महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम समाजाचे अस्तित्व आहे. बहुसंख्य मुस्लिम समाज खेड्यात राहतो. त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. तो शोषितांचे जीवन जगत आहे. मुसलमान म्हणून जीवन जगताना त्याला जीव घेणाऱ्या विविध प्रश्नांशी संघर्ष करावा लागत आहे. त्याचे जगणे येथे घुसमटून गेले आहे. त्याच्याकडे येथे सातत्याने संशयाने पाहिले जात आहे. तो या देशाचा मूलनिवासी असूनही त्याला परकीय म्हणून संबोधले जाते. तो या देशाच्या सुखदुःखाचा भाग झाला आहे. तरीही येथील धार्मिक व्यवस्था त्याला परकीय ठरविण्यात आपली शक्ती घालवित आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही जाणीव अत्यंत तरल जाणीव आहे. प्रस्थापित व्यवस्थेने मुस्लिम समाजाच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. येथील प्रस्थापित समाजव्यवस्थेने हिंदू-मुस्लिमांची मने कलुषित केली आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम परस्परांसाठी परके झाले आहेत. या परकेपणामुळे मुस्लिम मनाचं लालित्य हरवल्या गेले आहे. त्यांच्या जीवनाची वाताहत झाली आहे. मुस्लिम समाज मानसिक कोंडीतून बाहेर येण्यासाठी तडफडतो आहे. मुस्लिम समाजाच्या तडफडीचे चर्चाविश्व कवी अॅड. हाशम पटेल यांनी ‘संग्राम’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहामधून घडवून आणले आहे. या चर्चाविश्वाचा मूळ उद्देश मुस्लिमांवरील अन्यायाचा बुलडोजर थांबविणे आणि मुस्लिमांचे वास्तव जीवन आस्वादकांपुढे आणणे हेच आहे. ‘संग्राम’ हा कवितासंग्रह भूमी प्रकाशन लातूर ने 2013 साली प्रकाशित केला आहे.
कवी हाशम पटेल हे संवेदनशील मनाचे कवी आहेत. मुस्लिम मनांची घुसमट आणि आक्रंदन त्यांनी आपल्या कवितेमधून मोठ्या ताकदीने मांडली आहे. हे आक्रंदन त्यांच्या मनाला अस्वस्थ करणारा आहे. कवी हाशम पटेल यांनी येथील व्यवस्थेच्या मुस्लिम समाजावरील हल्ला परतवून लावताना हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या मानसिकतेलाही धारेवर धरले आहे.
‘जरी जातीनं आम्ही मुसलमान
पक्का आमुचा इथल्या मातीशी इमान
या आम्ही तुमचे जुने मेहमान
तुम्ही आमचे जुने मेहमान’ (पृ.क्र. 39)
वरील ओळींमधून कवीने माणुसकीचा सुंदर सोहळा साजरा केला आहे. हिंदू-मुस्लिमांनी सन्मानाने जीवन जगावे. हिंदू- मुस्लिमांचा प्रतिष्ठेला येथील मूलतत्त्ववाद्यांनी हैराण केले आहे. येथील हिंदू-मुस्लिमांना आपापल्या धर्मातील मूलतत्त्ववाद नाकारून सन्मानाने जीवन जगता येऊ शकते. हे सांगतांना कवीने भारतीय मुस्लिमांची आचरणशैली ही इस्लामला मानणारी असली तरी त्यांची संपूर्ण निष्ठा ही भारत देशावर आहे. उपासना पद्धती वेगळी असली तरी त्यांचे भारत देशावर प्रेम आहे. याचे कारण असे की मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ कुरआन मुस्लिमांना आदेश देतो की तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाप्रती तुम्ही निष्ठावंत असायला हवे. ज्या देशात राहता त्या देशाशी इमान राखलेच पाहिजे. दुसरा मुद्दा असा की भारतीय मुस्लिम हे धर्मांतरीत आहेत. ते या देशातील मूलनिवासी आहेत. ज्या धर्माचा पवित्र ग्रंथ आपल्या अनुयायांना आपल्या देशाशी निष्ठावंत राहण्याचा आदेश देतो आणि जो समाज येथील मूलनिवाशी आहे असा समाज परकीय कसा होऊ शकतो. मुस्लिम समाज तर इतरांपेक्षा अधिक राष्ट्रप्रेमी आहे. मुसलमान हा इमानधारक आहे. हिंदू- मुस्लिमांचा नात्यातील सौहार्दाचा कार्यक्रम कवी हाशम पटेल यांनी वरील ओळींमधून पेश केला आहे.
‘आणखी किती लूट व्हावी
उद्ध्वस्त प्रपंचाच्या भिंती
त्यांनी कधी उभी करावी?
येणारी सकाळ आबदेत उगवावी
जाणारी रात्र आबदेत जावी,
वळचणीत पडलेल्या मुसलमानांची
आणखी किती कुचंबना व्हावी?’ (पृ.क्र. 41)
कवी हाशम पटेल म्हणतात की, मुस्लिमांच्या वाट्याला आलेल्या वेदनांचा हिशोब मुस्लिमांनी करायला हवा. कवी वरील ओळींमधून मुस्लिम समाजाला नवे भान देऊ इच्छितो. कवी मुस्लिम समाजाला स्वतःचे आत्मपरिक्षणही करायला लावतो. मुस्लिम समाजाच्या वाताहतीला कारणीभूत कोण आहे? येथील सांस्कृतिक जीवनात मुस्लिमांचे स्थान काय आहे? मुस्लिम समाज सन्मानाने कसा जगेल? या सर्व मूलभूत प्रश्नांची चर्चा कवीने मुस्लिमांवर होणाऱ्या अमानुषतेच्या संकटातून सोडवण्यासाठी केली आहे. वरील ओळींतील कवीचे चिंतन हे मुस्लिम समाजाच्या नेणिवेला जागृत करणारे आहे.
‘जन्माने मी मुस्लिम आहे
जगणे मात्र माझे दलित आहे
सत्य मी हे सांगत आहे
दलित म्हणा हो मला दलित म्हणा.
आता तुमच्या टाचा खाली मी दबलो आहे
चालू जमान्याचा मी क्षूद्र आहे
आक्रंदणे माझे गगनभेदी आहे.
पण कोण ते ऐकत आहे.’ (पृ.क्र. 49)
कवी हाशम पटेल यांनी मुस्लिम समाजाची वास्तव परिस्थिती मोठ्या पोटतिडकीने आस्वादकांसमोर मांडली आहे. या देशात सातत्याने घडणाèया जातीय दंगली, हिंदुत्ववादी संघटनांचा प्रक्षोभ मुस्लिमविरोधी प्रचार, मुस्लिम समाजात शिक्षणाचा मर्यादित प्रसार या सर्व बाबींमुळे मुस्लिम समाजाची आजची परिस्थिती ही दलित वर्गापेक्षाही बिकट झाली आहे. हे सर्व पाहून कवीच्या मनात उद्रेक निर्माण होतो. हा उद्रेक जाणिवेच्या पातळीवरील आहे. कवी मुस्लिमांच्या दडपलेल्या जीवनाचा शोध एकीकडे घेतो आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या जीवनाला का दडपले याचा छडा लावण्याचा निर्धारही वरील ओळींमधून निर्भयपणे करतो आहे.
‘आला योग मुस्लिमाला कधी देत नाहीत,
तेव्हा मुस्लिम आतून बाहेर रिताच राहतो.
ते धन्य मानतात पेटवण्यात
पेटलेले आणखी भडकावण्यात
तेव्हा मुस्लिमच जळतो’ (पृ.क्र. 50)
वरील ओळींमधून कवी हाशम पटेल यांनी येथील राजकीय पक्षांची मुस्लिम समाजविषयीची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली आहे. कवी हाशम पटेल यांनी वरील ओळींमधून येथील राजकीय पक्षांचे चारित्र्यच मांडले आहे.
‘उठा उठा रे...
मुस्लिम गड्यांनों
सगळे व्हा सावधान
कराया तुमचे सारे उत्थान
संदेश तुम्हा कुरआनाचा
हिजरतचा तुम्हा नारा
कुठेच तुम्ही मागे नाही
तुमचा दर्जा न्यारा
लोटालोटीच्या रेट्याने
मागे तुम्ही पिछाडता
मग कशाला गप्प राहता
मरगळ कधी टाकता?’ (पृ.क्र. 89)
वरील ओळी मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या आहेत. कवीला प्रकर्षाने वाटते की, मुस्लिम समाजाने आज भौतिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अद्ययावत राहावयाला हवे. इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथ ‘कुरआन’चे तत्त्वज्ञान हे माणसाला अद्ययावत ठेवणारे तत्त्वज्ञान आहे. कवीने मुस्लिम समाजाला स्वतःची तपासणी करायला सांगितले आहे. कवीने वरील ओळींच्या निमित्ताने मुस्लिमांच्या मनात स्वाभिमान जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. वरील ओळींच्या मनातील इच्छा ही आहे की, मुस्लिम समाजाने स्वाभिमानाचे महाआंदोलन निर्माण करावे. त्यांनी स्वतः आपल्या स्वाभिमानाचे मारेकरी ठरू नये. त्यांनी स्वतः त्यांच्यापुढील काळोखाचा अंधार दूर करावा. त्यांनी कुणाची लाचारी स्वीकारू नये. आज मुस्लिम समाजात निर्माण झालेली लाचारी ही ‘कुरआन’च्या जीवनशैलीच्या स्वच्छपणे विरोधी टोकाला राहिल्याने आली आहे. हे सांगायला कवी विसरत नाही.
‘आम्हा असेच कुठपर्यंत
तुम्ही उपरे ठेवणार
आम्ही हकदार तुमच्या बरोबरीचे
आम्हाला उचलून असे का हो देणार?
सत्ताप्रशासनात अशी तुम्ही
किती ही वाटमारी करणार.’ (पृ.क्र. 88)
वरील ओळींमधून कवीने पराकोटीचा संतापच व्य्नत केला आहे. कवीचा हा संताप समजावून घ्यायला हवा. कवीचा हा संताप माणुसकीच्या प्रस्थापनेसाठीच आहे. माणुसकीची असीम तहान कवीने वरील ओळींच्या शब्दांत बांधली आहे. भारतीय संविधानाचे कलम 14, 15 आणि 16 हे सर्वप्रकारच्या विषमतेचे निर्मूलन करणारे आहे, 25 वे कलम भारतीय लोकांना धर्म स्वातंत्र्याचे अधिकार देणारे आहे, 28 आणि 29 वे कलम अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. भारतीय संविधान हे धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्मस्थान अशा कोणत्याही कारणांवरून कोणत्याही माणसात भेद करीत नाही. पण येथील सामाजिक व्यवस्थेने आणि राजकीय व्यवस्थेने मुस्लिम समाजाला सर्वच सुखसुविधांपासून वंचित ठेवले आहे. मुस्लिमांना लाचार ठेवून या देशाला महासत्ता होता येणार नाही.
‘झगमगत्या भारता
महाशक्ती भारता
मागास मुसलमानांना
जगात कोठे दाखवता?’ (पृ.क्र। 98)
कवीने उपस्थित केलेला प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. एकीकडे भारत महाशक्ती होण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण येथील मागास असलेल्या मुस्लिमांना मागास ठेवून देशाला महासत्ता बनता येणे शक्य नाही. केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर या देशातील कोणालाही मागास ठेवून देशाला महाशक्ती होता येत नाही. कवीच्या जाणिवेच्या दृष्टीने वरील ओळी महत्त्वाच्या आहेत.
‘वंचितता मागासलेपणा
मुस्लिमांना शाप आहे
राजकीय आरक्षण
हेच अचूक उपाय आहे’ (पृ.क्र. 100)
वंचिततेमुळे, मागासलेपणामुळे मुस्लिमांचे श्वास गुदमरत आहेत. त्यांना स्वावलंबी जीवन जगता येत नाही. त्यांना इतरापुढे शरण यावे लागते. या सर्व अरिष्टांपासून परावृत्त करण्यासाठी मुस्लिमांना आज राजकीय आरक्षणाची नितांत गरज आहे. सत्तेत सहभागी असल्याशिवाय मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाही. संसदेत त्यांचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे मुस्लिम समाजापुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वतंत्र्य हरवलेल्या मुस्लिम समाजाला त्यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे एकमेव उपाय म्हणजे राजकीय आरक्षण आहे.
‘संग्राम’मधील भूकंपाच्या नोंदी
कवी हाशम पटेल संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांनी ‘संग्राम’ या कवितासंग्रहात भूकंपाच्या नोंदी टिपल्या आहेत. 30 सप्टेंबर 1993 ला लातूर, किल्लारी मध्ये भयानक भूकंप आला होता. येथील लोकांनी भूकंपाच्या नैसर्गिक कौर्याचा सामना कसा केला? भूकंपग्रस्तांची पिळवणूक कशी करण्यात आली याचे वर्णन ‘गाव माझं जळतंय’, ‘भूकंग्रस्तांची वसाहत’, ‘त्यांना भूकंप वरदान ठरले’ या तीन कवितांमधून कवीने केले आहे. भूकंपामुळे जगण्याचे प्रयोजन गमावणाऱ्या माणसांनी नव्याने जगण्याच्या प्रयोजनाचे भावस्पंदन कवीने आपल्या शब्दांमधून मांडले आहे.
‘धक्क्यावरच्या धक्क्यानं
गाव सारं थरथरतंय
भूकंपाच्या धास्तीनं
काळीज पार फाटतंय’ (पृ.क्र. 66)
आजही भूकंपाच्या ध्न्नयातून गाव सावरले नाही. गावातील लोकांच्या मनात भूकंपाची सतत भीती असते. हे वास्तव कवीला सतत जाणवत आहे. भूकंपाची दहशत आजही गावात जाणवत राहते. भूकंपाच्या स्फोटाचे आवाज आजही गावात गुंजताना कवीला जाणवते.
‘उघड्या भूकंपग्रस्तांना
पावसाने झोडपले
अंथरायला धरती
पांघरायला आकाश
उघड्या माळावरती
भूकंपग्रस्तांची वसाहत’ (पृ.क्र. 67)
भूकंपातून सावरण्याआधीच पावसाने येथील लोकांना आपले कौर्यरूप दाखविले. भूकंप आणि पावसाच्या युतीने गावातील लोकांना संपविण्याचा कटच केला होता. या गावातील लोकांपुढे जेव्हा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा गावातील लोकांनी धरतीलाच अंथरूण आणि आकाशालाच पांघरूण केले. उघड्यावरच गावातील लोकांनी आपल्या संसाराला नव्याने थाटले. भूकंपग्रस्तांच्या वाट्याला आलेल्या यातनांचे वास्तव कवीने वरील ओळींमधून मांडले आहे.
कवी हाशम पटेल यांचा संग्राम हा कवितासंग्रह मुस्लिमांच्या स्वप्नांना फुलविणारा कवितासंग्रह आहे. समकालीन जीवनात मुस्लिमांच्या जीवनाची स्थाननिश्चिती करतांना मुस्लिमांच्या जळत्या प्रश्नांशी ‘संग्राम’ हा कवितासंग्रह युद्ध करतो. त्याचबरोबर मुस्लिमांना अंकित करणाऱ्या मानसिकतेविरुद्धही निकराचा विद्रोह करतो. सामाजिक समतोल निर्माण करण्याची सळसळ ‘संग्राम’ या कवितासंग्रहातील प्रत्येक कवितेतून पाहावयास मिळते.
कवी हाशम पटेल यांनी येथील राजकीय व्यवस्थेवरही ताशेरे ओढले आहे. देशात कोणीच वंचित राहणार नाही अशा राजकारणाची आवश्यकता आज देशाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना शांतता हवी आहे, प्रत्येकांना सामाजिक सुरक्षा हवी आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जीवन जगता यावे. कोणत्याही प्रकारची विषमता देशात नसावी. ही माफक अपेक्षा कवीने येथील राजकारण्यांकडून केली आहे. विषमताविहीन समाजनिर्मितीसाठी राजकारण्यांनी प्रयत्न करायला हवे, किंबहुना असा समाज निर्माण करणे ही राजकारण्यांची जबाबदारी आहे.
डॉ. अक्रम. ह. पठाण
अंजूमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
नागपूर सदर, नागपूर. भ्रमणभाष : 8600699086
Post a Comment