सहसा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी माहिती असतं, इथे पूर्वज म्हणजे पुरुष हे आपण गृहित धरतो. शेकडो वर्षं फक्त पुरुषांनी केलेल्या गोष्टींनाच समाजाप्रति असणारं भरीव योगदान समजलं गेलं आहे, मग भले मोठ्यातल्या मोठ्या संकटातून घराला तारून नेणारी बाई असली तर नाव लागतं पुरुषाचंच.त्याचप्रमाणे देशाला, समाजाला मोठं करणाऱ्या महिला अनामिक राहातात, अनेकदा त्यांचा साधा नामोल्लेखही कुठे केला जात नाही, ऋणनिर्देश तर लांबचीच गोष्ट. अशाच आपल्या एक पूर्वज आहेत फातिमा शेख.
बीबीसी मराठीने सावित्रीच्या सोबतिणी दहा भागांची खास मालिका चालवली. याचा उद्देश होता त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणं ज्यांनी लोकशाही,मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. या दहा महिला जर भारतीय इतिहासात नसत्या तर आज आपल्याला वेगळंच चित्र दिसलं असतं.
'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिलीतसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या समकालीन तर काही नंतरच्या पण सर्वार्था ने 'सावित्रीच्या सोबतिणी.
आपण ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणतोच. ज्योतिबांनी वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचं काम केलं. ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. सावित्रीबाई देशातल्या पहिल्या महिला शिक्षक. त्यांना आपण क्रांतिज्यो ती म्हणतो.
सावित्रीबाई म्हणत असतील की, माझ्या अनुपस्थितीत माझी सहकारी शाळेचं सगळं काम नीटपणे सांभाळेल, काहीही तोशीस पडू देणार नाही, तर ती स्त्रीही कमी नसणार. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेख.
सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिकेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल समग्रमपणे लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. अर्थात, त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण त्यातली वस्तुस् थिती काय आणि कल्पित गोष्टी काय असा फरक करणं अवघड होऊन बसतं. त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या असंही म्हटलं जातं. एका कथेनुसार जेव्हा महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांचा वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. पण उस्मान शेख यांच्याविषयीही फारशी माहिती मिळत नाही. फातिमा शेख यांच्याविषयी एक धागा सापडतो 'सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय' या पुस्तकात. त्या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यात सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला दुसरी- तिसरी कोणी नसून फातिमा शेख आहेत. 'सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय' या पुस्तकाचे संपादक डॉक्टर एमजी माळी यांनी आपल्या प्रस्तावनेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सावित्रीबाईंचा फोटो कित्येक वर्षांपूर्वी पुण्याहून प्रकाशित होणाऱ्या 'मजूर' या मासिकात छापला होता. हे मासिक 1924-30 या काळात प्रकाशित होत होतं. याचे संपादक रा. ना. लाड होते. तर माळींना हा फोटो द. स. झोडगे यांच्याकडून मिळाला. झोडगे स्वतः काही काळ 'मजूर' मासिकाचे संपादक होते. लोखंडे नावाचे एक ख्रिस्ती मिशनरी होते. त्यांनी काढलेल्या पुस्तकातही सावित्रीबाईंचा एक फोटो प्रसिद्ध झाला आहे. 'मजूर' मासिकात प्रसिद्ध झालेला फोटो तसंच या पुस्तकातला फोटो दोन्ही सारखेच आहेत. या फोटोत सावित्रीबाईंच्या दोन विद्यार्थीनी खाली बसल्या आहेत आणि स्वतः सावित्रीबाई आणि फातिमा शेख या फोटोत दिसतात. या ग्रुप फोटोवरून सावित्रीबाईंचा तो फोटो तयार केला गेला जो आज आपण सर्वत्र पाहातो.
हा फोटो नसता तर कदाचित आपल्याला फातिमा शेख यांच्याविषयी काहीच माहिती मिळाली नसती. इतकंच काय, आपल्याला सावित्रीबाई कशा दिसतात हेही कळालं नसतं. याच फोटोने फातिमा शेख यांना सावित्रीबाईंसारखंच इतिहासातलं महत्त्वाचं नाव बनवलं आहे. दलित, वंचित आणि स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून फुले दांपत्याला अनेक त्रास सहन करावे लागले हे आपण जाणतोच. सावित्रीबाईंना तर अपमान,शिव्या, अंगावर शेण फेकणे अशा अनेक यातना सहन कराव्या लागल्या. जर सावित्रीबाईंच्या अंगावर दगड, चिखल, शेण फेकलं गेलं असेल तर दाट शक्यता आहे की सावित्रीबाईंसोबत सहशिक्षिका म्हणून काम करताना फातिमा शेख यांनाही अशाच त्रासाला तोंड द्यावं लागलं असेल.
फातिमा यांचं वय साधारण सावित्रीबाईंइतकंच होतं, त्यामुळे त्यांचा जन्म साधारण 180-190 वर्षांपूर्वी झालेला असू शकतो. त्यांनी प्रामुख्याने पुण्यात काम केलं.
सावित्रीबाईंचं पत्र
सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी 10 ऑक्टोबर 1856 साली ज्योतिबांना एक पत्र लिहिलं होतं. तोवर वंचितांसाठी, महिलांसाठी पुण्यात अनेक शाळा या दांपत्यांने उभ्या केल्या होत्या. त्यांची चिंता ज्योतिबांना असणं साहजिकच होतं. त्यांना आश्वस्त करण्यासाठी त्या लिहितात, "माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही." फातिमाला कसला त्रास, तर सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. फातिमा कोणी साधीसुधी महिला नव्हती. फातिमा सावित्रीबाईंची मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.
-नासिरूद्दीन
(साभार : बीबीसी मराठी)
Post a Comment