The Kashmir Files सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी यामधून मांडण्यात आली आहे. पण सिनेमाच्या पार्श्वभूमीवर एक विशिष्ट अजेंडा रेटण्याचा प्रयत्न देखील सुरू झाला आहे. काश्मिरी पंडितांचे हत्याकांड झाले तेव्हा केंद्रात कुणाचे सरकार होते, काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडून जाण्याचा सल्ला कुणी दिला, काश्मिरी पंडितांचे विस्थापन होण्यास खरे जबाबदार कोण आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि वास्तव मांडणारा लेख....
काश्मिरी पंडितांचे विस्थापन! काश्मीरच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक कालखंड!
आधीच गुंतागुंतीचा असलेला काश्मीर प्रश्न ह्या काळ्या अध्यायाने आणखीनच बिकट बनला. जानेवारी 1990 मधील भयानक थंडीने थिजवून टाकणार्या त्या दहशतीच्या काळोख्या रात्री कश्मीरी पंडित कुटुंबं खचितच विसरतील. घरं-दारं, व्यवसाय- धंदे सारं सोडून मुला-बाळांसह एका अंधकारमय अनिश्चित भविष्याकडे सारी कुटुंबं लोटली गेली होती.
काश्मिरी पंडितांवरचा हा अन्याय भाजप आणि आरएसएस आजवर एखाद्या राजकीय ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरत आले आहेत. मागील सरकारांच्या तथाकथित कमकुवतपणाकडे बोट दाखवण्यासाठी आणि समस्त भारतातील हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी हेच ब्रह्मास्त्र वापरलं जातं. आज काश्मिरी जनतेचा आवाज पायदळी तुडवण्याच्या कृतीच्या समर्थानासाठी सुद्धा याच ब्रह्मास्त्राचा वापर केला जात आहे.
म्हणूनच कश्मीरच्या इतिहासातील ही घटना तपासून पहावी लागेल. अशोक कुमार पांडेय यांनी "कश्मीरी पंडीत – बसने और बिखरने के 1500 साल" या पुस्तकामध्ये काश्मीरी पंडितांच्या दुर्दशेचा हा काळ अतिशय चिकित्सकपणे मांडला आहे. अनेक तथ्य त्यांनी निःपक्षपातीपणे समोर ठेवली आहेत.
काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा हा काळ जानेवारी 1990 चा होता. 1990 मध्ये, पाकिस्तान-पुरस्कृत अतिरेकी अचानक इतके मजबूत झाले की काश्मीर मधील दहशतवाद आणि हिंसाचाराचे हे सत्र कुणाच्याही आटोक्याबाहेरचे बनले होते. उघडपणे पंडितांना काश्मीर सोडण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. 1947 नंतर काश्मीर काही प्रमाणात अस्वस्थ-अस्थिर जरूर होते, पण मुस्लिम वा हिंदू काश्मीरी जनतेलाच धोका निर्माण व्हावा इतके हे दहशतवादी गट याआधी कधीच प्रबळ नव्हते.
दहशतवादी अचानक इतके प्रभावी होण्याची कारणे काय होती? त्यावेळी केंद्रात कोणाचे सरकार होते? काँग्रेसचे? नाही!! अजिबात नाही! पंडितांच्या पलायनाची ही भीषण शोकांतिका घडत असताना केंद्रात व्ही. पी. सिंग पंतप्रधान पदी विराजमान झाले होते आणि तेही भाजपच्या पाठिंब्यामुळे. केंद्र सरकारवर त्यावेळी भाजपचे संपूर्ण नियंत्रण होते. त्यामुळे देशात अतिरेक्यांना अशी खुली सूट देण्याचे श्रेय भाजप आणि त्यांच्या मित्रांनाच जाते. अनुभवशून्य व्ही.पी. सिंग सरकार काश्मीरबाबत स्वतंत्रपणे कोणताही पुढाकार घेण्याच्या स्थितीत नव्हते. काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांना देशाचे गृहमंत्री म्हणून नेमण्यात आले.
8 डिसेंबर रोजी, मुफ्तींनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, त्यांची मुलगी डॉ. रुबिया सईद हिचे काश्मीरमधून अपहरण करण्यात आले. रुबियाच्या सुटकेऐवजी आधी 3 आणि नंतर 5 दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला कोणत्याही परिस्थितीत ह्या सुटकेस अनुकूल नव्हते. मात्र त्यांच्यावर दबाव आणून केंद्र सरकारने हमीद शेख, शेर खान, नूर मोहम्मद, मोहम्मद अल्ताफ आणि जावेद अहमद या 5 दहशतवाद्यांची सुटका केली. सरकार दबाव आणून नमवता येते हे या घटनेने सिद्ध केले. यातून दहशतवाद्यांचे मनोबल वाढणे स्वाभाविक होते. यानंतर अपहरण आणि त्याबदल्यात सुटकेच्या असंख्या घटना घडल्या. आणि हे सर्व भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले केंद्र सरकारच करीत होते.
‘काश्मीर: द बाजपेयी इयर्स’, या पुस्तकात आय. बी आणि रॉ ह्या संस्थांचे माजी प्रमुख ए.एस. दुलत लिहितात, "1990 च्या हिवाळ्यात श्रीनगर हे एका भयंकर झपाटलेल्या शहरासारखे होते. युद्धाच्या तांडवाची ही सुरुवात होती. रुबिया सईदच्या अपहरणाने बंडाचे सारे बांध उघडले. हत्या जणू रोजचीच गोष्ट झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील सर्वात सुरक्षित भागातही बॉम्बस्फोट आणि गोळीबार होऊ लागले. कॅन्टोन्मेंट परिसराजवळ ट्रकमध्ये बंदुका फिरवणारे तरुण दिसू लागले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात दहशतवाद्यांकडून लष्करी परेड काढण्यात येऊ लागली होती." (पान 60)
'काश्मीरवर लक्ष केंद्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणणे' हे केंद्र सरकारचे यावेळचे राजकीय प्राधान्य असायला हवे होते. पण आरएसएस आणि भाजप दुसऱ्याच खेळीत गुंतले होते. होय, अडवाणींच्या नेतृत्वाखाली देशभर रथयात्रा काढून हिंदूंना भडकवण्यात आर.एस.एस. भाजप मग्न होते. भाजपला देशहिताची काळजी असती तर या यात्रेऐवजी पंडितांच्या रक्षणाचा प्रयत्न केला असता. पण काश्मीरमध्ये दहशतवाद जितका वाढेल, तितका देशभर मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवण्यास सोपं जाईल, हे त्यांनी ओळखलं होतं. त्यामुळे आरएसएस विचारांच्या जगमोहनना राज्यपाल पदी नियुक्त करण्यासाठी मुफ्तींवर दबाव आणला गेला.
पुढे काश्मीर मधील निवडून आलेले सरकार हटवले गेले आणि राष्ट्रपती राजवट आणली गेली. आता आर एस एस च्या जगमोहन कडे काश्मिरची सारी सूत्रं होती. या गेम प्लॅनची पुढची पायरी होती परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनवणे. जगमोहन यांनी येताच अशी विधाने सुरू केली, ज्यामुळे काश्मीरमधील सामान्य जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा गेला.
जगमोहन त्यांच्या एका भाषणात म्हणाले, "काश्मीरमधील प्रत्येक मुस्लिम दहशतवादी आहे... जोपर्यंत सर्व दहशतवादी मारले जात नाहीत, तोपर्यंत येथे शांतता प्रस्थापित होणार नाही." (संदर्भ: Kashmir in Conflict: India, Pakistan and the Unending War – Victoria Scofield , IB Tauris & Company London, 2003)
त्यामुळे लोकांवर थेट गोळीबार आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूची एक मालिकाच सुरू झाली. काश्मिरी लोकांच्या संताप आणि असंतोषात अचानक वाढ झाली आणि अधिकाधिक लोक भारत-विरोधी मिरवणुकींमध्ये सामील होऊ लागले.
1990 मध्ये काश्मीरला गेलेले न्यायमूर्ती तारकुंडे, न्यायमूर्ती सच्चर आणि तज्ज्ञांच्या चमूने लिहिले आहे की, "जानेवारी 1990 मध्ये जगमोहनच्या आगमनानंतर, भयंकर दडपशाहीच्या कारवायांमुळे खोऱ्यातील संपूर्ण मुस्लिम लोकसंख्या भारतापासून दूर झाली आणि त्यांचे तुटले-पण आता कडवट रागात बदलले." (संदर्भ: Kashmir in Conflict: India, Pakistan and the Unending War – Victoria Scofield , IB Tauris & Company London, 2003)
जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव असलेले अशोक जेटली म्हणतात: 'जगमोहनने पाच महिन्यांत ते केले, जे दहशतवादी पाच वर्षांत करू शकले नाहीत' (संदर्भ: एडवर्ड डेसमंडचा लेख द इंसर्जेंसी इन काश्मीर (1989-91), कंटेपररी साउथ एशिया (1995))
वास्तविक काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या त्या काळात सातत्याने घडत होत्या. अशा परिस्थितीत एकीकडे दहशतवाद- विरोधी नागरिक आणि दहशतवादाचे बळी पडलेल्या काश्मिरींना सोबत घेऊन प्रशासन बळकट करणे गरजेचे होते. दुसरीकडे बळाचा योग्य वापर करून दहशतवाद्यांचा मुकाबला करायला हवा होता. परंतू याऐवजी राजकीय हत्यांना, जातीय रूप देऊन समोर आणण्याचे काम जगमोहन प्रशासनाने केले. या गेम प्लॅनची पुढची पायरी होती, काश्मिरी पंडितांना खोर्यातून हाकलून लावणे.
काश्मीरचे अभ्यासक आणि नेते बलराज पुरी सांगतात की त्या काळात लोकांच्या नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लिम संयुक्त समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचा उद्देश काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवणे हा होता. यामध्ये काश्मीरचे माजी सरन्यायाधीश मुफ्ती बहाउद्दीन फारुकी, एच.एन. जट्टू आणि गुलाम नबी हाग्रू हे होते. अनेक मुस्लिम नेते, राजकीय नेते आणि काही कट्टरवादी संघटनांनीसुद्धा काश्मिरी पंडितांना स्थलांतर न करण्याचे आवाहन केले होते. पण जगमोहन यांनी संयुक्त समितीच्या अशा प्रयत्नांना काडीचेही महत्त्व दिले नाही. उलट हिंदू राष्ट्र उभारणीची कथा पंडितांना सांगून त्यांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले. (संदर्भ: पृष्ठ 70-71, संदर्भ: पेज 70-71, कश्मीर : इंसरजेंसी अॅन्ड आफ़्टर, बलराज पुरी, ओरियेंट लॉन्गमन, दिल्ली, 2008)
काश्मिरी पंडितांचे नेते संजय टिक्कू सांगतात की त्या वेळी काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाने जगमोहन यांची भेट घेतली आणि सुरक्षेसाठी अक्षरशः विनवण्या केल्या. परंतु जगमोहन यांनी सुरक्षा देण्याऐवजी ताबडतोब जम्मूला निघून जाण्याचा आग्रह केला. (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri Pandits an incendiary venomous narrative)
तवलीन सिंग म्हणतात की "हे खरे आहे की जगमोहन काश्मीरमध्ये आल्याच्या काही दिवसांतच काश्मिरी पंडितांनी गटा-गटांमध्ये खोरं सोडलं आणि या स्थलांतरासाठी प्रशासनाने संसाधने देखील पुरविल्याचा पुरेसा पुरावा आहे" (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri Pandits an incendiary venomous narrative)
18 सप्टेंबर 1990 रोजी 'अफसाना' या स्थानिक उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या पत्रात काश्मिरी पंडित के. एल. कौल यांनी लिहिले की, 'पंडितांना सांगण्यात आले की सरकारला काश्मीरमधील एक लाख मुस्लिमांना मारायचे आहे जेणेकरून दहशतवाद पूर्णतः संपुष्टात येईल. जम्मूमध्ये गेल्यावर पंडितांना मोफत रेशन, घरे, नोकऱ्या इत्यादी देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. हत्याकांड संपल्यानंतर त्यांना परत आणले जाईल असे त्यांना सांगण्यात आले.' (संदर्भ: Greater Kashmir News – Kashmiri pandits an incendiary venomous narrative)
या साऱ्या घटना एक भयानक कट आणि अतिशय गलिच्छ राजकारण समोर आणतात. आरएसएसने आपले स्वयंसेवक जगमोहन यांना काश्मिरी पंडितांच्या संरक्षणासाठी नव्हे तर काश्मीरमधून पंडितांना हाकलण्यासाठी पाठवले होते असेच यातून समोर येत नाही का? पंडित मुक्त काश्मीर करण्याच्या या सेवेबद्दल आरएसएस आणि भाजपने जगमोहन यांना अर्थात इनामही दिलेले दिसते. पुढे वाजपेयी सरकारमध्ये त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले. हेही लक्षात ठेवायला हवे की काश्मिरी पंडितांच्या दुर्दशेबद्दल सतत ओरड करणाऱ्या आरएसएस आणि भाजपने वाजपेयीजींच्या ५ वर्षात आणि मोदीजींच्या ७ वर्षात काश्मीरमधील एकाही पंडित कुटुंबाला काश्मीरमध्ये पुनर्स्थापित केलेलं नाही. अर्थात ते करतीलही का म्हणून? आरएसएस / भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाच्या अजेंड्यासाठी पंडितांनी सतत वनवासात राहणेच अनिवार्य नाही का
(लेखकाच्या फेसबुक वॉलवरून)
- आशुतोष शिर्के
Post a Comment