एका घरात लग्नानंतर सून येत सुरुवातीचे दिवस सासू-सूनेचे खूप चांगले जातात. पण काही काळाने काही लोकांना बघवत नाहीत. कुणी सासूचे तर कुणी सुनेचे कान भरायला सुरुवात करतात. एवढ्या गोडीगुलाबीने राहिलेल्या सासू सूनेत भांडण व्हायला सुरुवात होते. दुरावा इतका वाढतोे की त्या एकमेकांचे तोंडही बघायला तयार नसतात असे का घडते ? कानकच्चेपणा, ईश्वराने दिलेल्या बुद्धीचा वापर कधी करायचा ? कधी शोधायचा तो शत्रू जो भांडण लावत आहे? आज आपल्या देशाचीही हीच व्यथा झालेली आहे. हिजाब विषयी काहीच प्रश्न नसलेल्या आपल्या भारतात हिजाबचा प्रश्न अचानक आला कोठून? एका लोकशाहीप्रधान देशामध्ये संविधानाच्या पलीकडे जाऊन मनात येतील ते कायदे कसे तयार केले जात आहेत? मुस्लिम देशोत जो मान सम्मान, भारतीय स्त्रियांना मिळतो तो भारतात का मिळू नये?
आपण जेव्हा घराचे बांधकाम करतो तेव्हा सर्वप्रथम पाया तयार करतो. तयार झाल्यानंतर त्याला झाकून ठेवले जाते. का? त्याला कूलूप लावले जाते का? नाही. मग भींती बांधल्या जातात तेव्हाही ते घर उघडेच असते. मग छत, फरशी, इंटेरिअर वगैर करून शेवटी घराला दारे लावण्यात येतात. तरी पण कुलूपाची गरज तोपर्यंत भासत नाही जोपर्यंत माणसे त्या घरात राहायला येत नाही. मनुष्याचं जीवन खूप महत्वाचे असतं, अनमोल असतं त्याची सुरक्षा केली गेलीच पाहीजे. तसेच एक मुलगी जेव्हा तारुण्यात पदार्पण करते तेव्हापासून तिच्यावर परदा करणे, स्वतःला झाकून ठेवणे अनिवार्य असते. कारण आता तिच्याकडे अनमोल वस्तू असतात, अमानत असते जी की अधिकृत व्यक्तीपर्यंत सुरक्षित पोहोचायला हवी. परदा विनाकारण आकर्षणाचा निषेध करतो. परद्यामुळे नैतिक आचरण सोपे होते. एक माणूस सारखे रोखून एखाद्या मुलीला पाहत असेल तर तिला किती व कसे अस्वस्थ वाटते हे तिलाच माहीत. ती अस्वस्थता पुरुष समजू शकत नाही. म्हणूनच कुरआनमध्ये स्त्रीच्या परद्याच्या आदेशा अगोदर पुरूषाने नज़र खाली ठेवावी, असा आदेश आलेला आहे. जे पुरुष महिलांचा आदर करतात ते कदापी हिजाब बंदीला पाठींबा देणार नाहीत. हिजाब हा फक्त डोक्याच्या केसांना झाकते तर बुरखा (अबाया) हे पूर्ण शरीराला झाकतो. तर नकाब फक्त चेहऱ्याला. अबाया (बुरखा) घातल्यामुळे अस्वस्थतेचा प्रश्नच येत नाही उलट आत्मविश्वास वाढतो. स्त्रीचा चेहरा तिचे केस, तिचा पूर्ण देह हे पुरुषासाठी आकर्षण निर्माण करणारे असते. म्हणून झाकून ठेवले जाते की ते पतीव्यतीरिक्त कुणासाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू बनू नये. पांढरा रंग जसं सूर्यकिरणांना परावर्तीत करतो. तसेच बुरखा सुद्धा वाईट नजरेला परावर्तीत करतो. आदीकाळात माणसाकडे कपडे नसायचे. झाडांच्या पानाने तो स्वत: ला झाकायचा. जसजशी माणसाची समज उन्नत होत गेली तसतसे लोकांनी अधिक कपडे घातले. कपडे हे सभ्यतेचे चिन्ह बनले. कमी कपड्यांना वाव मिळाला तो पाश्चिमात्य देशातील स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पनेमुळे तिथे स्त्रीला कमी कपड्यात एक कामवस्तू बनवून बाजारात आणले गेले आणि पुरुषांचा पूर्ण सभ्य पोषाख कायम ठेवला. बहुतेक देशांनी त्यांची नक्कल केली. स्त्रीचे अंगभर पोशाख लोकांच्या नजरेला टोचू लागले. स्त्रीने स्वतःला झाकून ठेवल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. युनेस्कोच्या रिपोर्टनुसार भारतात मुलींचे शिक्षणाचे प्रमाण 62.8% आहे आणि मुस्लिम मुलींचे फक्त 52% आहे. उच्चशिक्षामध्ये तर 13% मुस्लिम मुली आहेत जे की 2007-2008 साली फक्त 6% होते. ’शिक्षण’ किंवा हिजाब दोन्ही मधून एकच निवडा असे एका लोकशाही देशामध्ये कोण कसे बोलू शकतो आणि हा कायदा कसा लागू करण्यात येतो की हिजाब काढूनच शाळेत प्रवेश करा? आणि शिक्षकांनाही का हे बंधन? पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र मुस्लिम स्त्रियांना का दिले जात नाही? पूर्वीच्या काळात नालंदा, तक्षशीला विद्यापीठांमध्ये गणवेश सक्ती होती का? रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतन मध्ये युनिफॉर्म सक्ती होती का? गणवेशाची संकल्पना आली कोठून? गणवेशाला माझा विरोध नाही. पण गणवेशाचा इतिहास आपल्याला माहित पाहिजे. झाले असे की अमिरेकेत विद्यार्थी कसेही पोशाख परिधान करून यायचे. मग त्यांना सभ्य पोशाख घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी गणवेशाची प्रथा उदयास आली आणि युनिफार्म हे शरीर सभ्यपणे झाकण्यासाठी बनविले गेले. कोणाला अॅलर्जी असेल तर तो मास्क घालू शकतो. ठंडी लागत असेल तर गरम टोपी घालण्याची परवानगी देण्यात येते. तर मग नराधमांच्या वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी हिजाब, नकाब व अबायाची परवानगी का नाही? भारतात वेगवेगळे धर्माचे लोक राहतात त्यांना पूर्ण स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे तो कायम रहावा. आजही स्वित्झरलँडमधील शैक्षणिक संस्थांमध्ये कुठलाही गणवेश नाही. एवढा प्रगत देश असूनसुद्धा गणवेश सक्ती नाही. शाळेत गणवेश घालायला वेस्टर्न स्टुडंटस तयार नाहीत, त्यांना गणवेश परिधान करण्यात संकोच वाटतो. एवढेच नव्हे तर आधी मुला-मुलींचे वेगवेगळे गणवेश असायचे. गणवेश म्हणजे मुलामुलींचा सारखाच. जिन्स पॅन्ट आणि शर्ट लिंगभेद मिटविण्यासाठी. यांची मागणी होते आणि केरळ मध्ये ती मागणी पूर्णही होते. एक प्रश्न निर्माण होतो की लिंगभेद मिटविण्यासाठी स्त्रीयांनी पुरुषासारखा पेहरावा का घालावा ? पुरुषांनी सुद्धा स्त्रीयांसारखा पेहराव केल्यास लिंगभेद समाप्त होऊ शकतो ना? पण असे करणे पुरूषांना हास्यास्पद वाटेल. लिंगभेद मिटविण्याचा प्रयत्न करणे धोकादायक आहे. ईश्वराने ज्यांना वेगळे निर्माण केले त्यांना वेगळेच ठेवलेले बरे. त्यांची शरीररचना वेगळी आहे व कार्यक्षेत्रही वेगळे आहे हे आपल्याला मान्यच करावे लागेल. एक गोष्ट मात्र 100% खरी आहे की प्राचीन शाळेत युनिफार्म नसला तरी त्यांच्या विचारशैलीत एकसारखेपणा होता. देशासाठी लढणे, फक्त देशाच्या उन्नतीचा विचार करणे हे तेव्हा शक्य होते. आता गणवेशासारख्या विचारावर विनाकारण वाद निर्माण करून आपसांत भांडणं लावून देशहित नव्हे तर देशाला नुकसान पोहोचविण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे.
विविधतेत अखंडता ही आपल्या देशाची ओळख असून माझी वाचकांना अनुरोध आहे की त्यांनी देशाची ही ओळख नेहमी कायम ठेवावी.
काय करू? करू मी काय?
काय करू? काय मी करू ?
मला जगण्याचा अधिकार नाय
आईच्या पोटात मारली जाते
कधी कचरा कुंडीत टाकली जाते
शिव्या मला नेहमी दिल्या जातात
मुलापेक्षा तुच्छ समजले जाते
काय करू? काय मी करू ?
कमी कपडे घातले की बलात्कार
फुल कपडे घालण्याची मुभा नाय
शिक्षण आणि हिजाबपैकी एक निवडायचयं
किती अवघड हा प्रश्न हाय?
काय करू? काय मी करू ?
हुंडयासाठी जाळली जाते,
’सासरी नेहमी छळली जाते
माझे तर हालच हाल होत हाय
मला हे सगळे सहन होत नाय
काय करू? काय मी करू ?
वर्षातून एकच दिवशी (8 मार्चला)
जगाला जाग येते
सगळ्यांना माझी सहानभूती येते
माझ्याविषयी लिहिले बोलले जाते
पण माझ्या समस्यांचा समाधान काय
काय करू? काय मी करू ?
अल्लाहने दिलेले अधिकार मला दया,
मुहम्मद (सल्लम) नी दिल्यासारखा आधार मला दया
जपा माझी प्रतिष्ठा माझे हक्क
माझा आदर करा
एवढीच माझी विनंती हाय...
- डॉ. सीमीन शहापूरे
8788327935
Post a Comment