उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुका भाजपच जिंकणार होते हे सर्वांना माहीत होते, तर दुसरीकडे सर्वांचीच ही इच्छा होती की भाजपने त्या जिंकू नयेत. पण इच्छा आणि वास्तव वेगवेगळे असतात. वास्तवांचे इच्छांशी काही देणे घेणे नसते, तर इच्छांवर कोणाचे नियंत्रण नसते. भाजपला या निवडणुका जिंकायच्याच होत्या. येनकेन प्रकारे त्या त्याने जिंकल्या, पण त्याची कारणे, त्याचे विश्लेषण अनेकजण निवडणूक तज्ज्ञ, पत्रकार आणि सामान्यातला सामान्य माणूस करण्यात व्यस्त आहे.
ज्या देशाच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला दोन वेळच्या जेवणाची तजवीज करण्यात अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागते, त्या लोकांना जर मोफत अन्नधान्य दिले गेले तर त्यांच्या निम्म्या समस्या आपोआप सुटतात. दुसरी निकडीची गरज त्यांना राहण्यास चार-सहा पत्रांचा का असेना निवारा मिळत असेल आणि त्याचबरोबर शौच्यालयाची व्यवस्था देखील मिळाली तर आणखीन काय हवंय. याऐवजी जर देशाची संपत्ती अडाणी-अंबानी की इतर कोणते उद्योगपती असोत, त्यांना मिळाली तर त्याचा कोणता परिणाम या लोकांवर होणार आहे? पाच किलो अन्नधान्य आणि इतर काही साहित्याच्या बदल्यात ते खुशाल देशाच्या संपत्ती विक्रीकडे का लक्ष देतील? ती जर मोठ्या उद्योगपतींना मिळाली नाही आणि सामान्य जनतेच्या हितासाठी ठेवली गेली तर त्याचा लाभ कुणाला होईल? ज्याच्याकडे संपत्ती असते तेच लोक देशाच्या संपत्तीचा लाभ घेऊ शकतात. अशात जी काही संपदा देशाच्या मालकीची आहे तिचा सातबारा या उद्योगपतींच्या नावे केला गेला तर त्या अन्नधान्यावर जगणाऱ्यांना काय फरक पडणार? भाजपने एक गुलामवर्ग मोफत शौच्यालय आणि मोफत अन्नधान्यावर जगणारा निर्माण केलेला आहे. हा गुलामवर्ग जोपर्यंत भाजपला मते देत राहील तोपर्यंत भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. इतर पक्षांना अशी संधी मोफत अन्नधान्य वाटप करण्याची मिळणार नाही. त्यासाठी सत्ता हवी आणि सत्तेसाठी मते हवीत. गुलाम मतदारांच्या मतांवर भाजप काबिज आहे.
भाजपने असा एक गुलामवर्ग सत्ताप्राप्तीसाठी निर्माण केला आहे. त्याच्या जोडीला धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी नवीन मतदार पिढीचा दुसरा वर्ग. या दोन्हींच्या बळावर तो अबाधित सत्ता संपादन करत राहणार.
किती बेरोजगार, किती गरीब, किती लाचार, किती अशिक्षित, कोणती लोकशाही, कोणते संविधान, कसलं गणतंत्र हे सारे प्रश्न काही थोडेफार शिकल्या सवरल्या मध्यामवर्गाचे. यांच्याशी मोफत अन्नधान्यप्राप्त गुलामांचा काडीमात्र संबंध नाही. चर्चासत्रे, विश्लेषण, अध्ययन ज्यांना आवडतील त्यांनी खुशाल करत राहावे. भाजपला याचा काहीही धोका नाही. श्रीमंत, सत्ताधारी आणि धर्म सत्तेवर काबिज असलेल्यांच्या सेवेसाठी गुलामांचा वर्ग निर्माण झाला. देशाचे स्वातंत्र्य जपायचे की नाही याची या गुलामांना काळजी कशाची? त्यांच्या पोटापाण्याची तजवीज झाली हेच पुरे. संघाला अभिप्रेत हेच हिंदू राष्ट्र!
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment