हाथरस येथील दलित मुलीच्या हत्येची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याने या घटनेला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेत सीएनएन या प्रतिष्ठित वाहिनी सह अनेक वाहिन्यांनी भारतात बलात्कार का थांबत नाहीत यावर पैनल डिस्कशन सुद्धा आयोजित केले होते. भारतीयांचा हा किती मोठा सामाजिक अपमान म्हणावा? या विषयावरुन तिकडे देशाची प्रचंड बदनामी सुरू आहे तर इकडे प्रचंड राजकारण सुरू आहे. जात पंचायतींचे आयोजन करून आरोपींना बिनशर्त सोडले नाही तर देश चालू देणार नाही अशा धमक्या उघडपणे दिल्या जात आहेत. या घटनेकडे फक्त एक घटना म्हणून पाहणे उचित होणार नाही कारण ही एक स्वतंत्र घटना नाही तर कोपर्डी, निर्भया, आसिफा, हैद्राबादची डॉ. प्रिती रेड्डी आणि आता मनिषा अशा एक ना अनेक मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांच्या साखळीची एक कडी आहे. विदेशी महिला सुद्धा ह्या दुष्टचक्रातून सुटलेल्या नाहीत हे सातत्य भयावह आहे. म्हणून या घटनेविषयी स्वतंत्र चर्चा करण्यापेक्षा यावर सांगोपांग चर्चा करणे अनुचित होणार नाही.
चांगले आणि वाईट यांच्यातला फरक न करता पश्चिमेकडून आलेल्या प्रत्येक गोष्टीचे आपल्या देशात स्वागत केले जाते. हे बलात्काराचे पहिले कारण. ते कसे याचा तपशील पुढे येईलच. तत्पूर्वी एक दुर्दैवी घटना पाहू. 2017 साली नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री नववर्ष साजरा करण्यासाठी बेंगलुरूच्या बिग्रेड रोड, कमर्शियल स्ट्रीट आणि एम.जी. रोड येथे जमलेल्या हजारो स्त्री-पुरूषांच्या संरक्षणासाठी दीड हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. परंतु एवढ्या पोलीसांसमक्ष गर्दीत सामील शेकडो महिलांचा विनयभंग करण्यात आला. असे अश्लील चाळे करण्यात आले की ज्यांचे वर्णन शब्दांमध्ये करणे शक्य नाही. येवढी मोठी राष्ट्रीय शरमेची घटना अलीकडे दुसरी झाली नाही, परंतु पाहिजे तेवढी लाज आपल्याला या घटने नंतर ही आलेली नाही. हे त्यानंतरच्या घटनांवरून सिद्ध झालेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा जे लोक स्वीकार करतात त्यांना त्यापासून होणारे नुकसान आपसुकच सहन करावे लागते. दुसऱ्या कोणाला त्यांचे नुकसान करण्याची आवश्यकता नसते. प्राचिन हिंदू संस्कृती आणि इस्लाम यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या भारतीय गंगा-जमनी संस्कृतीचा काही लोकांना संपूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यामध्ये जसे हिंदू सामील आहेत तसेच काही मुस्लिमही सामील आहेत.
त्यातूनच महिलांच्या पोशाखाकडेच नव्हे तर संपूर्ण महीलांकडेच बघण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. समाजमाध्यमांच्या गतिमान प्रगती नंतर वेगाने हा फरक पडलेला आहे. याची सुरूवात महिलांच्या जबाबदारीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात पडलेल्या फरकातून झालेली आहे. प्राचिन हिंदू परंपरा आणि इस्लाम यामध्ये महिलांकडे घरातील जबाबदारी तर पुरूषांकडे घराच्या बाहेरील जबाबदारी अशी सरळ-सरळ विभागणी करण्यात आलेली होती. आजच्या काळात ही विभागणी अमान्य करण्यात आलेली आहे. स्त्रीलाही पुरूषांच्या बरोबर घराबाहेरील कामे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा विचार भारतीय नाही, तो पश्चिमेकडून घेतलेला आहे. चरित्रहीन पाश्चिमात्य पुरूषांनी आपल्या अपवित्र क्रियाकलापांच्या सोयीसाठी महिलांना कामानिमित्त घराबाहेर काढूनही त्यांना सेवेचेच काम दिलेले आहे. परिणामी त्यांची निवड सेल्सगर्ल, बार गर्ल, रिसेप्शनिस्ट, पर्सनल असिस्टंट, रूम अटेंडंट, एअर होस्टेस, डांसर सारख्या पदावर करण्यात येते. फार कमी प्रमाणात महत्वाची पदे त्यांना दिली जातात.
अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही महिला ही राष्ट्रपती म्हणून स्विकार्य नाही, हे सत्य नाकारण्या सारखे नाही. हवाई सुंदरी या पदाची तर मोठी गंमतच आहे. जी कामे घरात केली तर हिणकस वाटतात तीच कामे हवाई सुंदरींकडून विमानात घेतली जातात. त्याचा मात्र मोठा मान समजला जातो. याची विसंगती महिलांच्याही लक्षात येत नाही. पुरूषांच्या लक्षात येते मात्र ते सोयीनुसार गप्प असतात.
वास्तविक पाहता गृहिणी म्हणून काम करणे हा स्त्रीत्वाचा सर्वोच्च सन्मान असतो. कारण मूल जन्माला घालणे आणि त्याच्यावर चांगले संस्कार करणे आणि देशाला चरित्रवान नागरिकांचा अखंड पुरवठा करणे यापेक्षा महत्वाचे काम जगात दूसरे कोणतेही नाही. मानव वंशाचे अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे. आणि हे काम स्त्रीच चांगल्या प्रकारे करू शकते यात शंका नाही. कारण तिची जडण घडण नैसर्गिकरित्या त्या कामाला अनुकूल अशी असते. इस्लाममध्ये या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिलेल आहे. घराची जबाबदारी नाकारल्यामुळे पाश्चिमात्यांची कुटुंब व्यवस्था ढासाळलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अभ्यासाकडे कसे वळवावे, हा आमच्या पुढील सर्वात मोठा प्रश्न आहे, अशी चिंता हिलरी क्लिंटन यांनी 18 जुलै 2009 रोजी मुंबईच्या सेंट झेवियर सभागृहामध्ये बोलतांना व्यक्त केली होती. आई आणि वडील दोघेही जर कामानिमित्त नित्यनियमाने घराबाहेर राहत असतील तर त्याचे दुष्परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. मात्र एवढी साधी बाबही या उच्चशिक्षित अडाण्यांच्या लक्षात येत नाही.
महिलेची घरातील उपस्थिती घरावर नियंत्रण ठेवते. मिरजोळी चिपळूनच्या प्रसिद्ध उर्दू लेखिका फेरोजा तस्बीह यांच्या मते स्त्री ही घररूपी राज्याची राणी असते. घरातील व्यवहारांचे नियंत्रण करण्याचा तिचा अधिकार असतो. आधुनिक लोक या विचाराला नाकारून महिलांना रोजगारासाठी घराबाहेर काढतात. येथेच पोशाखाचा प्रश्न निर्माण होतो. घराबाहेर जातांना नीट-नेटके कपडे घालणे, थोडासा साज श्रृंगार करणे ह्या स्त्री सुलभ भावनेतून त्या टापटीप राहण्याचा प्रयत्न करतात. एकतर तारूण्य, दूसरा श्रृंगार वर पाश्चिमात्य पद्धतीचे तोकडे आणि तंग कपडे यातून मग त्या पर पुरूषांच्या नजरेच्या कचाट्यात सापडतात. बेपर्दगीसे हवस पैदा होती है, या पुरूषी प्रवृत्तीतून सातत्याने महिला अडचणीत येतात. वाईट पुरूषांना जिथे संधी मिळेल तिथे ते महिलांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. वश झाली तर ठीक नाही तर तिचा विनयभंग प्रसंगी बलात्कार करतात.
खुशबू जो लुटाती है मसलते हैं उसीको,
एहसान का ये बदला मिलता है कली को
यावर एक सोपा उपाय इस्लामने सांगितलेला आहे,
ज्याला परदा म्हणतात. परदा व्यवस्थेचा उद्देश महिलेला डांबून ठेवणे नव्हे तर तिच्या सौंदर्याला पब्लिक अनलिमिटेडच्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड करणे हा आहे. त्याच्यासाठी लिमिटेड की जो तिचा पती आहे, ’’मी स्वतःला परद्यामध्ये ठेवून पाहिले तर मला स्वातंत्र्याचा अत्युच्च अनुभव आला’’ असे नॉवोमी वॉलिफ नावाच्या अमेरिकी लेखिकेने म्हंटलेले आहे. ती पुढे म्हणते की, ती एक सुंदर महिला होती. तिला जेव्हा घराबाहेर पडावे लागत होते, तेव्हा स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कित्येकतास आरशासमोर उभे राहून तयारी करावी लागत होती. ती जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जात होती, तर स्वतःला लोकांच्या कौतुकास्पद नजरेमध्ये असल्याचा तिला भास होत होता. आपल्याला सर्व लोक सुंदर समजतात आणि आपल्याकडे पाहतात यातून तिलाही आनंद मिळत होता. मात्र तिला या गोष्टीची भितीही वाटत होती की, वाढत्या वयामुळे ती लोकांच्या नजरेतून जाईल. मग पुरूषांच्या नजरेच्या आकर्षणाच्या केंद्रात राहण्यासाठी तिला जास्त मेहनत व जास्त कॉस्मेटिक्सवर खर्च करावा लागत होता. स्वतःला ती प्रदर्शनीय वस्तू समजत होती. तिने इस्लाम स्विकारल्यानंतर जेव्हा परद्याचा उपयोग केला तेव्हा स्वतःला पहिल्यांदा पुरूषांच्या वाईट नजेरपासून सुटका करून घेत स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. (संदर्भ : दावत, 5 सप्टेंबर 2008, पान क्र. 1)
लैंगिक प्रेरणा ही भुकेनंतर दूसऱ्या क्रमांकाची तीव्र प्रेरणा असते. वर्तन स्वातंत्र्याने तिच्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य असते. केवळ शरियतच्या व्यवस्थेअनुसारच तिच्यावर नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी शरियतने स्त्री आणि पुरूष यांना समाजात वावरण्यासाठी आचार संहिता घालून दिलेली आहे. स्त्रीयांना परदा तर पुरूषांना दाढी ठेवणे, नजर खाली ठेवून चालणे, परस्त्रीचा संपर्क टाळणे इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश आहे. अनेक लोकांचा असा समज आहे की इस्लामच्या परदा व्यवस्थेला बहुतांशी लोकांचा विरोध आहे. मात्र ही धारणा चुकीची आहे. प्ल्यू ग्लोबल अॅटीट्यूड प्रोजेक्ट नावाच्या संस्थेने युरोप व अमेरिकेमध्ये बुरख्यासंबंधी सर्व्हे केला तर 28 टक्के लोकांनी त्याला विरोध तर बाकीच्यांनी त्याचे समर्थन केले होते. (संदर्भ : लोकमत 11-7-2010 पेज नं. 3)
आँखों को गुस्ल दो गुनाह बहोत किया है,
दिल ने शिकायत की और तडपा दिया है
इस्लामशिवाय अन्य जीवनपद्धतीमध्ये परदा पद्धती नाही. त्यामुळे महिला बाजारात येतात व सार्वजनिक होतात. अर्थात त्यांचे सौंदर्य जे की, व्यक्तीगत राहणे अपेक्षित होते ते सार्वजनिक होते त्यातूनच वाईट चारित्र्याच्या व्यक्तींचे फावते. एकतर्फी प्रेमातून महिलांवर अॅसिड हल्ले, चेहऱ्यावर ब्लेडने वार करणे, असे प्रकार केले जातात. पर पुरूषांच्या जाचामुळे कंटाळून अनेक महिला आत्महत्या करतात. अनुराधा बाली आणि चंद्रमोहन बिष्णोई अर्थात चाँद आणि फिजा यांच्यातील प्रेमप्रसंगाच्या घटनेतून बुद्धिमान लोकांना बोध घेता येईल.
चंद्रमोहन बिष्णोई हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते तर अनुराधा बाली ही सरकारी वकील होती. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नटून-थटून मैत्रीणीसोबत चंदीगढच्या एका हॉटेलमध्ये गेली होती. त्याच हॉटेलमध्ये चंद्रमोहन जेवायला आले होते. त्यांची नजर तिच्यावर पडली आणि ती त्यांना भावली. त्यातून आपली सर्व शक्ती पणाला लावली. स्वतः धर्म बदलून चाँद झाले तर अनुराधाला फिजा होण्यासाठी भाग पाडले. तिला हस्तगत केले. मन भरल्यावर तिला वाऱ्यावर सोडून दिले. ती इतकी वैफल्यग्रस्त झाली की तिने आत्महत्या केली. तिच्या शरीरातून दुर्गंधी उठली तेव्हा लोकांना कळाले की, तीने आत्महत्या केलेली आहे. अनुराधा जर का बेपर्दा होवून हॉटेलमध्ये गेली नसती तर तिला अशा दुर्देवी मरणाला कवटाळावे लागले नसते. चंद्रमोहन आजही आपल्या पूर्वपत्नीबरोबर आनंदात आहेत. अनुराधा मात्र या जगात नाही.
आश्चर्य या गोष्टीचे आहे की, परदा न केल्यामुळे शेकडो महिला पुरूषी अत्याचाराच्या बळी पडलेल्या आहेत. तरीपण महिलांच्या लक्षात ही साधी गोष्ट येत नाही की, आपण पुरूषी अत्याचाराला का बळी पडत आहोत? काही पुरूष वासनांध असतात. अशा पुरूषांना केवळ संयमाने वागा, असे सांगून भागत नाही. समाजात कोण वासनांध आहे? हे समजून येत नाही. म्हणून बुरखा घातला तर सर्वच पुरूषांच्या वाईट नजरेपासून संरक्षण मिळते.
आमच्यासाठी काय हितावह आहे? व काय नाही? याचा निर्णय सर्व शक्तीमान अल्लाहखेरीज कोणीच करू शकत नाही. मानव संस्कृतीचे स्थैर्य लाज-लज्जेवर अवलंबून आहे. जर मानवांनी तेच सोडले तर मानव आणि जनावर यात फरक तो काय
अल्लाह पाक आपल्या सर्वांना चांगली समज देओ.
आमीन
- एम.आय. शेख
Post a Comment