आज रामप्रहरी (काही धर्मनिरपेक्ष लोक याला सकाळ म्हणतात, पण पुढेमागे आम्हाला आमचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी कोणाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही अशीच भाषा वापरतो. असो.) बायकोने समोर आदळलेला कपभर चहा पोटात ढकलून, (दिवसभरात स्वखर्चाने आम्ही फक्त एवढंच पोटात ढकलतो. बाकी सर्व आमची पत्रकारिता सांभाळून घेते! असो.) खांद्यावर झोला अडकवून आम्ही घराबाहेर पडलो. फिरता फिरता आम्ही 'मातोश्री' महालाजवळ पोहोचलो. तिथल्या द्वारपालांच्या हातात बिस्किटांचे पुडे होते. ते बिस्किटं खाण्यात दंग होते. एका कोपऱ्यात बिस्किटांची ५०-६० खोकी पडलेली होती. चौकशीअंती ती बिहारला पाठविण्यासाठी मागवलेली आणि आता काहीच कामाची नसलेली बिस्किटं असल्याचं कळलं. तिकडे जाऊन आम्ही हळूच पाच सहा पुडे आमच्या झोळीत टाकून घेतले. (झोळीत असलं फुकटचं काही पडल्याशिवाय पत्रकार असल्याचा फिलच येत नाही! अर्धी सोय तर झाली. आता फक्त कोणीतरी चहा पाजणारा शोधायला हवा.असो.) अंगणातच एका बाजूला दोन चार मावळे तुतारी कुंकण्याचा सराव करीत होते. त्यांना टाळून आम्ही हळूच दिवाणखान्याच्या दारापाशी पोहचलो. सरळ आत जाऊन मिळवलेल्या बातमीपेक्षा दाराआड लपून मिळविलेली बातमी जास्त खरी आणि खुसखुशीत असते याचं बाळकडू आमची पत्रकारिता बाल्यावस्थेत असतांनाच आम्हाला आमच्या ज्येष्ठांनी पाजलेलं असल्यामुळे आम्ही दाराच्या आडोश्याला थांबणंच पसंत केलं. आतमध्ये सामानाची बांधाबांध सुरू होती. प्रत्यक्ष उधोजीराजे आणि बाळराजे समोर उभे राहून कामावर देखरेख ठेऊन होते. 'वर्षा'वर जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू असावी असा आम्ही अंदाज बांधला आणि आमचे डोळे भरून आले.'कशाला उगीच थोड्या दिवसांसाठी धावपळ करता ? उगाच जा जा अन् ये ये.' असं उधोजीराजेंना समजवावं असं क्षणभर वाटलं, पण आम्ही दाराबाहेर असल्यामुळे तो मोह आवरला. आम्ही तसे आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे आमची विचारसरणी अशीच आहे, की माणूस इकडे आपली स्वप्ने रंगवत असतो आणि तिकडे देवाजीच्या ( इथे देवानाना नागपूरकरांचा दुरान्वये ही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी.) मनात वेगळेच काहीतरी असतं. नंतरचा आतला संवाद ऐकून ती तयारी 'वर्षा'वर जाण्यासाठी नाही तर 'बिहार'ला जाण्यासाठी सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आमच्या मनावरचं मणभर दडपण कमी झालं! आत उधोजीराजे आणि बाळराजेंचा संवाद सुरू होता. बाळराजे :- डॅड, मी जायलाच हवं का बिहारला, प्रचारासाठी ? उधोजीराजे :- जायलाच हवं का म्हणजे ? अरे जायलाच हवं. किंबहुना मी तर म्हणीन की तिथे तू जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाळराजे :- पण डॅड, संजय अंकल तर सांगतात की, तिथे आपली तितकी ताकद नाही म्हणून. मग ज्या परीक्षेत आपल्याला भोपळाच मिळणार आहे ती परीक्षा आपण द्यायचीच कशाला ? राज अंकल कसा कधी कधी गॅप घेतात तसा आपल्याला नाही का घेता येणार ? उधोजीराजे :- अरे, गॅप घ्यायला ती काय बारावीची परीक्षा आहे की काय आणि असा घाबरतोस कशासाठी, मी आहे ना तुझ्या पाठीशी, ऑनलाइन! बाळराजे :- डॅड, मी काय महाराष्ट्र आहे का, माझ्या पाठीशी तुम्ही ऑनलाइन राहायला ? आणि तो चिन्हांचा काय गोंधळ आहे हो, डॅड. कधी बिस्कीट तर कधी ती तुतारी की काय ती ? उधोजीराजे :- अरे बाबा, आपल्याला बिस्कीट नको होतं म्हणून त्यांनी आपल्याला तुतारी दिली. समजलं? बाळराजे :- मला समजलं हो डॅड, पण त्या अमृता आंटींना नाही ना समजलं . त्या फोन करून मला विचारत होत्या. उधोजीराजे :- (वैतागून) काय विचारात होत्या त्या ? बाळराजे:- त्या विचारात होत्या की इतकी वर्षे आम्ही चॉकलेट देत होतो ते चाललं तुम्हाला आणि आता निवडणूक आयोगानं बिस्कीट दिलं तर का नाही चाललं?
-मुकुंद परदेशी
_मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८
Post a Comment