशाचा ध्वज कसा होऊ शकतो? तिरंग्याचा, देशाचा हा अपमान नाही का? हा देशद्रोह नाही का? कर्नाटकातील 'ते' एकूणच चित्र चिंताजनक, निंदनीय, प्रचंड अस्वस्थता, भय निर्माण करणारे आहे. यातून काहीच चांगले निर्माण होणार नाही, निर्माण होईल ती केवळ न भरून येणारी महाकाय हानी! एखादा नेता म्हणजे ‘धर्म’ नसतो आणि धर्मनिष्ठा म्हणजे ‘राष्ट्रनिष्ठा’ नसते तर ती असते फसवी  विघातक नशा.

सांप्रदायिक द्वेषाने मेंदू काबीज केलेली ही मुलं भारतीय महासत्तेकडे चालली आहेत असे वाटते का? की शालेय-महाविद्यालयीन वयातच ह्या पोरांना कट्टर राजसत्ता ‘अंधभक्त दंगलखोर’ बनवतेय? पालकांनो, जागे व्हा रे! घडण्याच्या वयात पोरं उध्वस्त होतील, निरागस मुलांचा 'बाहुले' म्हणून राजकीय वापर होतोय, पिढी बरबाद होतेय. हा असला भकास 'विकास' निश्चितच आपल्याला नकोय.  इतर देश कुठे चाललेत? आणि आपण? कित्येक शतकांची प्रतिकूल आव्हानात्मक वाट तुडवत, पारतंत्र्यात बघितलेली स्वातंत्र्याची स्वप्न सत्यात आणण्यासाठी कुणी देशभक्ताने निधड्या छातीवर गोळी झेलली तर कुणी हसत हसत फासावर गेले, कुणी आपले कुटुंब गमावले तर कुणी संसारावर तुळशीपत्र ठेवले. असा अवघा संघर्ष करत भारत स्वतंत्र झाला. संविधानावर आधारित प्रजासत्ताक झाला, इथल्या शेवटच्या माणसाला नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून भारतीय राज्यघटनेने सन्मानाचे ‘जिणे’ दिले. 

जगाच्या पाठीवर ‘विविधतेत एकता’ हे वैशिष्ट्य केवळ भारतासंदर्भातच आहे. जगातील सर्वश्रेष्ठ सर्वात मोठी अशी राज्यघटना’ केवळ भारताची आहे. संविधानाची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक...!’ अशा आत्मीय, अभिमानीय, अद्वितीय वाक्याने होते आणि येथील अभेद्य एकसंघता अधोरेखित होते. स्वतंत्र भारताची घडी संविधानाच्या पायावर आखीव-रेखीव, रचनात्मक आणि कल्याणकारी लोकशाही पद्धतीने बसविली गेली. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता ह्या भारतीय लोकशाही प्रजासत्ताक गणराज्याच्या अविभाज्य, नितांत सुंदर वैशिष्ट्यपूर्ण अशा बाबी आहेत पण अलीकडे खुर्ची-सत्ता यासाठी पराकोटीचे ‘आतुर-अधीर’ झालेले राजकीय नेते तरुणाई धर्माच्या अंगाने बौद्धिकदृष्ट्या ‘बधीर’ करू लागले आहेत. आल्या दिवसाला देश रसातळाला नेणारे अनपेक्षित काही घडू लागले आहे.

इतिहासात डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, पूर्ण आयुष्य सद्सदविवेकबुद्धीने वागणारे, नागरिकांच्या हितासाठी निस्वार्थी काम करणारे नेते ह्या भारतभूमीस लाभले आहेत. काळ बदलला, माणसे बदलली राजकारण बदलले पण पदाच्या मुलभूत तत्वांशी प्रामणिक राहणारे सर्वपक्षीय नेते दशकापूर्वीही ह्यात होते. आजचे चित्र मात्र अगदीच व्यस्त आहे. वर्तनात, आचारात, निवडणूक प्रचारात, माध्यमातील टीकाटिप्पणीत सभ्यता, शिष्टाचार, मर्यादा पाळणारे नेते आज नाहीत ही वैषम्यपूर्ण तेवढीच चिंतनीय बाब आहे. अलिकडे सत्ताधीश साऱ्याच मर्यादा ओलांडून इथल्या जनतेशी, त्यांच्या वर्तमानाशी, भविष्याशी अघोरी पद्धतीने जीवघेणे खेळ खेळू लागले आहेत. जनता वा नागरिक, त्यांचे हित हे प्राधान्यक्रम आता त्यांचे नाहीत तर सत्ता, खुर्ची, हुकुमशाही हीच त्यांची ध्येये बनली आहेत. नवमतदार तरुण हे त्यांचे प्रथम ‘सॉफ्ट टार्गेट’ आहे. त्यातही ज्यांचे मेंदू विचार करण्याच्या वाट्याला सहसा जात नाहीत, राजकीय, सामाजिक, आर्थिक साक्षर नसलेला भोळा-भाबडा वर्ग, जात-धर्म म्हणताच ज्यांचे बाहू स्फुरायला लागतात असे ‘भेजा कम’ पहिलवान, पुस्तकांशी गाठ न पडलेली डोकी, विनासायास जन्मतः साऱ्या सुविधा लाभलेले ऐतखाऊ, आज्या-पणज्याच्या कष्टाच्या संपत्तीवरील परपोषी बांडगुळं, उच्चशिक्षणाच्या भारंभार पदव्या नावासमोर लावणारे पण शिक्षण आणि वर्तन यात कुठेही ताळमेळ नसणारे जीव, वैचारिक पुस्तकाशी मस्तकाचा काडीमात्र सबंध नसणारे, तत्व, भूमिकाहीन होयबा असणारे , चिकित्सा न करता अंधानुकरण करणारे अंधश्रध्द, चमत्कारास नमस्कार करणारे आणि कुणी चमत्कारामागील कार्यकारण स्पष्ट करू लागताच त्याला ’धर्मद्रोही’ उपाधी देऊन मोकळे होणारे, दिवसाढवळ्या संविधान जाळले तरी मौन धारण करणारे पण नोटबंदीच्या काळात बँकेच्या रांगेत गैरसोयींबद्दल बोलणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ‘देशद्रोही’ ठरवणारे, गोमांस भक्षणाचा संशयापोटी धार्मिक असंवेदनशील झुंडशाहीने मानवी लचके तोडून हत्या करणारे एकीकडे आणि गंगेच्या पाण्यात तरंगणाऱ्या कोरोनाबाधितांच्या प्रेतांकडे सोयीने दुर्लक्ष करणारे, ह्यातभर खांद्यावर कट्टरतेचा झेंडा मिरवूनही कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्यसुविधांवाचून आप्त डोळ्यादेखत गमावणारे पण तरीही धार्मिक विखार सोडून प्राधान्यक्रम न ओळखणारे करंटे, ‘काम की बात’ ऐवजी ‘वांझ मन की बात’ ऐकून हरेभरे होणारे भाबडे जीव हे सारेच देशाच्या सांप्रत पडझडीस, मागास पिछेहाटीस जबाबदार आहेत. पुढील पिढ्यांच्या प्रगतीचे ते मारेकरी आहेत, स्वहिताची झापडं लावून देशास द्वेषाच्या ज्वालांमध्ये लोटणारे हे गुन्हेगार आहेत. हेच लोक ‘सुजलाम  सुफलाम’ भारतास ‘एकांगी एकरंगी’ बनवू पाहात आहेत. सत्ता टिकवण्यासाठी भावनिक राजकारण करून आभासी भय दाखवून चिथावणी देत आहेत. म्हणजे मला तर याबद्दल उघड वाटते की,

‘कुछ तो गडबड है जालीम तेरे किरदार में

वरना इतने हादसे ना होते किसी सरकार में!’

मुळात भारत हा बुद्ध आणि गाधींचा देश म्हणून जागतिक पटलावर ओळखला जातो, सोन्याची खाण, संतांची भूमी, क्रांतीची भूमी , संघर्षशील मती आणि माती, जिद्द आणि आव्हाने पेलणाऱ्या बुद्धिवंतांची भूमी म्हणून भारत जगास सुपरिचित आहे. अर्थात स्वातंत्र्यपूर्वकाळापासून व नंतरही काही काळ तसे नेतृत्व आणि नेते ह्या भारतभूमीस लाभले आहेत. आजवर या देशात अनेक पक्षाची सत्ता आली आणि गेली पण एवढे स्तरहीन, विवेकहीन अराजकाचे वातावरण कधी निर्माण झाले नव्हते. पक्ष आणि नेते राजकारणच करणार कारण तो त्यांचा व्यवसाय आहे पण त्यांच्या सर्व राजकीय घडामोडीत वापरला, भरडला जातो तो कार्यकर्ता म्हणून मिरवणारा सर्वसामान्य माणूस! तुम्ही बघा दंगली, मोर्चे, आंदोलनं, दहशत माजवणारी झुंडशाही याचा कट्टर कार्यकर्ता वाहक असतो इथला सर्वसामान्य माणूसच. नेत्यांची मुलं, आप्त यात नसतात कारण ते तर परदेशातील चांगल्या विद्यापीठात स्वतःचे भविष्य घडवत असतात वा व्यवसायात जम बसवून असतात म्हणूनच आपल्या पुढाऱ्याचा आपल्यावर वरदहस्त आहे वा आपण अमुक एका अण्णा, दादा, भाऊचे समर्थक-प्रचारक आहोत म्हणून उगाच गल्लीत छाती फुगवून फिरणारे ‘सतरंजीफेम’ कार्यकर्ते, भाई बघितले की त्यांची करुणा वाटू लागते. अनेक राजकीय पुढाऱ्यांना स्वमेंदूधारक, स्वयंभू कार्यकर्ते रुचत नसतात तर त्याना हवा असतो मेंदू भाड्याने देणारा आणि विनातक्रार, विनाशंका विचार उसना घेणारा, एकनिष्ठ हरकाम्या कार्यकर्ता बस्स! 

या साऱ्या चिंताजनक वातावरणात अभ्यासू, निर्भीड, विवेकवादी, संविधाननिष्ठ बोलणाऱ्या, लिहीणाऱ्या, कृतिशील भारतीयांची जबाबदारी अधिक वाढली आहे कारण आता देशातच भारतविरोधी आणि भारतीय असे दोन गट उघडपणे पडलेले दिसत आहेत. भारतविरोधी कारवाया भारतात भारतातील लोकांकडून हेतुतः घडवल्या जात असतील तर इथला ‘सच्चा भारतीय खतरे में है!’ हेच वास्तव आहे. हा वाईट काळही अस्तास जाईल हा आशावाद आहे कारण लेखाच्या शेवटाकडे येताना कर्नाटकातील त्याच महाविद्यालयातील चित्रफित नुकतीच माझ्या समोर आलीय; ज्यात महाविद्यालयातील सजग भारतीय विद्यार्थ्यांनी ‘तो’ झेंडा उतरवून तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकवला आहे आणि तिरंग्यास सलामी देत ते एकाग्रतेने राष्ट्रगीत गात आहेत. हा तिरंगा असाच चिरंतन फडकत राहो बस्स! 


-डॉ.प्रतिभा जाधव, नाशिक

pratibhajadhav279@gmail.com

(सौजन्य – आपलं सांज सह्याद्री टाइम्स)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget