Halloween Costume ideas 2015

मस्जिदमध्ये आल्यानंतर मनाला खूप शांती मिळाली

प्राचार्य बी.व्ही. गमे :  राष्ट्रीय, सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी जमाअते इस्लामी हिंदकडून येवला येथे  मस्जिद परिचय कार्यक्रम


येवला (शकील शेख) 

मस्जिदमध्ये आल्यानंतर मनाला खूप शांती मिळाली. मनात असलेले गैरसमज दूर झाले. मस्जिद हे अतिशय पवित्र व मनाला शांती देणारे स्थान आहे हे आज अनुभवले असे मनोगत जनता महाविद्यालयाचे प्राचार्य बी व्ही गमे यांनी येथे व्यक्त केले.

येवला शहरातील चांद शहा मस्जिद येथे जमाअते इस्लामी हिंदच्या वतीने ’मस्जिद परिचय’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अर्जुन कोकाटे होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जमात-ए-इस्लामी हिंद चे मराठी भाषा प्रवक्ते मोहम्मद शमी, प्राचार्य भाऊसाहेब गमे, प्राचार्य विभांडिक सर, लक्ष्मण भाऊ दराडे, जमात-ए-इस्लामी हिंद नाशिक जिल्हाध्यक्ष फैरोज आजमी, फारुक शेठ चामडेवाले, प्राचार्य दिनकर दाणे, राष्ट्र सेवा दलाचे येवला तालुका अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र बारें यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात कुरआनची आयत वाचून करण्यात आली. 

यावेळी मान्यवरांना मस्जिदीचा परिचय करून देण्यात आला. नमाज कशी, केव्हा व का पठण करायला पाहिजे हे सविस्तर सांगण्यात आले. अजान व त्याचा मराठी भाषेत अनुवाद सांगितला. अजान दिल्यानंतर मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी येताना काय करायला हवे हे समजावण्यात आले. यात वजू कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी नमाजे मगरिब स्व अनुभवातून बघितले व त्यांच्या मनात उपस्थित झालेले प्रश्न सादर केले. त्याचे निरसन मोहम्मद शमी यांनी केले व आपल्या पुढील वक्तृत्वात इस्लाम कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा देत नाही, इस्लाममध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पवित्र कुरआनच्या आदेशानुसार आहेत व प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या मार्गदर्शनावर आधारित आहेत. अतिशय सुंदर मांडणी करून इस्लाम आणि मस्जिद याचे महत्त्व उपस्थितांना जळगाव जिल्हा जमात-ए-इस्लामी चे मोहम्मद शमी यांनी समजावून सांगितले.

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य दिनकरराव गाणे यांनी खरा शांती चा धर्म इस्लाम आणि प्रेषितांचे विचार म्हणजेच मानवाने मानवाप्रमाणे जगणे हे आहे. आज संपूर्ण देशात धर्माच्या नावाखाली खूप मोठे राजकारण होत आहे अशा परिस्थितीत माझ्या सर्व बांधवांनी एकदा तरी मस्जिद परिचय कार्यक्रमाला उपस्थित राहून खरा इस्लाम काय आहे, हे समजून घ्यायला हवे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी असे कार्यक्रम वेळोवेळी घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आम्हाला व युवकांना तसेच सर्व धर्मातील जातीतील अभ्यासक लोकांना आमंत्रित करत रहावे. आज मला खूप आनंद झाला, मी मस्जिदबद्दल ज्या काही वाईट गोष्टी ऐकल्या होत्या त्या पूर्णतः खोट्या असून सर्वात पवित्र ठिकाण मस्जिद आहे, असे मनोगत व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राचार्य अर्जुन कोकाटे यांची राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अर्जुन कोकाटे यांनी जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका करून खरा देश घडवायचा असेल तर वेळोवेळी   - (उर्वरित पान 7 वर)

सर्व धर्मांना समजून घेणे गरजेचे आहे आणि ज्या धर्मामध्ये आपल्या उत्पन्नातील अडीच टक्के जकात म्हणून गोरगरिबांना सहकार्य म्हणून देण्याचे सक्तीचे आदेश आहेत, असा धर्म कोणताही नाही. इस्लाम धर्मात ज्या मूळ गोष्टी आहेत त्या खूप सुंदर व मनाला शांती देणाऱ्या आहेत.आज देशात अतिशय गलिच्छ असे वातावरण मुसलमान आणि मस्जिद यांच्या बाबतीत पसरवण्यात येत आहे. परंतु, मी साक्ष देतो आज या चाँद शाह मस्जिद येते मी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार बघितला नसून शांती व सद्भावनेचा मार्ग दाखवणारे एकमेव स्थान म्हणून मस्जिद आहे असे, घोषित करतो. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे व अविस्मरणीय क्षण म्हणून आजच्या दिवसाला कधीच विसरू शकत नाही. कारण ज्या मस्जिदीबद्दल खूप सारे गैरसमज होते त्याच मस्जिदमध्ये आज माझा सत्कार करण्यात आला.

आम्हाला अतिशय आदराने व प्रेमाने मस्जिदीबद्दल मार्गदर्शन केले, चांगली वागणूक दिली याबद्दल मी जमात-ए-इस्लामी हिंद चा ऋणी आहे. त्यांनी मला आणि आमच्या सर्व राष्ट्र सेवा दलाच्या सैनिकांना या कार्यक्रमात बोलावले या कार्यक्रमात व त्यांच्या सर्व कार्यक्रमाला आम्ही सर्व नक्कीच उपस्थित राहू, असे मी त्यांना शब्द देतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे, अजिजभाई शेख,अझर भाई शेख, ऋषिकेश गायकवाड, शिवाजी साताळकर, गणेश जाधव, सुकदेव आहेर तसेच मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्र सेवा दल सैनिक शिक्षक भारती चे पदाधिकारी व इतर अनेक धर्माचे लोक उपस्थित होते. याप्रसंगी जमात-ए-इस्लामीच्या मराठी भाषेतील असलेल्या असंख्य पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यात उपस्थितांनी भरपूर प्रमाणात पुस्तके खरेदी केली. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार व मराठी भाषेतील इस्लामिक  पुस्तकांवर चर्चा रंगली. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष फेरोज आजमी यांनी सादर केले. सूत्रसंचालन अजहर शहा यांनी केले. आभार शकील शेख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमील साहब, मुस्ताक साहब, इमरान शेख, समद शेख, अब्दुल रहिम महेवी , मकसुद महेवी, अकील अन्सारी, फैसल अंसारीसह आदी समाज बांधवांनी प्रयत्न केले.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget