जागतिक मराठी भाषा दिन नुकताच 27 फेब्रुवारी रोजी राजरा झाला. कुसुमाग्रज अर्थात ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून 1 मे दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. सन 1966 पासून तो अंमलात आला. 1 मे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले.
असं म्हणतात मराठी भाषेचा उगम हा उत्तरेकडे झाला. मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा होती. या भाषेला साधारणतः 1500 वर्षांचा इतिहास असल्याचंही सांगण्यात आलं आहे. या भाषेचा विस्तार नंतर सातपुडा पर्वतांच्या रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील भागापर्यंत आणि मग दमणपासून ते अगदी दक्षिण टोक गोव्यापर्यंत झाला. वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश अशा अनेक टप्प्यांमधून मराठीचा विकास होत मराठी भाषेची उत्क्रांती होत गेली. मराठी भाषेतील पहिलं वाक्य हे श्रवणबेळगोळ मधील शिलालेखावर सापडलं असा उल्लेख आहे. कवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर हे खरंतर मराठीचे आद्यकवी मानले जातात. तर शके 1110 मध्ये मुकुंदराजांनी लिहिलेला ‘विवेकसिंधु’ हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ असल्याचं म्हटलं जातं.
काळ आणि स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यामधूनच मुख्य मराठी, मालवणी मराठी, व-हाडी, कोल्हापुरी, अहिराणी असे अनेक मराठीचे पोटप्रकारदेखील आले. तर पेशव्यांच्या काळामध्ये मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसून आले. तर पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी भाषेच्या सत्तेमध्ये मराठी भाषेची रचना ब-याच अंशी बदलली. इंग्रजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीमध्ये अनेक कादंबरी, निबंध, लघुकथा असे नवे साहित्यप्रकार उदयाला आले. त्यामुळेच अनेक लेखक मराठीमध्ये नावाजले जाऊ लागले.
जी भाषा 'अमृतातेही पैजा जिंके' अशी होती. तिच्या शाळा आज बंद पडत आहेत. पदवी-पदव्युत्तरकडे मराठी विषय निवडणा-या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस उतरत्या क्रमाकडे चालली आहे. ही नक्कीच चिंतनीय बाब म्हणावी लागेल. जागतिकीकरणात मराठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील मराठी विभागाची स्थिती कशी असेल? हा प्रश्न ओघाने पुढे येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही समुळ मराठीजनांची मागणी असली तरी सध्या ती धुसर पडत आहे. मराठी भाषा शाश्वत राहणे हे केवळ मराठी भाषा शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहाकरीता अनिवार्य नाही, तर मराठीला ज्ञानभाषा बनविण्याकरीता कोश, सुची तसेच अनुवाद, संपादन, भाषा साहित्यविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान, प्रसारमाध्यम, मनोरंजनमाध्यम आदी क्षेत्रासाठी आवश्यक आहे. अंतिमत: मराठी जगली तरच साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, मराठी वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाहिनी टिकेल व त्याला वाचक, प्रेक्षक, श्रोते मिळतील. अन्यथा जागतिकीकरणाच्या वादळात मराठी भाषेची काळाच्या ओघात परवड होत आहे हे मात्र निश्चित!
विश्व संमेलनातूनही मराठी भाषेवर अनेकविध विषयांवर सखोल चिंतन होते. काही ठरावही घेतल्या जातात, पण त्यातून भाषा विकासाचे कार्य पुढे कितपत घडते? याकडे आपण गांभीर्याने बघत नाही. भाषा दिन आपण उत्साहात साजरा करतो, पण विशिष्ट वर्ग सोडला तर आपली भाषा सशक्त होईल याकडे वर्षभर डोकावूनही पाहत नाही. मराठीला ज्ञानभाषेचे वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर मराठी भाषीकांनी वैश्विकता स्वीकारावी. पण आपली स्थानिक ओळख विसरू नये. त्यांनी आपआपले ज्ञानविषय, संज्ञा-संकल्पना ही संपत्ती मराठीत आणावी. मराठी शिकावी लागेल अशी शासकीय धोरण आखावीत आणि मराठी शिकावीशी वाटेल अशी व्यवस्था निर्माण करावी. मराठी माणूस व्यवसाय आणि नोकरीनिमित्य जगभर पोहचला आहे. पण मराठी भाषा मात्र पोहचली नाही. विस्तारला तर फक्त त्याचा व्यवसाय आणि त्याचे पद. त्यातील काही भारतीय अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आदी देशातून आपला पेशा सांभाळत आपल्या राज्यातील प्रकाशकांसाठी स्वतंत्र लेखन वा अनुवादकीय कार्य करत असतात. यातून इतर भाषेतील नवनवीन विषयांचे ज्ञान मराठी वाचकाला मिळते. पण याद्वारे मराठीला किती बळ मिळते? याचा कुणीही विचार करतात का? मराठीतील दर्जेदार साहित्यकृती तिकडे नेण्याचा प्रयत्न मात्र ते करीत नाही. महाराष्ट्र व्यतिरिक्त देशात काही केंद्रीय विद्यापीठात मराठी विभाग अस्तित्वात आहे. या विद्यापीठांनी मराठी भाषा जगभर पोहचवण्यात प्रयत्नशील व्हायला हवं. इतर देशात मातृभाषेला व्यवहार भाषा, अविष्कार भाषा, ज्ञानभाषा म्हणून स्थान आहे. पण आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. मानवी समाजात भाषा प्रमाण व बोली या प्रकारांत बोलली जाते. बोली भाषेतून जो सर्वत्र परिचयाचा होतो, तेव्हा तो प्रमाणभाषेत येतो. साहित्यरुपाने मराठी बोली व प्रमाण भाषेने समृद्ध आहे. मराठी भाषेला मोठे करण्यात संत, पंत आणि तंत यांचे योगदान खूप मोठे आहे. तसेच महाराष्ट्रातील साहित्यकांचा जसा मोलाचा वाटा आहे, तसाच सर्वसामान्यांचाही आहे. जागतिकीकरणात मराठी भाषा ताठ मानेने कायम उभी राहील, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
भाषा शिक्षणासाठी शाळा गरजेची आहे. खरंतर आता मराठी शाळांमध्ये मुलांना कोणतेही पालक अॅडमिशन घेत नाही. पण असं असलं तरीही आपल्या मुलांना निदान मराठी भाषेची योग्य ओळख करून देणं हे पाल्याचं काम आहे आणि अशा त-हेनेच मराठी भाषा टिकेल. खरं तर मराठी भाषा संवर्धनाची गळती थांबवणं हे आपल्या हाताताच आहे. मराठी शाळेत शिकलेले विद्यार्थी मराठी टिकवतील ही कल्पनाही साफ चुकीची आहे. वास्तविक सर्वच मराठी माणसांनी आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी जितकं जास्तीत जास्त जमेल तितकं मराठीमध्ये बोलायला हवं. मुळात आपल्या भाषेची लाज बाळगता कामा नये. प्रत्येक शाळेत जसं दर्जेदार इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तसंच मराठीदेखील तितकंच दर्जेदार शिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शिवाय आपल्या मुलांना इंग्रजीप्रमाणेच मराठी साहित्याची ओळख करून देत साहित्य घरामध्ये उपलब्ध करून द्यायला हवं. नुसतं नाक मुरडण्यापेक्षा आपणच त्यासाठी पावलं उचलायला हवीत.
साहित्यासाठी मराठी लायब्ररी उपलब्ध आहे. मराठी साहित्य खूपच प्रसिद्ध आहे. अगदी बालकथांपासून सर्व कथा मराठी साहित्यामध्ये लिहिल्या जातात. त्यामुळे आपल्या पाल्याला मराठी साहित्याची आवड लावायची गरज आहे. इंग्रजी पुस्तकं आणि मराठी पुस्तकं दोन्ही आपल्या पाल्याने वाचावीत यासाठी मुळात पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पै फ्रेंड्स लायब्ररी असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाबद्दल सर्वांनाच माहीत आहे. पण आता पै फ्रेंड्स लायब्ररीदेखील नावाजली जात आहे. अशा लायब्ररी असताना तुम्हाला कुठेही आपल्या मुलांना मराठी शिकवताना कमतरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे.
जागतिक मराठी दिन हा केवळ एक दिवस साजरा करू नका तर कायमस्वरूपी आपल्या भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जपण्याचा प्रयत्न केल्यास, या दिनाचं महत्त्व नक्कीच फळाला येईल. प्रत्येक मराठी भाषिक व्यक्तीने इंग्रजी शिकतानाच तितकाच मराठी भाषेचा अभ्यास करावा. अगदीच अभ्यास करणं जमत नसलं तरीही निदान आपली भाषा शुद्ध आणि व्यवस्थित बोलता येईल याची तरी काळजी घ्यावी. आपल्या येणा-या पिढीला मराठीचं योग्य प्रशिक्षण देऊन नेहमी मराठीमध्येच बोलण्यास प्रवृत्त केल्यास, आपली भाषा आपण योग्य त-हेने जपू शकतो, याचं भान नक्कीच ठेवायला हवं.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।
- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ,
भ्रमणध्वनी-7057185479
Post a Comment