गेल्या काही महिन्यांपासून चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेले ’प्राईस वॉर’ अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे-तसे सशस्त्र संघर्षात रूपांतरित होते की काय? अशी भीती निर्माण होण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे. अमेरिका आणि रशियामधील शीतयुद्धाची समाप्ती 1991 साली झाल्यानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. त्याचा एकछत्री अमल ट्रम्प यांच्या निवडणुकीपर्यंत निर्विवादपणे कायम होता. मात्र ट्रम्प यांच्या कारकिर्दीत चीनबरोबर आयात निर्यातीमधील असंतुलनाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये प्राईस वॉर सुरू झाले.ट्रम्प यांची बेलगाम वक्तव्ये चीनला डिवचण्यासाठी पुरेशी ठरली. यात कोरोनाच्या आगमनानंतर तर कळसच झाला. ट्रम्प यांनी कोरोनाला चीनी व्हायरस असे नाभिदान करून चीनला त्यासाठी जबाबदार धरून फक्त चीनचाच निषेध केला नाही तर जागतिक आरोग्य संस्थेवर चीनशी हातमिळवणी केल्याचा आरोप करून या आंतरराष्ट्रीय संस्थेचा निधी पुरवठा खंडित केला. जे-जे चीनच्या विरूद्ध करता येईल ते - ते करून ट्रम्प यांनी करोनाच्या बाबतीत चीनला जबाबदार धरून त्याच्याकडून जगाने नुकसान भरपाई घ्यावी, अशी भूमिका घेतली. दक्षिण चीनी समुद्रात आपले युद्धपोत पाठवून चीनला सरळ अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. एकूणच चीन आणि अमेरिका या दोन महाशक्तींमध्ये दिसणारी ही सर्व लक्षणे शीतयुद्धाची असल्याचे एव्हाना जगाच्या लक्षात आलेले आहे. हे दोन्ही देश अनेक मोर्चांवर एकमेकांसमोर उभे असून त्यांच्यात अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी कधी ठिणगी पडेल याची शाश्वती नाही.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीमध्ये सर्व सदस्य देशांनी आपला संदेश प्री रेकॉर्डेड स्वरूपात पाठविलेला असून, त्यातही अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरूद्ध आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे जगाने पाहिलेले आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅन्टेनियो गुटेरस यांनी या संदर्भात सांगून ठेवलेले आहे की, जागतिक महामारीच्या या काळात कोणत्याही देशाच्या स्वार्थाला कुठलेही स्थान नसावे. जगात अनेक राष्ट्रांमध्ये लोकांना भुलविणार्या पद्धतीने शासन केले जात असल्यामुळे असे देश कोरोनाशी दोन हात करतांना कमी पडत आहेत. राष्ट्रवादाची संकल्पना सुद्धा अपयशी ठरलेली आहे. सरकारांचा लोकानुनय आणि राष्ट्रवादाने कोरोनाशी सुरू असलेली लढाई किचकट करून टाकलेली आहे.’ मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात नेमकी याच्याविरूद्ध भूमिका घेऊन म्हटले आहे की, ’जेव्हा तुम्ही तुमच्या नागरिकांच्या हिताकडे पहाल तेव्हाच ते तुम्हाला सहयोग करतील.’
ट्रम्प यांचा चीन विषयीचा पराकोटीचा द्वेष आणि त्यांना त्यांच्या देशातील कोरोनामुहे निर्माण झालेल्या आणीबाणीसदृश्य परिस्थितीशी लढता न आल्यानेही वाढलेला आहे. सुरूवातीला हा व्हायरस, व्हायरसच नसून षडयंत्र आहे, अशी त्यांनी भूमिका घेतली. मास्क लावण्यावरून लोकांची टिंगल केली. सुरूवातीला स्वतःही मास्क न वापरताच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आले की, कोरोना विषयीची त्यांची भूमिका चुकली असून, त्यात बदल करणे गरजेचे आहे. ते जेव्हा देशातील कोरोना संकटाविषयी गंभीर झाले तोपर्यंत देशामध्ये एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. आजमितीला दोन लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिक या आजाराने मृत्यूमुखी पडलेले असून, जगातील सर्वात जास्त रूगण्सुद्धा याच देशात आहेत. त्यामुळे त्यांनी या संदर्भात घेतलेल्या चुकीच्या भुमीकेमुळे आतापोवतोच्या अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त लोकांचा बळी गेला असल्याची अमेरिकन नागरिकांची खात्री झाल्यामुळे, त्यांना येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणार्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव स्पष्ट दिसू लागल्याने त्यांनी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यांनी आपले अपयश झाकून पुन्हा राष्ट्रपती बनण्यासाठी चीनच्या दक्षीण समुद्रामध्ये कुठलेही जुजबी कारण सांगून एक सीमित युद्ध सुद्धा सुरू केले तरीसुद्धा आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
Post a Comment