माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्याने खऱ्या अर्थी ईमानचे समाधान प्राप्त केले.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)
अल्लाहच्या दासत्वात स्वत:ला झोकून देऊन आणि इस्लामी शरियत (धर्मशास्त्र) ची उपासना करून आणि स्वत:ला पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मार्गदर्शनासाठी वाहून घेऊन पूर्णत: संतुष्ट आहे, त्याचा निर्णय असा आहे की मला दुसऱ्या कोणाचे दासत्व करायचे नाही आणि प्रत्येक स्थिती इस्लामनुसार आचरण करणे आणि पैगंबरांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन व्यतीत करायचे नाही. ज्या मनुष्याची स्थिती अशी असेल त्याने समजा ईमानचा गोडवा त्याने प्राप्त केला.
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''उत्तम उपदेशवचन अल्लाहचा ग्रंथ आणि उत्तम चरित्र मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आहे (ज्याचे आज्ञापालन करावयास हवे).'' (हदीस : मुस्लिम)
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मला सांगितले, ''हे माझ्या लाडक्या मुला! शक्य असल्यास तू अशाच प्रकारचे जीवन व्यतीत कर की तुझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नसावेत.'' पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''आणि हीच माझी पद्धत आहे (की माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाहीत) आणि ज्याने माझ्या पद्धतीवर प्रेम केले, निश्चितच त्याने माझ्यावर प्रेम केले आणि ज्याने माझ्यावर प्रेम केले तो नंदनवनात (स्वर्गात) माझ्याबरोबर असेल.'' (हदीस : मुस्लिम)
अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, तीन माणसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपासनेच्या बाबतीत माहिती घेण्याकरिता पैगंबरांच्या पत्नींकडे आले, जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांना पैगंबरांच्या उपासनेचे प्रमाण कमी वाटले. त्यांनी आपल्या मनात विचार केला की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी आमची तुलना कशी शक्य आहे? त्यांच्या हातून न पूर्वी अपराध घडला आहे न येथून पुढे घडेल (आणि आम्ही लहान थोडेच आहोत, मग आम्ही अधिकाधिक उपासना करावयास हवी). मग त्यांच्यापैकी एकाने निश्चय केला की तो नेहमी संपूर्ण रात्र 'नफ्ल नमाज' (अनिवार्य नसलेली प्रार्थना) अदा करील आणि दुसरा म्हणाला, ''मी नेहमी 'नफ्ल रोजे' (अनिवार्य नसलेले उपवास) ठेवीन, दिवसा कधीच जेवणार नाही'' आणि तिसरा म्हणाला, ''मी महिलांपासून अलिप्त राहीन, कधीही लग्न करणार नाही.'' (जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांना ही गोष्ट समजली तेव्हा) पैगंबर (स.) त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले, ''तुम्ही तीच माणसे आहात काय ज्यांनी अमुक अमुक म्हटले!'' मग पैगंबर (स.) पुढे म्हणाले, ''खरोखरच मी तुमच्यापेक्षा अधिक अल्लाहचे भय बाळगणारा आणि त्याची अवज्ञा न करणारा आहे. परंतु पाहा, मी (नफ्ली) रोजे कधी ठेवतो, कधी ठेवत नाही. त्याचप्रमाणे (रात्री) 'नवाफिल' (अनिवार्य नसलेली नमाज) अदा करतो आणि झोपही घेतो. तसेच पाहा, मला पत्नीदेखील आहेत (तेव्हा तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने उपासना करणेच लाभप्रद आहे) आणि ज्याच्या दृष्टीने माझी पद्धत महत्त्वाची नसेल, जो माझ्या पद्धतीकडे दुर्लक्ष करेल, त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही.'' (हदीस : मुस्लिम)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
Post a Comment