सध्या अनेक लोक कोरोनामुळे व्याधिग्रस्त होताहेत, त्याच्या कल्पनेने भयभीत होताहेत, कोरोनामुळे मृत्युमुखी पडताहेत; त्याच वेळी सरकार अनेक विरोधी आवाजांना त्रस्त, भयभीत आणि मरणाच्या दारात पोहचविण्याच्या मागे लागलेय. जे आमच्या बाजूचे नाहीत, ते देशासाठी निरुपयोगी ठरवले जाताहेत. उपयोगिता आणि निरुपयोगिता एवढ्याच निकषावर न्यायनिवाडे केले जाताहेत. कोरोनासारख्या महामारीचा काही माणसांना वठणीवर आणण्यासाठी उपयोग केला जातोय, हे किती भयंकर आहे? त्यामुळे सारा देशच जणू काही भयंकराच्या दरवाजात लोटला गेलाय. अविचारीपणा आणि स्वमग्नता आसुरीपणातच आनंद मानत असते. तिला सत्याची, न्यायाची, जबाबदारीची चाड नसते. आपण दिलेल्या शब्दांचा, वचनांशीही ती बांधीलकी मानत नाही. ‘दुर्गुण’ हेच सदगुण म्हणून प्रस्थापित केले जातात, तेव्हा असंस्कृतपणाशिवाय काहीच घडत नाही. राजकारणाला सिनेमात आणि मनोरंजनाला हिंसेत रूपांतरित करत राहण्याचा भयानक खेळ चालू आहे. खरे तर वेगाने फैलावत चाललेल्या कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी सरकारांनी कंबर कसायला हवी. त्यातून जनसामान्यांमध्ये दिलासा निर्माण होईल, याची ग्वाही फिरेल हे पाहायला हवे. अर्थव्यवस्था 24 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, उद्योग-धंदे अजूनही ठप्प असल्याने कारखानदार, नोकरदार, कामगार, मजूर मेटाकुटीला आले आहेत. छोटे उद्योजक हवालदिल झाले आहेत. नोकरदार पगारकपातीने, नोकरी राहते की जाते याच्या भीतीने आणि उद्याच्या चिंतेने कोमेजत चालले आहेत. मजुरांची, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची हालत तर खूपच खराब आहे.
देशातल्या आरोग्यव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे सरकार हे जनतेचे हित आणि सार्वजनिक कल्याण यांसाठी काम करते, असे म्हणण्याची सोय राहिलेली नाही. कोरोना महामारीने जगाला आपल्या कचाट्यात घेतले आहे. सुरुवातीला भारताचा क्रमांक जागतिक क्रमवारीत दहावा-अकरावा होता. आता तो दुसरा झालेला आहे. त्यातही केंद्र सरकारकडून कोरोनाग्रस्त होत असलेल्यांची, मृत्युमुखी पडत असलेल्यांची आणि उपचारांनी बरे होत असलेल्यांची जी काही आकडेवारी रोज दिली जाते आहे, त्यावर कुणीही सुज्ञ माणूस विश्वास ठेवणार नाही. तरीही भारताचा क्रमांक जागतिक क्रमवारीत दुसरा झालेला असेल तर प्रामाणिकपणे आकडेवारी दिली गेली, तर काय परिस्थिती दिसेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मृत्यु पावलेल्या सुशांतसिंग राजपुतचा वापर केला जातो, त्यासाठी कंगणासारखी अतिशय वाह्यात आणि वाचाळ नटी प्यादे म्हणून वापरली जाते, पण जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी मात्र पुरेशी आणि योग्य पावले उचलली जात नाहीत. कोरोनाने भारतीय आरोग्यव्यवस्थेपुढे इतका गंभीर पेचप्रसंग निर्माण केला आहे, पण केंद्रात सत्तेत असलेला पक्ष आपल्या विचारधारेचे तुणतुणे कसे वाजत राहिल आणि विरोधकांवर ‘फेक न्यूज’, ‘फेक आरोप’ आणि ‘फेक दावे’ करत कसा जय मिळवता येईल, याचाच विचार प्रामुख्याने करताना दिसत आहे. कोरोना महामारीच्या काळातही आपले ‘फोडा आणि झोडा’छाप राजकारण जोमाने रेटत राहणाऱ्या सत्ताधारी पक्षाला शासनकर्ते म्हणून आपल्या जबाबदारीचे भान कधी येईल, याची शक्यता कुणीही गृहित धरू शकत नाही. उलट ‘सामाईक जबाबदारी’पेक्षा ‘सामाईक भीती’ला कसे प्रोत्साहन मिळेल, यासाठीच केंद्र सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या मागण्या संसदेत मांडतील असा हेतू होता. परंतु जेव्हा लोकांचेच प्रतिनिधी लोकांच्या विरोधात धोरणे राबवतात, तेव्हा तो संघर्ष रस्त्यावर उतरून करावा लागतो. सरकार लोकांविरुद्ध धोरणे राबवत असेल तर, त्यासाठी आवाज उठवणाऱ्या चळवळी या निश्चितच सरकारविरोधी असणार! सरकारविरोधी म्हणजे देशविरोधी नव्हे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोककेंद्री लोकहिताचे निर्णय राबवले जाऊन चळवळींची गरज भासणार नाही अशी अपेक्षा होती, परंतु असे काही घडले नाही. त्यामुळेच डॉ. अभय बंग म्हणतात, ‘आपली लोकशाही ही हळूहळू लोकप्रतिनिधीशाही झाली आणि आता ती पक्षप्रमुखशाही झालेली आहे.’ काही ठराविक पक्षाचे नेते हे सगळ्या पक्षांना नियंत्रित करत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात सगळे कार्यक्रम नसतात, जे ते पुढील पाच वर्षे अंमलात आणणार आहेत. जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन एखाद्या राजकीय पक्षाने काही काम केले तर त्यांना लोकशाहीनुसार, लोकांमध्ये जाऊन, लोकांच्या भावना जाणून घेणे महत्त्वाचे असते. परंतु आता असे होताना दिसत नाही.
राज्यकर्त्यांची भावना अशी झालेली आहे की आम्हाला पाच वर्षे निवडून दिले म्हणजे आम्ही आता लोकांचे मालक आहोत. परंतु ते मालक नसून लोकसेवक आहेत, हे जेव्हा विसरले जाते तेव्हा साहजिकच आहे की बहुमत जरी सरकारच्या पाठीशी असले, निर्णय जरी बहुमताने होत असले तरी शासनकर्त्याना भानावर आणण्यासाठी लोक त्यांच्या विरोधात उभे राहतील.
- शाहजहान मगदूम
मो. : ८९७६५३३४०४
Post a Comment