Halloween Costume ideas 2015

माणसाला निष्ठूर बनण्यापासून कसे रोखता येईल?


कोविड-19 च्या तीन आवर्तनानंतर आंतर्मुख होण्याची तिहेरी संधी मिळूनही जो समाज आंतर्मुख होणार नाही आणि आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर पुनर्विचार करणार नाही तर तो समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. 

ईश्वर मानवाजातीकडून फक्त एवढीच अपेक्षा करतो की, त्याने मानवाला जन्माला घालताना शरीर आणि आत्मा ज्या शुद्ध रूपात प्रदान केला होता, मानवाने आपले जीवन व्यतीत केल्यानंतर मृत्यूपरांत तेवढ्याच शुद्ध स्वरूपात तो ईश्वराला परत करावा. 


वो जिनके होते हैं खुर्शिद आसतीनों में

उन्हें कहींसे बुलाओ बडा अंधेरा है

साधारणपणे माणसे आपल्या अंदाजाप्रमाणे जगत असतात. त्यांना जे चांगले वाटते ते करत असतात. मग प्रत्यक्षात ते वाईट का असेना. मानवाच्या वागणुकीवर तीन गोष्टींचा प्रभाव पडत असतो. एक त्यांच्या इच्छा-आकांक्षा, दोन त्यांचे संस्कार आणि तीन त्यांच्या आजूबाजूचे वातावरण. मात्र या तिन्ही गोष्टी माणसाच्या वर्तनाला योग्य दिशा देऊ शकत नाहीत. उदाहरणादाखल आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मेक्रॉन यांचे वागणे पाहूया. फ्रान्स हा एक प्रगतीशील देश असून, जग त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहत असते. त्याच देशाचे आजच्या राष्ट्रपतींचा शाळेत असतांना 15 वर्षाच्या वयात आपल्या 39 वर्षीय वर्गशिक्षिकेवर जीव जडतो. तीन मुलांची आई असलेली त्यांची वर्गशिक्षिका ब्रिगिट टोग्नेस ही पण आपल्या मुलाच्या वयापेक्षा कमी असलेल्या मॅक्रॉनला प्रतिसाद देते. त्यांचे संबंध सुरू होतात. पुढे जाऊन ते लग्न करतात. या ठिकाणी विद्यार्थी व वर्गशिक्षिकेच्या पवित्र नात्यावर लैंगिक इच्छा वरचढ ठरल्याचे पाहूनही फ्रान्सीसी समाजाला त्यात चुकीचे काही वाटत नाही. ब्रिगिटच्या तीन मुलांची व तिच्या पतीच्या मनस्थितीवर या दोघांच्या विषम नात्यामुळे किती वाईट परिणाम झाला असेल याची वाचकांनी स्वतःच कल्पना करावी. ही एक प्रसिद्ध व रेकॉर्डवरील घटना असल्यामुळे दाखला म्हणून हे उदाहरण दिले आहे. नसता अनैतिक व गुन्हेगारी वर्तणुकीच्या अनेक घटना आज पश्चिमेसह आपल्या देशात रोज घडत असून त्यामुळे समाजाचे नैतिक विघटन होऊन समाज नासत चाललेला आहे. सरकारमान्य प्रचंड व्यसनाधिनता, राजकारणाचा घसरता दर्जा, हिंसा, अश्लिलता, पॉर्नचा विळखा, शुटआऊट, आर्थिक घोटाळे, वाढती नग्नता, लैंगिक अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ ही या नैतिक विघटित वर्तणुकीचा खुला पुरावा आहे. कोविड 19 च्या तीन आवर्तनानंतर आंतर्मुख होण्याची तिहेरी संधी मिळूनही जो समाज आंतर्मुख होणार नाही आणि आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर पुनर्विचार करणार नाही तर तो समाज नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आद, समूद, नूह (अलै.) यांच्या काळातील मजबूत असलेले समाज केवळ आपल्या अनैतिक वर्तनामुळे नष्ट झाल्याचे अनेक दाखले कुरआन मजीदच्या अनेक पानांवर विखुरलेले आहेत. यापासून स्वतः मुस्लिमांनी धडा घेतला नाही व देशबांधवांना वेळीच सावध केले नाही तर मुस्लिमांसह भारतीय समाजाचा विनाश अटळ आहे. हा विषय जेवढा महत्त्वाचा तेवढाच दुर्लक्षित 

असल्याकारणाने या संबंधी वाचकांना सावध करावे, या हेतून हा लेखन प्रपंच.

भावनाप्रधान होऊन रडल्यामुळे मन हलकं होतं आणि आत्मा शुद्ध होतो. कधीकाळी मेलेल्या माणसांचे प्रेत पाहून रडणारा आपला समाज आज सोशल मीडियावर झुंडीद्वारे जीवंत माणसाला मारत असतांना व तो मरत असतांना निर्विकारपणे पाहत आहे. सोशल मीडियावर रक्तबंबाळदृश्य पाहूनही मन हेलावत नाही. शेतकऱ्यांची दैना त्यांच्या लाखोने झालेल्या व होत असलेल्या आत्महत्या, व्याजामुळे होत असलेल्या सहकुटुंब आत्महत्या, दारूमुळे होत असलेल्या अनेक संसारांची राख रांगोळी हे पाहूनसुद्धा आपले मन हेलावत नाही. कॅपॅचिनोचा आस्वाद घेत चर्चा करण्यापलिकडे यावर कोणी काही करत नाही. आज अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यास कोणी पुढे येत नाही. उलट त्याचा व्हिडीओ शूट करून अपलोड करण्यामध्ये लोकांना धन्यता वाटते. ही सगळी निष्ठूरपणाची उदाहरणे आहेत. हा निष्ठूरपणा दिवसेंदिवस वाढत आहे. याला कसे कमी करावे, यावर चर्चा करूया. 

ईश्वराने माणसाला दोन गोष्टींपासून बनवलेले आहे. एक गोष्ट जमीनीतून घेतलेली आहे (माती) व दूसरी गोष्ट आकाशातून घेतलेली आहे (आत्मा). शरीर आणि आत्म्याच्या मिलनातून माणूस साकार होत असतो. या दोन्ही गोष्टींमधील संतुलन हेच खऱ्या माणसाची ओळख आहे. शरीर ज्याप्रमाणे सुदृढ असते आत्माही सुदृढ असतो. शरीर ज्या प्रमाणे आजारी पडते त्याचप्रमाणे आत्माही आजारी पडतो. शरीर सदृढ ठेवण्यासाठी आपण पौष्टिक अन्न ग्रहण करतो. आत्मा सुदृढ ठेवण्यासाठी इस्लाममध्ये दिलेल्या इबादती अनिवार्य आहेत. त्याशिवाय आत्मा सुदृढ होऊच शकत नाही. ईश्वर मानवाजातीकडून फक्त एवढीच अपेक्षा करतो की, त्याने मानवाला जन्माला घालताना शरीर आणि आत्मा ज्या शुद्ध रूपात प्रदान केला होता, मानवाने आपले जीवन व्यतीत केल्यानंतर मृत्यूपरांत तेवढ्याच शुद्ध स्वरूपात तो ईश्वराला परत करावा. 

परंतु आपण पाहतो की वाईट सवयी अंगीकारून आपण आपल्या शरीराला रोगट बनवतो आणि अनैतिक / गुन्हेगारी वर्तन करून आत्म्याला अशुद्ध करून टाकतो. याचा वाईट परिणाम वाईट वर्तन करणाऱ्यावरच होत नाही तर त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांवरही होतो. पर्यायाने संपूर्ण समाजाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. कुरआनशी प्रत्यक्ष संपर्क तुटल्यामुळे मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोकही तसेच वागत असतात जसे इतर लोक वागतात. म्हणून मुस्लिम समाज इतरांना योग्य दिशा देण्याची आपली जबाबदारी पूर्ण पार पाडतांना दिसून येत नाही. कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’ आणि हे पैगंबर (स.), जर तुम्ही त्या लोकांतील बहुतेकांच्या सांगण्यानुसार वागू लागला जे भूतलावर वास्तव्य करून आहेत, तर ते तुम्हाला अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करतील, ते तर फक्त कल्पनेच्या आधारे चालतात व तर्क लढवितात.’’  (सुरे अल् अनआम: आ.क्र.116)

शरीर मातीपासून बनले असल्यामुळे त्याचा आहार मातीमधून मिळतो आणि आत्मा आकाशातून आलेला असल्यामुळे त्याचा आहारही आकाशातूनच म्हणजे ’वही’ (कुरआनच्या  आयातींचे अवतरण) मधून मिळतो. म्हणून कुरआनमध्ये मानवाला आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी जी आचारसंहिता ठरवून दिलेली आहे तिचे पालन करणे अनिवार्य आहे. या संदर्भात एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी असे म्हटले की, ’’ताकतवर मोमीन अल्लाह के नजदीक ज्यादा बेहतर और महेबूब है. बनिस्बत कमजोर मोमीन के. और अच्छाई सब में है.’’ (मुस्लिम). 

या हदीस संदर्भात मौलाना मोहियुद्दीन गाजी लिहितात, ’’ यहां ताकतवर मोमीन से मुराद वो शख्स है जिसका जिस्म ताकतवर हो और उस ताकतवर जिस्म पर ईमानवाली रूह की हुकूमत हो. जबके कमजोर मोमीन से मुराद वो शख्स है जिसका जिस्म कमजोर हो और उस कमजोर जिस्म पर ईमानवाली रूह की हुकूमत हो. जाहीर है के अच्छाई दोनों में है. क्यूं के दोनों पर मोमीन रूह की हु्नमरानी है. लेकिन ताकतवर मोमीन में ज्यादा अच्छाई है. जिसकी वजह वो अल्लाह को ज्यादा महेबूब होता है.’’ (संदर्भ : जिंदगी नौ, पान क्र.27 फेब्रुवारी 2022).

आत्म्याला दोन प्रकारे सुदृढ बनविता येते. एक आहाराच्या (इबादती) माध्यमातून व दुसरे आत्मिक व्यायाम (रियाजती)च्या माध्यमातून. इस्लाममध्ये या दोन्ही गोष्टीचे संतुलन उपलब्ध आहे. ईश्वराचे नामस्मरण आत्म्याचा आहार आहे तर नाममस्मरणाची सवय (रियाजत) आहे. नमाजमध्ये आहार सुद्धा आहे आणि रियाजतसुद्धा आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फर्माविले की, ’’जो अल्लाहचे नाममस्मरण करतो आणि जो करत नाही त्यांची अवस्था जीवंत आणि मृत व्यक्तीसारखी आहे.’’ (सही बुखारी). ईमाम इब्ने कय्यीम रहे. यांनी फरमाविले आहे की, ’’आत्म्यासाठी नामस्मरण तेवढेच आवश्यक आहे जेवढे माशासाठी पाणी.’’

एकदा प्रेषित सल्ल. यांनी फरमाविले की, ’’नामस्मरणाचे उदाहरण असे आहे जणू एका व्यक्तीमागे त्याचा शत्रू लागलेला आहे आणि अचानक त्या व्यक्तीला एक सुरक्षित किल्ला दिसतो आणि तो त्यात प्रवेश करून दार लावून घेतो. याच प्रमाणे सैतान नावाच्या शत्रूपासून अल्लाहचे नामस्मरण माणसाला सुरक्षित किल्ल्यासारखा भक्कम आधार देते. (तिर्मिजी). परंतु याचा अर्थ असा नाही की सर्व काम धंदा सोडून मुस्लिमांनी केवळ अल्लाहचे नामस्मरण करत बसावे. उलट या संबंधी प्रेषितांचे मार्गदर्शन असे आहे की, ’’माणसांनी आपले दैनंदिन व्यवहार करत अल्लाहचे नामस्मरण करावे.’’ उदा. कोणी व्यापार करत असेल तर व्यापार करतांनासुद्धा त्यांनी मनामध्ये नामस्मरण करत रहावे. जेणेकरून आत्म्याला त्याच्या आहाराचा सतत पुरवठा होत राहील. 

रमजानचे रोजांच्या माध्यमातूनही माणसाच्या आत्म्यावर अतिशय चांगला परिणाम होत असतो. त्यावेळेस अन्न  त्याग केल्यामुळे शरीर कमकुवत बनते आणि नामस्मरण केल्यामुळे आत्मा सुदृढ बनतो आणि एक महिना सातत्याने आत्म्याचे वर्चस्व शरिरावर राहते. याचे दूरगामी परिणाम होतात आणि माणूस उर्वरित 11 महिने सुद्धा शुद्ध आत्म्याने जगत असतो. ज्यामुळे त्याची आत्मा सुदृढ राहते. त्यामुळे त्याच्यातील निष्ठुरता कमी होते आणि दयाभाव वाढतो. ही परिस्थिती उपभोगतावादाच्या नेमकी उलट आहे. यामुळे उपभोक्तावादामुळे माणसामध्ये निर्माण होत असलेलाा स्वार्थ आणि त्यातून येत असलेला निष्ठूरपणा या दोन्हीवर यशस्वीरित्या मात करता येते. 

आत्म्याला सुदृढ करण्याचा दूसरा उपाय कुरआनने खालीलप्रमाणे सांगितलेला आहे, ’’जर तुम्ही आपले दान जाहिररीत्या द्याल तर हे देखील चांगले आहे परंतु जर गुप्तरीत्या गरजूंना द्याल तर हे तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे. तुमचे बरेचसे दोष या वर्तनाने नाहीसे होतात आणि जे काही तुम्ही करता अल्लाहला सर्व परिस्थितीत त्याचे ज्ञान आहे.’’  (सुरे बकरा : आयत क्र. 271).

दान, धर्म केल्यामुळे माणसाच्या आत्म्याला बळ मिळत असते. हे कोणीही नाकारू शकत नाही. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’शैतान तुम्हाला दारिद्र्याचे भय दाखवितो व लज्जास्पद कार्यपद्धतीचे अवलंब करण्यास प्रोत्साहन देतो, परंतु अल्लाह तुम्हाला आपली क्षमा आणि कृपेची आशा देतो. अल्लाह फार उदार व विवेकशील आहे.’’ (सुरे बकरा : आयत क्र. 268).

केवळ दारिद्रयाच्या भयामुळे दान-धर्माची सवय तुटल्यामुळे आज भारतामध्ये गरीबांच्या हाल अपेष्टा कैकपटीने वाढलेल्या आहेत. चंगळवादामुळे निर्माण होत असलेल्या स्वार्थीपणावर यामुळेच मात करता येत नाहीये. वास्तविक पाहता गोर-गरीबांवर खर्च केल्याने माणसाला कधीच कमी पडत नाही.  उलट मानसिक समाधानातून आरोग्य लाभते. हा विश्वास कुरआनच्या या आयातीमधून श्रद्धावान मुस्लिमांना मिळत असतो. हेच कारण आहे की, आजच्या या वाया जात असलेल्या कालखंडातही जमेल तेवढे दान-धर्म करण्याकडे मुस्लिमांचा कल असतो. कुरआनमध्ये आणखीन एका ठिकाणी म्हटलेले आहे की, ’’हे श्रद्धावंतांनो! जर तुम्ही ईशपरायणता अंगिकाराल तर अल्लाह तुमच्यासाठी कसोटी उपलब्ध करून देईल. व तुमच्यातील वाईटपणा तुम्हापासून दूर करील आणि तुमचे अपराध माफ करील. अल्लाह अत्यंत कृपा करणारा आहे.’’  (सुरे अल्अनफाल : 29). या आयातमध्ये ईशपारायणतेमुळे माणसात चांगल्या आणि वाईटांमधील फरक कळण्याची पात्रता निर्माण होत असल्याची शुभवार्ता देण्यात आलेली आहे. जर ही पात्रता माणसामध्ये निर्माण झाली तर त्या पात्रतेचा वापर करून तो आपला आत्मा शुद्ध ठेऊ शकतो. जेणेकरून निष्ठुरता त्याच्यात येणार नाही आणि त्याऐवजी दयाभाव निर्माण होईल. जो की रंजल्या गांजल्याच्या मदतीचे कारण बनेल. जगाला राहण्यालायक बनविण्यासाठी न्याय आणि दयाभावाशिवाय दूसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज पडत नाही. ’’जर लोकांचे दुःख पाहून तुम्ही दुःखी होत नसाल आणि लोकांचे दुःख निवारण करण्याची भावना तुमच्या मनात उत्पन्न होत नाही तर तुम्ही मुस्लिम तर सोडा माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत’’ असे प्रसिद्ध इस्लामी विद्वान डॉ. असरार अहमद रहे. यांनी म्हटलेले आहे. 

शेवटी असे न केल्यास काय होईल? याची सुद्धा धमकी ईश्वराने खालील शब्दात दिलेली आहे, ’’ मग जेव्हा हे अश्रद्ध अग्नीपुढे आणून उभे केले जातील तेव्हा यांना सांगितले जाईल, तुम्ही आपल्या वाट्याची सगळी ऐश्वर्ये जगातील आपल्या जीवनातच संपवून टाकली आहेत आणि त्यांचा आनंद उपभोगिला, आणि तो गर्व तुम्ही पृथ्वीतलावर कोणत्याही अधिकाराविना करीत राहिला आणि ज्या अवज्ञा तुम्ही केल्या त्यापायी आज तुम्हाला अपमानास्पद यातना दिली जाईल.  (सुरे अलअह्काफ:20)

थोडक्यात जगातील दुःख समूळ नष्ट करायचे असल्यास आपल्या आत्म्याला शुद्ध ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. आणि हे करण्यासाठी या लेखात वर नमूद केेलेल्या उपायांचा अवलंब करणे आपल्या स्वतःच्याच नाहीतर समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’हे अल्लाह आम्हाला तुझ्याकडून प्रदान करण्यात आलेल्या शरीर आणि आत्म्याचा शुद्ध वापर करून मृत्यूनंतर तसेच निरागस शरीर आणि आत्मा तुला परत करण्याची समज आणि शक्ती प्रदान कर.’’ (आमीन)


- एम.आय.शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget