3 नोव्हेंबर 2020 रोजी होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकातील दोन प्रमुख उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जोबायडन यांच्या दरम्यान 29 सप्टेंबर रोजी पहिली वादविवादाची फेरी झाली. चर्चेची ही फेरी क्वि लँडच्या ओहायओ शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. या चर्चेपुर्वी दोन्ही उमेदवारांनी जोरदार तयारी केली होती. जशी की अपेक्षा केली जात होती, ट्रम्प यांनी आपल्या हाडेलहप्पी स्वभावाप्रमाणे आरडाओरडा करून चर्चेत वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जो बायडन यांनी ट्रम्प यांच्या संबंधी चर्चे त असलेल्या आयकर संबंधीच्या मुद्याला हात घातला. त्यांनी ट्रम्प यांना विचारले की, तुम्ही किती आयकर भरलात? त्या संबंधीचे रिटर्न जगाला कधी दाखवाल? तेव्हा ट्रम्प म्हणाले की, ते लवकरच आपले रिटर्नस् जाहीर करणार आहेत. तेव्हा पुन्हा बायडन यांनी प्रतीप्रश्न केला. केव्हा? इन्शाअल्लाह तुम्ही दाखवाल. बायडन यांनी इन्शाअल्लाह हा शब्द उच्चारताच ट्रम्प सहीत अमेरिकेचे अनेक नागरिक गोंधळून गेले. अनेकांसाठी हा शब्द नवीन होता. अनेक लोकांनी गुगलवर इन्शाअल्लाह या शब्दाचा अर्थ शोधण्यास सुरूवात केली. तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्या मुस्लिम लोकांनी लगेच हा शब्द केव्हा उच्चारला जातो, त्याचा अर्थ काय, इत्यादी बाबतची माहिती तत्परतेने सोशल मीडियावर टाकली. दिवसभर हा शब्द समाजमाध्यमांवर ट्रेंड करत होता.
या चर्चेची पहिली फेरी जिंकल्याचा दावा दोन्ही उमेदवार जरी करत असले तरी ही चर्चा घडवून आणणाऱ्या अँकरची मात्र दमछाक झाली. त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांना आवरण्यासाठी भरपूर कष्ट पडले. अनेकवेळा ट्रम्प यांना गप्प बसविण्यासाठी कठोर शब्दांचा उपयोग करावा लागला.
या चर्चेमधून एक भीतीदायक सत्य पुढे आले की, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला निवडणुकीत पराजय झाल्यास तो स्वीकारण्यासाठी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ट्रम्प यांना येत्या निवडणुकीत सातत्याने पराभवाची भीती वाटत असल्यामुळे त्यांनी आतापासूनच पोस्टल बॅलेटचे निमित्त पुढे करून निकालांना सर्वो च्च न्यायालयात आव्हान देण्याचे सुतोवाच केलेले आहे. कोर्टात त्यांच्या बाजूने निकाल लागेल, याची त्यांना खात्री वाटत असून, त्यांच्या या पावित्र्याने अमेरिकेतील सज्जन नागरिक मात्र धास्तावले आहेत.
Post a Comment