काही मानवतावादी लोक आजही धर्म जात न पाहता समाजसेवा करीत असतात. या कोरोना संकटात व पूर्वीही अनेक मुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मीयांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे केले. तसेच अनेक हिंदू बांधवांनी गरीब मुस्लीम कुटुंबीयांना आर्थिक मदत केली याची अनेक उदाहरणे आहेत. दोन शेजारी राहणारे लोक जरी वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. आपात्कालीन परिस्थितीत हेच लोक एकमेकांच्या कामी येतात. येथे जात, धर्म , पंथ महत्त्वपूर्ण काही राहत नाही.
आपल्या धर्माचे आचरण करताना इतर धर्मियांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जाते, असे लोक भारतात मोठ्या संख्येने आहेत. परंतु अशा मानवतावादी लोकांकडे आपले लक्ष जात नाही. लक्ष जाते ते धर्मांध लोकांच्या बोलण्याकडे व त्यांच्या कामाकडे. त्यांच्याकडेच युवक आकर्षित होतात. कारण त्यांच्या तरूण मनावर धर्मांधता ही धर्मसंकट म्हणून बिंबवली जाते. अशा परिस्थितीतून आपण सावरलो नाही तर ह्या राष्ट्राची एकात्मता नष्ट होईल यात तिळमात्र शंका नाही. भारताची राष्ट्रीय एकात्मता व अखंडता ही अबाधित रहावी यासाठी आजच्या युवा पिढीने या धर्मांध लोकांच्या नादी न लागता मानवतावादी मूल्य जपून राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत, हीच खरे राष्ट्रप्रेम.
जपान सारखे देश प्रगत आहेत कारण तेथील लोकांना जातीय राजकारण माहित नाही. बहुतेक सर्व लोकशाही राष्ट्रात राष्ट्र प्रथम मानले जाते परंतु आम्हाला धर्म प्रथम वाटतो. अमेरिकेत एका निग्रो नागरिकासाठी सर्व लोक न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरतात परंतु आपल्याकडे याहून वेगळे पहावयास मिळते. येथे रक्ताचे पाट वाहिले तरी काही फरक पडत नाही. ज्याच्यावर अन्याय होतो त्याची जात त्याचा धर्म प्रथम पाहिला जातो. भर दिवसा शहरात खून होतात. शहरी गुन्हेगारी ही खूप वाढली असून ही समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. भर दिवसा शहरात चोर्या होत आहे. भर दिवसा दुकाने लुटली जात आहेत. जे चित्रपटात होते ते आज वास्तवात घडत आहे. महिलांना एकटे चालणे आज अवघड झाले आहे. आम्हाला या शहरी गुन्हेगारी वर नियंत्रण करता का येत नाही याचा विचार करणे गरजेचे आहे.
या देशात जातीयवादी आणि धर्मनिरपेक्ष अशा दोन विचारधारा आहेत. आजची युवा पिढी पुरोगामी विचारधारेकडे आकर्षित झाली तर राष्ट्रीय एकात्मकता वाढेल. देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात युवकांची संख्या अधिक आहे. भारत हा युवकांचा देश आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. पुढे चालून हेच देशाची उन्नती करण्यासाठी पुढे येतील. युवकांनी आत्ता विवेकी व्हावे. धर्मांध विचारांना बळी पडू नये. बेकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात शासकीय नोकरी मिळणे अवघड झाले आहे. परंतु शिक्षणातून मिळविलेल्या कौशल्यांचा उपयोग युवकांनी जीवनात करून घ्यावा. स्वतःचे व्यवसाय निर्माण करावेत. आपली आवड ज्यात आहे ते व्यवसाय करावेत.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. मुबलक प्रमाणात शेती असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे विभाजन होत आहे. त्यातून नवीन पिढीच्या वाट्याला अल्प जमीन येत आहे. तरी पण युवकांनी आधुनिक पद्धतीने शेती करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवावे. शिक्षणाचे प्रमाण वाढले असून, ज्यातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात युवक वावरत आहेत. उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांना फक्त नोकरी मिळावी असे वाटते परंतु प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. शिक्षणाचा कौशल्यांचा फायदा शेती व व्यवसायात करून घेतल्यास फायदा होईल. काम करण्याची लाज असू नये ती ऐतखाऊ पणाची असावी.
वयाची पंचेवीस-तीस वर्ष होऊनही युवक कोणताच उद्योग करीत नाहीत. त्यामुळे ते नैराश्याच्या दलदलीत खोलवर रूतले जातात, नाहीतर धूर्त राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडतात. राजकारण्यांसोबत राहून युवकांना कवडीचा नफा होत नाही पण ऐन उमेदीचे वर्ष युवक राजकारणात घालवतो. तसेच शिक्षण घेत असलेला किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करणारा मोठा युवा वर्ग राजकारणात कार्यकर्ता म्हणुन वेळ घालवतो. पुढे तो रोजगार व उत्पन्नाचे काहीच साधन निर्माण करू शकत नाही . नेत्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यात आजचा युवक धन्यता मानतो. ही सेल्फी युवकाना खूप महागात पडत आहे.
आज युवकांना प्रेरणाच नाही असे वाटते. विवेकानंदांनी युवकांना उद्देशून हजारो पाने लिहिलेली आहेत. ते साहित्य कधी आमचा युवक वाचत नाही. महाराष्ट्रातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तरी प्रेरणा घ्यावी. महाराजांनी व अनेक महापुरुषांनी जी आम्हाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली ती तरी प्रेरणा आमच्यात जिवंत आहे का? आम्ही अनुकरण करतो ते या धूर्त राजकारण्यांचे.
प्रदीर्घ अखंडित मूठभर लोकांची गुलामी 1947 नंतर नष्ट झाली. या स्वातंत्र्याची प्रेरणा आमच्यात आज शिल्लक उरलीच नाही. स्वातंत्र्य या मूल्यासाठी आपल्या हजारो पूर्वजांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. याचा विसर तर पडला नाही ना? त्या हजारो पूर्वजांचे आपण अनुकरण करून परिवर्तन करण्यासाठी पुढे येत नाही. जरी ते परिवर्तनासाठी पुढे येत नसतील तरी त्याने राजकारण्यांचे तरी अनुकरण करू नये. आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली तरी ज्या ज्वलंत समस्या आहेत त्या कमी झालेल्या नाहीत. ही त्या हजारो बलिदानी व त्यागी लोकांची अवहेलना तर आम्ही केली नाही ना? त्यांना अपेक्षित होते ते स्वातंत्र्य मिळाले का? व मिळालेले स्वातंत्र्य आम्ही अबाधित ठेऊ शकलो का? याचा विचार होणे गरजेचे आहे. हे स्वातंत्र्य तरी कोणाचे? आज भीतीपोटी लेखकांच्या लेखन्या थंडावल्या, स्वातंत्र्यावर बोलतात व लोकांना जाणीव करून देतात म्हणून त्यांना मारले जाते. आजच्या व्यवस्थेने लोकांना व्यक्त होण्याचे तरी स्वातंत्र्य दिले का? हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार , मुलींना मुलींच्या मना विरोधात विवाह करणे, योग्यता असूनही डावल्या जाणे, जिवंत जाळणे अश्या कीती तरी भयंकर समस्या महिलांना स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी बंधने आणत आहेत. तरीपण महिला पुरुषाबरोबर चे स्वातंत्र्य अनुभवते. महिलांना व्यवस्थेत स्वातंत्र्य आहे असे आम्ही म्हणू शकतो का?
मित्रांनो ! स्त्री पुरुष समानता आणायची असेल तर सुरुवात घरापासून करावी लागेल. आम्ही जग बदलू शकत नसलो तरी आमच्या घरातील महिलांना तरी समानतेची वागणूक देऊ शकतो. त्यांचा सन्मान करून असं नक्कीच करू शकतो. वरील सर्व लिखाणात परिवर्तन करणे का गरजेचे आहे हे सांगितले आहे. एका महिलेवर बलात्कार होतो, एक गरीब छळला जातो, एक शेतकरी आत्महत्या करतो, नववधू जिवंत जाळली जाते, शेजारी कोणी उपाशी पोटी झोपतोय, गुंड लोक कुणाची जमीन घेतात, न्यायालयात जाऊनही लोकांना न्याय मिळत नाही, अशा कितीतरी समस्या आहेत, प्रसारमाध्यमे धर्मांधता जातीयतेला खतपाणी घालतात, अशा सर्व घटना माझ्यासमोर होताना मी गप्प रहावे हे मला योग्य वाटत नाही. जोपर्यंत येथील लोक व्यक्त होत नाहीत, यावर विचार करून परिवर्तन करण्यासाठी पुढे येत नाहीत तोपर्यंत भारताची परिस्थिती सुधरू शकत नाही.
प्रत्येकाने परिवर्तनाची सुरुवात आपल्या घरापासून स्वतःपासून करावी. प्रत्येक भारतीयाने स्वातंत्र्य ,बंधुता, न्याय या मूल्यांचा अंगीकार करून समानता निर्माण करून आपला परीसर सुधारावा. नक्कीच परिवर्तन होईल. आपले हक्क आपले कर्तव्य व आपल्या जबाबदार्या लक्षात ठेवून, हक्कासोबत कर्तव्याची जाणीव ठेवावी. लोकशाहीत प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे परंतु लोकांच्या जगण्याचा अधिकार ही हिरावला जात आहे. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य बरोबरच व्यक्ती स्वातंत्र्याची चळवळ उभारणे आम्हाला गरजेचे वाटते.
लोकशाहीत व्यक्तीला दिले गेलेले अभीव्यक्तीचे स्वातंत्र्य आज दिली जाते का?
जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. हा देश चालवण्यासाठी संविधान निर्मिती झाली. आज लोकशाही मुल्य व संविधान आधारित व्यवस्था चालते का? याचा विचार होणे गरजेचे आहे. लोकशाहीत कायद्यापुढे समानता आहे परंतु व्यवस्थेत समानता आहे का? संविधानाच्या योग्य अमलबजावणीतून विषमता नष्ट करून समता आणू शकतो. भारतीय लोकशाही व संविधान यांचा आम्हाला अभिमान आहे व सर्वानां असायलाच हवा. जगात अनेक हुकूमशाही राष्ट्रे आहेत तसेच अनेक लोकशाही राष्ट्रे आहेत. फक्त लोकशाही राष्ट्रेच चांगली व स्वातंत्र्यवादी आहेत. लोकशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते तेव्हा आपणास चिंता करणे भाग असते. जगात कोणताच देश नागरिकांना इतके स्वातंत्र्य देत नाही जितकी भारतात आहे. लोकशाही मूल्ये ही आपण जगाला दिली. बुद्धांच्या पूर्वीपासून अनेक गणराज्य भारतात होती. लोकशाहीत कायद्याची अंमलबजावणी योग्य झाली तर आमचा आपला देश आदर्श म्हणून गणला जाईल. पण आज याचा विसर पडतोय. आम्ही विकसित देशांच्या यादीत नाही तर नाही, विकसनशील देशांच्या यादीत ही मागे आहोत पण योग्य नेतृत्ववाने आम्ही विकसित होऊ शकतो. परंतु आपण ही वास्तविकता नाकारून आपण खूप विकसित आहोत हा अट्टहास काही योग्य नाही. देश बदलेल, लोक विचार करतील, नक्कीच येथील युवक जागृत होऊन देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करेल. परंतु हा आशावाद आहे. हा आशावाद अनेकांनी व्यक्त केला परंतु वास्तव हे आहे की हा आशावाद वास्तवात उतरवण्याचा आपण प्रयत्न केला नाही तर, आपण वेळीच जागृत झालो नाही तर आपल्या लोकशाहीचे भवितव्य काय असेल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
आपल्या लोकशाहीतून देशाचा विकास करायचा आहे. लोकशिक्षण व प्रबोधन यातुन लोक जागृत करायचे आहे. यासाठी युवकानी पुढे यावे.
- नजीर महेबूब शेख
9561991736
Post a Comment