पवित्र कुरआनमध्ये अल्लाहनं म्हटलं आहे की, “प्रत्येक जनसमूहाचे एक लक्ष्य असते, एक दिशा असते ज्याकडे तो वळत असतो.” आपल्या जीवनाचा ठरलेला उद्देश साकार करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. जनसमूहातील समंजस आणि जबाबदार मंडळी आपल्या जनसमूहास त्यांच्या उद्दिष्टांची वारंवार आठवण करून देत असतात. म्हणजेच कोणत्याही जनसमूहाची खरी ओळख त्यांनी ठरवलेल्या ध्येयावर होते. पुढे जाऊन अल्लाहने मुस्लिमांना उद्देशून असे स्पष्ट सांगितले आहे की, “तुम्ही (म्हणजे मुस्लिमांनी) मानरजातीच्या भल्यासाठी पुढाकार घ्या.” म्हणजेच अल्लाहने मानवजातीच्या भल्याची, त्यांच्या कल्याणाची जबाबदारी मुस्लिम समूहावर टाकली आहे, हे स्पष्ट आहे. आणखीन एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी उभं केलं आहे.” भल्या गोष्टी, भली कर्म करण्यास लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुस्लिमांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. तात्पर्य हे की मुस्लिमांना या जगात स्वतःच्या हितासाठी, मौजमजा करण्यासाठी पाठवले गेले नाही. निसर्गाचा नियम आहे की कोणतीही रचनात्मक कामे करत असताना वाईट वृत्तीस आळा घालण्याचा प्रयत्न करताना यातना, अत्याचार सहन करावेच लागतात. वाईट गोष्टी वा कृत्यांचा प्रसार-प्रचार करताना लोकांच्या विरोधास सामोरे जावे लागत नाही. मुस्लिमांचं जगणं म्हणजे आयुष्यभर सतत संघर्षाचं जगणं आहे. या जगात ऐशोआरामात जीवन व्यतीत करणं हे त्यांचं शेवटचं उद्दिष्ट नाही. त्यांनी स्वतःला अल्लाह आणि त्याच्या आदेशांना पूर्णपणे समर्पित केलेले असते आणि या जगात अल्लाहल्या अदेशांचं पालन करत आपल्या सोयीसुविधा लोककल्याणासाठी समर्पित करायच्या असतात. चांगली कामं करीत असताना अल्लाहनं मुस्लिमांवर टाकलेली जबाबदारी पार पाडीत असताना लोकांचा विरोध हा होणारच. मुस्लिमांना अल्लाहच्या मर्जीनुसार जगू न देण्याचा त्यांनी चंग बांधलेला असतो. अगोदर तोंडी विरोध करतील. मग यातना-त्रास देण्यास सुरुवात करतील. मुस्लिमांना मानसिक आणि मग शारीरिक यातना देतील विनाकारण त्यांची संसारे उद्वस्त करतील. हे सर्व त्यांनी स्वतःहून ठरवलेल्या उद्दिष्टानुसार करणयात येते. याच कार्यासाठी त्यांनी स्वतःला जणू वाहून घेतलेलं असते. अशात मुस्लिमांनी त्यांच्या अत्याचारांना घाबरून आपली विधायक कार्ये सोडून द्यावीत हीच विरोधकांची रणनीती असते. मुस्लिमांनी जर त्यांना घाबरून आपलं कर्तव्य पार पाडणे सोडून दिले तर मग मुस्लिम म्हणून जगण्यात काही अर्थच उरत नाही. मुस्लिमांनी स्वतःवरील अन्याय-अत्याचाराचा पाढा वाचायचा नसतो. कोणत्याही यातना अत्याचारांना न जुमानता आपली कर्तव्ये पार पाडायची असतात. अन्याय-अत्याचार सहन करणे आणि इतरांवर अत्याचार करणं या दोन्ही गोष्टींपासून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना दूर राहाण्यास सांगितलं आहे. प्रेषितांनी आपल्या उभ्या जीवनात याच सिद्धान्तावर अचरण केले आहे. आपल्या प्रेषितकाळाच्या जवळपास २३ वर्षे त्यांना दर दोनअडीच महिन्यांनी लहानमोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले. त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. समोर कितीही मोठे आव्हान उभे असले तरी ते कधी घाबरले नाहीत. त्यांनी आपल्या अनुयायांची अशी फळी तयार केली ज्यांनी त्यांच्या आदेशांचे पालन करीत जगभर इस्लामचा प्रसार-प्रचार केला. म्हणूनच आपण आज मुस्लिम आहोत. प्रेषितांना त्यांच्याच लोकांनी, नातेबाईकांनी कडाडून विरोध केला. त्यांनी कधी त्यास भीक घातली नाही. त्यांना अमिष दाखवले गेले ते त्यांनी धुटकावून लावले. जर त्यांच्यावरील अत्याचारांना बळी पडून आपल्या विरोधकांची तक्रार मांडतच बसले असते तर त्यांनी इस्लामला जगभर पसरवले नसते. मुस्लिमांनी देखील याच गोष्टींचा आधार घेतला पाहिजे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांची प्रत्येकासमोर रात्रंदिवस तक्रार मांडत राहणे त्यांचे काम नाही. अल्लाहने घालून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता अशा तहेने होणार नाही. भारतात आणि जगात फक्त मुस्लिमांवरच अत्याचार होत नाहीत, इतर जनसमूहांवर मुस्लिमांपेक्षा जास्त अन्याय-अत्याचार होत असतात. स्वतःमध्येच अडकून न पडता इतर लोकांवरील अत्याचारांना रोखण्यास मुस्लिमांनी पुढे आले पाहिजे. कारण इतर जनसमूहांवर नव्हे तर अल्लाहने मुस्लिमांना इतर लोकांच्या कल्याणासाठी या धरतीला उभे केलेले आहे, याची जाण आणि भान मुस्लिमांनी ठेवायला हवे. तरच त्यांचं जगणं सार्थक होईल. तसे न केल्यास फक्त आपल्यासाठी सुखसुविधांची मागणी करत बसणं, आपल्यावरील अत्याचारांच्या तक्रारीवरच आपली शक्ती आणि वेळ वाया घालवत बसणं म्हणजे आपणच स्वतःस संपवण्याव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. सा. शोधन याच गोष्टींचा प्रचार-प्रसार आजवर करीत आले आहे आणि यापुढेही याच उद्दिष्टासाठी सतत प्रयत्नशील राहाणार आहे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
मो. ९८२०१२१२०७
Post a Comment