हजरत अदी बिन हातिम (र.) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे की ‘‘तुमचा (म्हणजे मानवाकडून) अशा प्रकारे हिशेब घेतला जाणार आहे की अल्लाह आणि त्याच्या दरम्यान कोणी वकील किंवा त्याची बाजू मांडणारा असणार नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या उजव्या आणि डाव्या बाजुला पाहिल्यास त्याला कोणच दिसणार नाही. फक्त त्याचे कर्मच त्याला दिसतील. त्याने समोर पाहिल्यास त्याला नरक दिसेल. जर तुम्हाला शक्य असेल तर दान करीत जा. कितीही क्षुल्लक का असे ना. याद्वारेच तुम्हाला नरकापासून सुटका मिळणे शक्य आहे.’’ (बुखारी, मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की ‘‘लोक हा माल माझा आहे, असे सांगत असतात. हा माझा माल आहे, माझा माल आहे. पण वास्तविकता अशी आहे की त्याने जे खाल्ले ते संपले. जी काही वस्त्रे त्याने परिधान केली असतील ती जुनी होऊन फाटून गेली. पण त्याने अल्लाहच्या कारणास्तव जे काही खर्च केले असेल तो माल मात्र अल्लाहपाशी त्याच्या नावाने जमा आहे. त्याव्यतिरिक्त जे काही त्याच्याकडे असेल ते त्याचे नाही. ते त्याच्या वारसांचे आहे. तो स्वयंम रिकाम्या हातांनी जगाचा निरोप घेईल.’’ (ह. अबू हुरैरा (र.), मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘कयामतच्या दिवशी अल्लाह आपल्या मानवांना जीवंत उठवील. ज्यांना त्याने मालमत्ता आणि संतती बहाल केली होती. त्यांच्यातून एकाला अल्लाह विचारील की हे अमक्याची संतती. ती व्यक्ती उत्तर देईल की मी हजर आहे, माझ्या विधाता! अल्लाह विचारील, मी तुला मालमत्ता आणि संतती दिली होती, त्याचे काय केलेस? ती व्यक्ती उत्तर देईल की माझ्या विधात्या, तू मला बरेच काही दिले होते. अल्लाह विचारील की माझ्या देणग्यां मिळाल्यानंतर तू कोणते कर्म केले? ती व्यक्ती म्हणेल की मी माझी सर्व मालमत्ता आपल्या संततीसाठीसोडून आलो जेणेकरून त्यांच्यावर गरिबीचे जीवन जगण्याची पाळी येऊ नये. अल्लाह त्यास म्हणेल की तुला जर वास्तवतेचे ज्ञान असते तर तू कमी हसला असतास आणि जास्त रडला असतास. ज्याला आपल्या संततीविषयी जी भीती होती तीच अवस्था त्यांच्यावर लादली गेली आहे. (दारिद्र्य) पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला अल्लाह असा प्रश्न विचारील की जो काही माल आणि संतती तुला दिली होती त्याचे काय केलेस? ती व्यक्ती उत्तर देईल की माझ्या विधाता, तू मला जे काही दिले होते ते सर्व मी तुझ्या कारणास्तव खर्च करून टाकले आणि आपल्या संततीच्या बाबतीत मी तुझ्या आणि तुझ्या कृपेवर विश्वास ठेवला. अल्लाह अशा व्यक्तीस म्हणेल की तुला जर वास्तविकतेचे ज्ञान असते तर जास्त हसला असता आणि कमी रडला असता. आणि ऐक, आपल्या संततीविषयी जसे तू माझ्यावर विश्वास ठेवला होता तसेच मी त्यांना दिले. (औदार्य आणि सुबत्ता)’’ (ह. अब्दुल्लाह इब्ने मसूद (र.), तिबरानी)
(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)
Post a Comment