जानेवारी महिना सुरू झाला, सरत्या वर्षाला निरोप देत 2020 या नवीन वर्षाचा आरंभ झाला. या वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षी आलेल्या महापुराच्या संकटातून सावरल्याचा एक सात्विक आनंद होता. मात्र हा आनंद अवघ्या दोन महिन्यांतच भूर्रकन उडून गेला आणि देशावर कोरोनासारख्या महामारीने आक्रमण केले. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी अवघा देश कंबर कसून सज्ज झाला. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महाभयानक संकट असले तरी ते भारतासमोर एक मोठे आर्थिक अरिष्ट आहे. या विषाणूंचा संसर्ग थोपवणे हे देशासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, त्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली, सर्व देश स्थानबद्ध झाला. एकुणच देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला, हे या कोरोनाचे फार मोठे अरिष्ट आले आहे.
या जीवघेण्या संकटांमुळे देशातील अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून पडलेला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या अरिष्टाशी कसा मुकाबला करावा, हा प्रश्न देशातील राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह अर्थतज्ज्ञ, व विचारवंतांना पडला आहे. यापूर्वी भारतात महामारी, प्लेग, देवी, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुनिया, एड्स या सारख्या रोगांनी थैमान घातले होते, काही अंशी त्या त्या परिस्थितीत आर्थिक संकटेही आवासून उभी राहिली,मात्र त्यातून आपण सहिसलामत बाहेर पडलो, तथापि, सध्या कोरोनामुळे जे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे, ते न भूतो असे आहे. अर्थात हे जागतिक पातळीवरचे महाभयानक संकट उभे ठाकले असले तरी भारताच्या दृष्टीने हे महाभीषण व महाभयप्रद आहे. मात्र असे असले तरी त्याची फारशी झळ शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना बसलेली नाही. सकल राष्ट्रीय उत्पन्नात 16 टक्के हिस्सा असणारे आणि 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला तारून नेईल, असा विश्वास अनेक अर्थ व कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या आर्थिक वर्षात देशातील आर्थिक विकासासाठी शेती आणि शेतकरी यांचा हातभार लागणार आहे.
कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्था संकटात सांपडली आहे, असे चित्र आहे. अर्थात त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर ही होत आहे. परंतू लॉकडाऊनच्या काळात सुध्दा देशातील सर्व राज्यांत शेतीची कामे तुलनेने अत्यंत सुरळीत व व्यवस्थित सुरू होती.आगामी काळात देखील शेती क्षेत्राचा विकास दर चांगला राहील आणि शेती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.असे केंद्र सरकारला वाटते आहे. कोरोनोच्या संकटाच्या काळात शेतीवर विपरीत परिणाम झाला असला तरी ही 2020-21 या आर्थिक वर्षात शेतीचा विकास दर 3 टक्के राहणार आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरात 0.5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच सर्वसाधारणपणे मान्सूनचा अंदाज आणि धरणांमध्ये असलेल्या पुरेशा पाणीसाठ्याचाही शेती विकासाला फायदा होणार आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्व क्षेत्रांतील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्यामुळे आर्थिक विकासावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.पण अर्थव्यवस्थेला फटका बसला तरी ही त्याचा परिणाम कृषी क्षेत्रातील घटकांवर फारसा होणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा वाटा 16 टक्के आहे, आणि देशातील जवळपास 60 टक्के आर्थिक व्यवहार बंद असतांनाही शेती क्षेत्रातील कामे अपवाद वगळता चांगल्या प्रकारे सुरू आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात देशातील कृषी आणि शेतीशी संलग्न असलेल्या क्षेत्रातील विकास दर 3.7 टक्क्यांवर होता.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतीमालासाठी तंत्रज्ञान आधारित उपायांवर भर दिला आहे. ई-नाम या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर नुकताच बाजार समित्यांचा समावेश केला आहे. ई-नाम मध्ये समावेश असलेल्या बाजार समित्यां 685 आहेत. आणखी एक हजार बाजार समित्यांचा समावेश ई-नाम मध्ये लवकरच केला जाणार आहे.
गतसालच्या महापुराच्या कटू अनुभवातूनच जात असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत सन 2019-20 मध्ये अन्नधान्याच्या उत्पादनात दोन टक्के वाढ होऊन 298.3 दशलक्ष टन उत्पादन होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. खरीप हंगामात 149.92 दशलक्ष टन तर रब्बी हंगामात 148.4 दशलक्ष टन उत्पादन होईल असा ही विश्वास व्यक्त केला जात आहे. पुढच्या हंगामात अन्नधान्य उत्पादनाच्या व्यतिरीक्त तेलबिया आदी पिकांचे उत्पादन वाढण्याची सरकारला अपेक्षा आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्व थरातील व्यवहार बंद असल्याने लोकांच्या एकूणच व्यक्तिगत पातळीवर खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली. मात्र त्याचा परिणाम शेती उत्पादनांवर झालेला दिसत नाही. भवितव्यात ही तो होणार नाही. देशात यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सर्वसाधारण आवश्यक तेवढा पाऊस पडणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रवासी वाहतूकीसाठी लागणार्या वाहनांची विक्री शुन्यावर आली असताना महिन्द्रा अँड महिन्द्रा कंपनीकडून एप्रिल 2020 मध्ये 4 हजार 716 ट्रॅक्टर ची विक्री झालेली आहे, हे चित्र निश्चितच आशादायक आहे. अर्थात या सर्वांचं अवलोकन केले असता 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला रोजगार देणारे शेती क्षेत्र आर्थिक संकटात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितपणे तारुन नेईल,असा विश्वास व्यक्त केला तर तो वावगा ठरणार नाही.
- सुनीलकुमार सरनाईक
कोल्हापूर 7028151352
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार आहेत)
Post a Comment