Halloween Costume ideas 2015

22 व्या शतकातील बदलती शैक्षणिक परिस्थिती


भौतिक शिक्षणाचा पाया नैतिक शिक्षणावर ठेवला गेला तरच तो समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योग्य भूमीका अदा करू शकतो. अन्यथा अशा शिक्षणातून केवळ स्वार्थ साध्य करणारी व आपल्या स्वार्थासाठी समाजाची पिळवणूक करणारी उच्चशिक्षित पिलावळ जन्म घेतील. शिक्षणामुळे कौशल्य प्राप्त होते तर कौशल्यातून अर्थप्राप्ती होते. शिक्षणामुळे माणसामध्ये धैर्य आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण होते.


सबक पढ सदाकत का, अदालत का, शुजाअत का

लिया जाएगा तुझसे काम कौमों की इमामत का

पूर्वी दर 100 वर्षाला शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलत असे. पण अलिकडे काही दशकांपासून शिक्षणाच्या स्वरूपात वेगाने बदल होत आहेत. आता शिक्षणाचे स्वरूप आठ-दहा वर्षातच पूर्णपणे बदलत आहे. विशेष करून तांत्रिक शिक्षणाचे स्वरूप इतक्या वेगाने बदलत आहे की, त्या शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाबरोबर जे जुळवून घेवू शकणार नाहीत ते नक्कीच मागे पडतील. हा धोका टाळावयाचा असेल तर 22 व्या शतकातील शिक्षणाचे स्वरूप कसे बदलणार आहे याचा पूर्व अंदाज सातत्याने लावता आला पाहिजे. या ठिकााणी एक उदाहरण ‘पेजर’चे देता येईल. पेजर इतक्या वेगाने अदृश्य झाले की ते कधी मार्केटमध्ये आले होते याचा अनेकांना विश्वासच बसणार नाही. 

मोबाईल फोनच्या पहिल्या जनरेशनपासून पाचव्या जनरेशनपासूनचा प्रवास किती वेगाने झाला हा इतिहास आपल्या समोरचा आहे. मोबाईलच्या बदलत्या स्वरूपाशी सांगड न घालता आल्यामुळे नोकिया आणि इरिक्सनसारख्या कंपन्या मार्केटमध्ये टिकाव धरू शकल्या नाहीत. हे ही, आपल्या डोळ्यासमोरच घडलेल्या आहेत. उपभोक्तावादी संस्कृती जगाने स्वीकारलेली असल्यामुळे त्यातून अनेक वाईट गोष्टी जन्माला आलेल्या आहेत व येणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या वाईट गोष्टींपासून स्वतःला वाचवत त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचा आपल्या विकासासाठी जो समाज उपयोग करण्यात यशस्वी होईल तोच भविष्यात टिकेल, अन्यथा त्याचा नाश अटळ आहे. 

इस्लामची सुरूवातच मुळात शिका या शब्दाने झालेली आहे. कुरआनमध्ये जी पहिली आयत अवतरित झाली तिचा पहिला शब्दच इकरा अर्थात शिका असा आहे. ती आयत खालीलप्रमाणे - वाचा,(हे पैगंबर (स.) आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा, आणि तुमचा पालनकर्ता मोठा उदार आहे, ज्याने लेखणीद्वारे ज्ञान शिकविले, मानवाला ते ज्ञान दिले जे तो जाणत नव्हता.  (सुरे अल अलक: आयत नं. 1 ते 5)

वर नमूद आयातीमध्ये शिक्षण घेण्याचे जे आदेश दिलेले आहेत ते जागतिक आहेत. प्रलयाच्या दिवसापर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यामध्ये दिलेल्या आदेशाचे पालन केल्याशिवाय जागतिक स्पर्धेमध्ये टिकता येणार नाही हे स्पष्ट आहे. या आयात संबंधी कुठलाही संशय असण्याचे कारण नाही की ही आयत फक्त इस्लामचे शिक्षण घेण्याचाच आदेश देते की, भौतिक शिक्षणाची सुद्धा परवानगी देते. प्रेषित सल्ल. यांनी एकदा म्हटले होते की, शिक्षण प्राप्त करा, त्यासाठी तुम्हाला मग भले ही चीनला जावे लागो. यावरून हे सिद्ध होते की, इस्लाममध्ये धार्मिक शिक्षण आणि भौतिक शिक्षण दोन्ही  घेण्याबद्दल निर्देश दिलेले आहेत कारण ज्यावेळेस प्रेषित सल्ल. यांनी चीनला जाण्याचे उदाहरण दिले त्यावेळेस चीनमध्ये इस्लामी शिक्षणाचा गंधही नव्हता. हजरत अनस रजि. यांनी म्हटले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी फर्माविले, ’’प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य आहे.’’ (इब्ने माजा) 

हे शिक्षणामधील नैपुण्य आणि नितीमत्ताच आहे की, युक्रेनसारख्या साडेचार कोटी लोकसंख्या असलेल्या देशाने आपल्याकडे वैद्यकीय शिक्षणाचे असे उपयोगी जाळे विणले की, भारतासारख्या खंडप्राय देशातून हजारोंच्या संख्येतून विद्यार्थी लाखो कोटी खर्च करून त्या देशात शिक्षण घेण्यासाठी जातात. कल्पना करा एका विद्यार्थ्याने पाच वर्षात 30 लाख रूपये खर्च केला तर त्या देशाला शिक्षणाच्या माध्यमातून किती आर्थिक फायदा झाला. कारण जगभरातून लाखो विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षणासाठी येतात. आपल्या देशात जरी वैद्यकीय शिक्षण उपलब्ध असले तरी खाजगी शिक्षासंस्था चालकांनी ते लालसेपोटी इतके महाग करून टाकलेले आहे की ते सामान्यांच्या हाताबाहेर गेलेले आहे. म्हणून भौतिक शिक्षणाचा पाया नैतिक शिक्षणावर ठेवला गेला तरच तो समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये योग्य भूमीका अदा करू शकतो. नसता अशा शिक्षणातून केवळ स्वार्थ साध्य करणारी व आपल्या स्वार्थासाठी समाजाची पिळवणूक करणारी उच्चशिक्षित पिलावळ जन्म घेते. शिक्षणामुळे कौशल्य प्राप्त होते तर कौशल्यातून अर्थप्राप्ती होते. शिक्षणामुळे माणसामध्ये धैर्य आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण होते. 

आयीना झूठ बोलने नहीं देता

इल्म डरने नहीं देता

इस्लाम जाहिलों का मजहब नहीं अर्थात इस्लाम अज्ञानी लोकांचा धर्म नाही. इस्लाम आणि अज्ञान एका ठिकाणी जमाच होऊ शकत नाही. इस्लाम हा शब्द अज्ञानाचा विरूद्धवाचक शब्द आहे. असे म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही. कुरआनमध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करतांना दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ‘‘ हे प्रेषित (सल्ल.) यांना विचारा, जाणणारे आणि न जाणणारे दोघे कधी एकसमान होऊ शकतात काय? उपदेश तर बुद्धी असलेलेच ग्रहण करीत असतात.’’  (सुरे अलजुमर : आ.क्र.9)

या आयातीमध्ये दिलेल्या निर्देशात एक मुलभूत प्रश्न विचारलेला आहे की, ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात फरक असतो की नाही? स्पष्ट आहे फरक असतो. डॉ्नटर-डॉ्नटर असतो पेशंट-पेशंट असतो. दोघांच्यामध्ये वैद्यकीय ज्ञानाचाच फरक असतो. डॉ्नटरला ते ज्ञान असते रूग्णाला ते नसते. हेच उदाहरण प्रत्येक क्षेत्रात लागू होते. म्हणून कुठल्याही समाज गटाला प्रगती करावयाची असल्यास प्रचलित काळातील ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये त्या गटातील लोकांना ज्ञान मिळविता आले पाहिजे. जे लोक काळानुरूप आपले ज्ञान अपडेट करत राहतील ते स्पर्धेत टिकतील आणि जे करणार नाहीत ते मागे पडतील. ही बाब नैसर्गिक आहे. म्हणून कुरआन आणि प्रेषित यांच्या निर्देशाप्रमाणे मुस्लिम समाजाने सुद्धा आधुनिक ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

जमाअते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी परळीमध्ये जमाअते इस्लामीच्या एका मेळाव्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व विशद करताना म्हटले आहे की, ’’ ’गोद’ (आईची कुशी) से लेकर ’गोर’ (कब्र) तक इन्सान को इल्म हासिल करते रहेना चाहिए.’’ म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सातत्याने शिकले पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी समाजाची दोन गटात विभागणी केली आहे. 

एक - असे लोक ज्यांना समज नाही. उदा. शेतकऱ्यांना आयटीची समज नाही तर आयटी क्षेत्रातील लोकांना कृषीची समज नाही. 

दोन - ज्ञान नसल्याची समज असलेले लोक. उदा. शेतकऱ्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, आपल्याला आयटीचे काही ज्ञान नाही. तर आय.टी. क्षेत्रातील लोकांना याची जाण आहे की आपल्याला कृषी क्षेत्रातील लोकांबद्दल काही ज्ञान नाही. 

माणसाला जर या गोष्टीची जाणीव असेल की अमूक शाखेतील ज्ञान आपल्या प्रगतीसाठी आवश्यक आहे तर तो किमान ते ज्ञान मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न तरी करेल. स्वतःला जमलं नाही तरी तो स्वतःच्या मुलांना त्या शाखेतील ज्ञान आपल्या मुलांना देण्याची धडपड करेल. पण एखाद्या समाजाला याचीच जाणीव नसेल की आपल्या प्रगतीसाठी कोणत्या शाखेचे ज्ञान मिळविण्याची गरज आहे तर तो समाज कधीच प्रगती करू शकणार नाही. म्हणून आपल्याला काय माहित नाही याचेही ज्ञान असणे आजच्या काळात गरजेचे होऊन गेलेले आहे. 

सय्यद सआदतुल्ल्लाह हुसैनी यांनी पुढे असेही म्हटलेले आहे की, पाच कारणामुळे माणसाला ज्ञान मिळविण्यामध्ये अडथळे येतात. 

पहिले कारण 1- आपल्यापैकी अनेक जणांचा असा समज असतो की, ज्ञान मिळविण्याचे एक विशिष्ट वय असते. बाल आणि तारूण्यामध्येच ज्ञान प्राप्त केले जाऊ शकते. एकदा का ही वयोमर्यादा ओलांडली की मग ज्ञान प्राप्त करणे शक्य होत नाही. 

2- न्यूरोप्लास्टिसिटी संबंधीचे अज्ञान. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपल्या मेंदूच्या रचनेमध्ये एक विशिष्ट प्रकारची व्यवस्था केलेली आहे, जी शिकण्यामध्ये माणसाला साह्य करते. जर कोणी सतत शिकण्यामध्ये व्यस्त राहतात त्यांचा मेंदू त्यांना शिकण्यामध्ये मदद करत राहतो. मग त्यांचे वय कितीही असो. अगदी नव्वद वर्ष वयामध्ये सुद्धा ज्याची न्यूरोप्लास्टिसिटी लवचिक असेल तो माणूस नवीन नवीन ज्ञान प्राप्त करू शकतो. परंतु, ज्ञान मिळविण्याचे काम तरूण वयामध्येही जे सोडून देतील त्यांची न्युरोप्लास्टिसिटी इतकी ताठर होऊन जाते की, ते शिकण्याच्या वयामध्ये सुद्धा शिकू शकत नाहीत. 

3- समाजामध्ये एक व्यापक गैरसमज असाही आहे की, फक्त आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडूनच ज्ञान प्राप्त करता येते. हा विचार सुद्धा चुकीचा आहे. आज तुम्हाला सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये ज्ञान मिळवायचे असेल तर तुमच्यापेक्षा कितीतरी कमी वयाच्या तरूणांकडून तुम्हाला ते शिकावे लागेल. हे सत्य नाकारता येण्यसारखे नाही. 

4- समाजामध्ये एक असाही गैरसमज आहे की, अनेक लोक असे समजतात की ते अत्यंत व्यस्त आहेत की त्यामुळे नवीन गोष्टी शिकू शकत नाहीत. हा पण चुकीचा समज आहे. माणूस कितीही व्यस्त असला तरी महत्त्वाच्या गोष्टींसाठी तो वेळ काढतोच. ज्ञानाचे महत्त्व लक्षात आले तर माणसं नक्कीच वेळ काढून ते शिकू शकतात. 

5- मुस्लिम समाजामध्ये असाही एक व्यापक गैरसमज आहे की, कुरआन आणि हदीस मध्ये तर सर्व ज्ञान आहे. मग इतर ज्ञान प्राप्त करण्याची काय गरज? वस्तुतः कुरआनचा विषय मनुष्य आहे. मानवी जीवनासंबंधी प्रामुख्याने कुरआनमध्ये सविस्तर निर्देश देण्यात आलेले आहेत. बाकीच्या ज्ञान क्षेत्रांकडे फक्त इशारे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुरआनमधून विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकता येणे शक्य नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील पुस्तके वाचावी लागतील. त्या शाखांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास करावा लागेल. पदवी मिळवावी लागेल. त्या क्षेत्रातील अनुभव जमा करावा लागेल. तेव्हा कुठे त्या क्षेत्रामध्ये कुठे तज्ञ होवू शकता. 

6- असाही एक गैरसमज समाजात पसरलेला आहे की, इंटरनेटर, सोशल मीडियावर सर्व माहिती उपलब्ध आहे. मग पुस्तकी ज्ञान प्राप्त करण्याची काय गरज? ही धारणाही अतिशय चुकीची आहे. इंटरनेटवर बरीच माहिती अशी असते की, ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. म्हणून सनदशीर मार्गाने एखाद्या विशिष्ट शाखेचे ज्ञान मिळविल्याशिवाय त्या विषयाचे खरे ज्ञान आपल्याला आहे, असा दावा कोणीही करू शकत नाही. 

महिलांचे शिक्षण 

महिलांचे शिक्षण कसे असावे याबाबतीत अनेकांचा गोंधळ उडतो. मौलाना मौदुदी यांनी याबाबत म्हटले आहे की, ’’ जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं.’’ 

(संदर्भ : परदा, पान क्र.197).

भारतीय परिपेक्षात पाहता इतर समाज गटांपेक्षा मुस्लिम समाज गट हा शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात मागे पडलेला आहे. याची जाणीव आता सर्वांनाच झालेली आहे. समाधानाची बाब ही की, या जाणीवेचा विस्तार एवढा झालेला आहे की, आता गरीब लोक सुद्धा प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यात हिरहिरीने पुढे येत आहेत. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ ऐ अल्लाह! आम्हाला आणि आमच्या देशबांधवांना असे ज्ञान प्राप्त करण्याची समज आणि संधी प्रदान कर जे ज्ञान प्राप्त करून आम्ही आमच्या देशाला जगामध्ये सर्वोच्चस्थानी नेण्यामध्ये यशस्वी होऊ.’’ (आमीन)

- एम. आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget